विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बर्बर - उत्तर आफ्रिकेतील मूळच्या लिबियन लोकांच्या निरनिराळया शाखा या नावांखाली मोडतात. बर्बर लोक अति प्राचीन काळापासून भूमध्यसमुद्र व साहाराचे ओसाड वाळवंट यांच्या दरम्यानच्या प्रदेशांत ईजिप्तपासून अटलांटिकपर्यंत रहात आलेले आहेत. त्यांच्या झोओना जेबालिया, चौरिया, कबिलीस, बेनीमझब, श्लूह, अमझीघ, बर्बर, टयूरेग, अमोशघ, सोर्गू वगैरे पुष्कळ पोटजाती आहेत. मानववंशशास्त्रदृष्टया बर्बर लोकांचा इतर लोकांशी काय संबंध आहे, याबद्दल अद्याप बराच वाद आहे.
फिनिशियन, ग्रीक, रोमन, व्हँडॉल, अरब व फ्रेंच या राष्ट्रांच्या दास्यत्वाखाली निरनिराळया काळी बर्बर लोक गेले असूनहि, त्यांची शरीराची ठेवण (त्याचप्रमाणे), स्वभाव व राष्ट्रीयत्व ही पाषाणयुगापासून आहेत तशीच आहेत. परक्या लोकांच्या स्वा-यांमुळे भूमध्यसमुद्राच्या किना-यालगतच्या टोळयांमध्ये परक्या रक्ताची भेसळ साहजिकच जास्त झाली आहे, परंतु किना-यापासून दूरच्या भागांत रक्ताची भेसळ झालेली नाही. बर्बर लोक गोरे असून त्यांनी यूरोपीय पध्दतीचा पोषाख केल्यास ते थेट यूरोपियन लोकांप्रमाणेच दिसतात. परक्यापैकी अरबांच्या स्वारीपासून बर्बर जातीवर सर्वात जास्त परिणाम झाला, परंतु दोघांचा धर्म एक व राज्यपध्दती (शासनसंस्था) एक असूनहि त्यांचा एकजीव मात्र विशेषसा झाला नाही, परस्परांचे गुणधर्महि निरनिराळे आहेत. अरब हांजी हांजी करणारे, लांचखाऊ व अप्रमाणिक तर बर्बर सरळ प्रामाणिक, अन्यायाने पैसे न मिळविणारे, बुध्दिमान व विश्वासू आहेत.
प्रत्येक खेडेगाव हा स्वतंत्र राज्यविभाग असून गांवचा सर्व कारभार जेम्मा नांवाच्या एका मंडळाकडे असतो. गांवच्या कारभारांत श्रीमंतांनां व गरीबांना सारखेच हक्क असतात. बर्बर हे मुख्यतः लढवय्ये लोक असल्याकारणने प्रत्येक मुलगा सोळा वर्षांचा झाल्याबरोबर त्याला जेम्मांत आणून शस्त्रास्त्रे देण्यांत येतात, व ती वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत तो आपल्याबरोबर ठेवतो. प्रत्येक गांव आपल्या अंतर्गत कारभारापुरते पूर्ण स्वतंत्र असले तरी केव्हा केव्हा दोन अथवा अधिक गांवांचे संघ बनलेले असतात. त्यांना अर्श असें म्हणतात. व असे कित्येक संघ मिळून 'थकेल्बिट' होते. बर्बर मुसलमानधर्मीय आहेत तरी ते त्या धर्माचे सर्व नियम पुष्कळ वेळा पाळीत नाहीत. उदाहरणार्थ, ते रानटी डुकराचे मांस खातात व अंजिराची दारू पितात, तथापि ते फार धर्मभोळे असून भुते गाडल्याखेरीज कधीहि घर सोडीत नाहीत. कित्येक बर्बर लोकांत, मुसुलमानी धर्म स्वीकारण्यापूर्वी त्यांच्यात असलेल्या ख्रिस्ती व यहुदी चाली अद्याप कायम आहेत. अरब स्त्रियांपेक्षा बर्बर स्त्रियांची स्थिति पुष्कळ बाबतीत चांगली आहे, तथापि वाटेल त्यावेळी बायको विकत घेण्याचा व सोडण्याचा नव-याला अधिकार असतो. तिला सर्व कामे करावी लागतात, एखाद्या नोकराप्रमाणे तिला वागविण्यांत येते. स्त्री म्हातारी झाल्यानंतर, विशेषतः तिला मुलगा नसल्यास सोडून देण्यांत येते, परंतु सार्वजनिक बाबतीत बोलण्याचा तिला अधिकार असतो.
भाषा - बर्बर भाषेची जागा अरबीने घेतली आहे तरी अद्याप लाखो लोक बर्बर भाषा बोलतात. शब्द व वाक्ये यांच्या रचनेच्या बाबतीत तिचे सेमिटिक भाषांशी पुष्कळ साम्य आहे, परंतु सेमिटिक भाषांपासून ती अगदी भिन्न आहे. शिवाय बर्बर लोकांची स्वतंत्र लिपीहि आहे, परंतु त्या लोकांस तिची माहिती थोडीच असून तिचा उपयोगहि फारच थोडा केला जातो. बर्बर भाषेच्या पोटभाषा दूरदूरच्या प्रदेशांत चालत असूनहि त्यांमध्ये विलक्षण साम्य आहे ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. ईजिप्शियन व एथिओपिक भाषा सोडल्या असता आफ्रिकेतील सर्वात जुने पुस्तक तवहिंद हे इब्न तुमर्त महिदी याने लिहिले आहे. बर्बर भाषेतील इतर लेख शिलालेखांच्या रूपाने आढऴतात. बर्बर भाषेंत एकंदर ३२ (अरबीपेक्षा ४ जास्त) मुळाक्षरें आहेत.