विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बर्न्स (१७५९ - १७९६) - एक सुप्रसिध्द स्कॉच कवि. त्याचे शिक्षण घरगुतीच झाले. १७८१ साली तो आयर्व्हिन येथे तागाच्या कारखान्यांत नोकरीस राहिला. बाप वारल्यानंतर आपल्या भावासह तो स्वतःच्या शेतीवर राहिला पण त्यांत त्याला किफायत होईना. याच सुमारास स्नेह्यांच्या सांगण्यावरून त्याने आपला काव्यसंग्रह प्रसिध्द केला. त्या काव्यसंग्रहांत 'दि ट्वा डॉग्स', 'दि अड्रेस टु दि डेझल,' 'दि माऊस', दि डायसी' इत्यादी कविता होत्या. या काव्यसंग्रहामुळे त्याची लोकप्रियता थोडक्याच काळांत प्रस्थापित झाली. यांनतर थोडक्याच दिवसांनी त्याचे जेन आरमोर या बाईशी लग्न झाले. 'दि मेलडीज ऑफ स्कॉटलंड' या काव्यसंग्रहासाठी रचिलेली शंभर गाणी बर्न्सच्या उच्च कवित्वाची साक्ष देतात. बर्न्सची कविता फार उच्च दर्जाची आहे. त्याच्या कवितेमध्ये वैविध्य, प्रसाद, स्फूर्ति, स्पष्टपणा इत्यादी गुण दिसून येतात. त्याची पुष्कळ कविता भावना प्रधान आहे. तथापि 'टॅम ओ शांटर' इत्यादी कवितांतून मार्मिक कोटया करण्याच्या बाबतीतहि त्याचा हातखंडा होता असें दिसून येते. तसेच त्याच्या ब-याच कवितांतून विनोद भरलेला आढळतो. 'होली विलीज प्रेयर' आणि 'दि होली फेयर' इत्यादी कविता औपरोधिक आहेत.