विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बरौंध – मध्यहिंदुस्थानांत, वाघेलखंडाच्या पोलिटिकल एजंटाच्या हाताखालील एक लहानसे सनदी संस्थान. क्षेत्रफळ २१८ चौरस मैल. येथील राजघराणे जुने असून ते रघुवंशी सौर रजपूत वंशातील आहे. ह्या घराण्याचें मूळ ठिकाण बांडा जिल्ह्यामध्ये रासिन येथे होते. याचा प्राचीन इतिहास उपलब्ध नाही. बुंदेलांच्या अमदानीत पन्नाच्या हिर्देशहाने येथील राजास सनद दिली होती. ब्रिटिशांनी १८०७ साली नदी सनद देऊन हा प्रदेश राजा मोहनसिंगाकडे कायम केला. १८६२ साली येथील राजाला दत्तक घेण्याबद्दल सनद मिळाली. राजाला ९ तोफांची सलमी मिळते. लोकसंख्या (१९११) १६९८२. येथे बाघेलखंडी भाषा चालते. संस्थानचे वार्षिक उत्पन्न १५००० रु. आहे. संस्थानचे मुख्य ठिकाण बरौंध हे आहे.