विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बॅरोटसेलँड - दक्षिण मध्यआफ्रिकेतील एक देश. या देशाचा बहुतेक भाग ब्रिटिश संरक्षणाखाली आहे. यांत -होडेशियाचा समावेश होतो. या ठिकाणी बॅरोटसे लोक राहतात म्हणून या देशाला हे नांव पडले आहे.
ज्या विस्तार्ण मैदानांतून झांबेझी नदी वाहते त्या मैदानांत ब्यारोटसे लोक राहतात. कित्येक लोकांच्या मते हे लोक मॅशोनालँड येथील लोकांचीच एक शाखा आहे. परंतु सर्वमान्य समज असा आहे की, हे लोक फार पुरातन काळी अति लांबून ईशान्येकडून या ठिकाणी आले. १९ व्या शतकाच्या आरंभी बासुटी लोकाची एक पोटजात येथे येऊन तिने बॅरोटसे लोकांना जिंकले व त्या प्रदेशावर आपला अंमल बसविला. पण १८६५ साली बॅरोटसे लोकांनी बंड करून बासुटो ज्ञातीचा मुख्य म्याकोलोलो याची सत्ता नष्ट करून आपली सत्ता पुनरपि स्थापन केली.
आफ्रिकेतील नीप्रो लोकांहून बॅरोटसे लोक फार बुध्दिमान आहेत. ते काळया रंगाचे, उंच व सुबक बांध्याचे आहेत. जातीचा मुख्य, नंतर त्याचे वंशज व त्यांच्या खाली जातीतील इतर लोक बहुतेक गुलामाच्या दर्जाचे, असे या लोकांत सामाजिक दर्जे आहेत. १९०६ साली ही गुलामगिरीची संस्था मोडण्यांत आली. जातीचा मुख्य एकटाच राज्यकारभार पहात नाही तर त्याला त्याच्या राणीची सहकारिता असते. ही राणी त्याची बायको नसून वडील बहीण असते. याच्या मरणाबरोबर हिची सत्तादेखील लयास जाते. या लोकांचे कायदे प्रगतिक असून त्यांच्या बुध्दिमत्तेचे निदशर्क आहेत. मुख्यावर जर एखादा आरोप शाबीत झाला तर त्याच्या समान दर्जाचे लोक त्याची चौकशी करतात. हे लोक सूर्योपासक आहेत. हे आपल्या पूर्वजांच्या भुतांची देखील पूजा करतात. १८८४ साली याठिकाणी प्रॉटेस्टन्ट पंथी ख्रिस्ती धर्माचा प्रवेश झाला व लेवानिका या मुख्याचा वडील मुलगा लेटीआ हा व इतर लोक ख्रिस्तोपासक बनले.
बॅराटेसेलॅड हा अवाढव्य मुलूख पश्चिमेत क्किटो नदीपासून पूर्वेस काफ्यु नदीपर्यंत व उत्तरेस कांगो-झाबेझी या जलविभाजक क्षेत्रापासून दक्षिणेस लिन्यांटी व झांबेझी नदीपर्यंत पसरला आहे. याचे पुढीलप्रमाणे विभाग करता येतीलः-(१) मध्यप्रांत- या ठिकाणी बॅरोटसे लोकांचा मुख्य स्वतः राज्यकारभार पाहतो. (२) सरहद्दीजवळील प्रांत- येथील राज्यकारभार उपमुख्याकडे सोपविला आहे. आणि लोक मुख्याला जबाबदार आहेत.
१८८९ च्या सनदेने ब्रिटिश दक्षिणआफ्रिका कंपनीने मध्यझांबेझीच्या उत्तरेकडील प्रदेशावर आपले राज्य स्थापिले व १८९१ साली ग्रेटब्रिटन व पोर्तुगालमधील तहाने बॅरोटसे लोकांचे राज्य ब्रिटिश हुकमतीखाली घेण्यांत आले. ब्रिटिश अंमलदाराच्या शासनाखाली एक तद्देशीय शिपायांची पलटण उभारण्यांत आली. मुलकी अंमलदार व जिल्हाधिकारी नेमण्यांत आले. कंपनीने अद्यापपावेतो बॅरोटसे लोकांच्या अन्त:कारभारांत हात घातला नाही. पण हळू हळू त्यांच्यावर पाश्चात्य संस्कृतीची छाप पाडण्याचे प्रयत्न सुरू करण्यांत आले. देशात यूरोपियनांचा भरणा होऊं लागला व असें सांगतात की, पाश्चात्य संस्कृतीवर लुब्ध होऊन लेवानिका या मुख्याने 'माझा मुलुख आपल्या ताब्याखाली घ्या' अशी ब्रिटिश राणीसाहेबास आग्रहपूर्वक विनंती केली.