विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बर्क, एडमंड (१७२९ – १७९७) - एक आंग्ल मुत्सद्दी आणि लेखक, याचा जन्म डब्लिन येथे झाला. १७४८ साली विद्यालय सोडताना त्याची विद्वता सर्वसाधारण विद्यार्थ्यांपेक्षा जास्त नव्हती. परंतु दिवसेंदिवस अविश्रांत श्रमाने व अंगच्या हुषारीने तो लवकरच नांवारूपास येऊं लागला. १७५६ साली त्यानें 'फिलॉसॉफिकल इन्क्वायरीज इन्टु दि ओरिजिन ऑफ अवर आयडियाज ऑन दि सब्लाइम् ऍण्ड दि ब्यूटीफुल' या नांवाचे एक पुस्तक लिहिले व तेव्हापासून लोकांना त्याच्या स्वतंत्र विचारसरणीची कल्पना झाली. त्याला मानवी कर्तव्यांची, मनोवृत्तीच्या खळबळीची व परिस्थितीची व्यापक माहिती होती. राजकीय वाङमयांत त्याचें नांव अजरामर झाले आहे.
१७६९ साली तो लॉर्ड रॉकिंगहॅमचा खाजगी चिटणवीस झाला व यावेळेपासून सार्वजनिक चळवळीत त्याचे अंग दिसू लागले. अमेरिकेवर नवीन कर बसवावयाच्या वेळी त्याने अमेरिकेतर्फे केलेली भाषणे फारच अप्रतिम आहेत.
ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरांच्या हिंदुस्थानांतील स्वैर वर्तनाची पूर्ण माहिती त्याने तेथील (इंग्लंड) लोकांनाहि दिली व वॉरनहेस्टिंग्जच्या गैरवर्तनाबद्दल त्याच्यावर आरोप होऊन चौकशीसाठी त्याला न्यायासनासमोर आणण्याकरिता इंग्लंडांतील लोकमत त्यानें तयार केले. फ्रान्सच्या बंडाळीत नॅशनल असेंब्लीचे वर्तन त्याला बेकायदेशीर व सर्व यूरोपच्या राज्यकारभारांत क्रांति घडवून आणणारे असे वाटल्यावरून त्याने ''रिफ्लेक्शन्स ऑन दि फ्रेंच रेव्होल्यूशन'' (फ्रेंच राज्यक्रांतीसंबंधी विवेचन) नांवाचे पुस्तक प्रसिध्द केले. त्यामुळे सबंध यूरोपचे मत फ्रेंच राज्यक्रांतीविरुध्द झाले व इंग्लंड पक्के राजनिष्ठ राहिले. लॉर्ड मोर्ले याने याचे लिहिलेले चरित्र वाचनीय आहे. ते पुस्तक बरेच लोकप्रिय झाले.