विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बरी साद्री – राजपुताना, उदेपूर संस्थानांतील याच नांवाच्या जहागिरीचे मुख्य शहर. हे उदेपूर शहराच्या आग्नेय बाजूने पूर्वेस सरासरी ५० मैलांवर आहे. लोकसंख्या चार हजार. ही जहागीर मेवाडच्या वडील सरदाराकडे आहे. त्यास राजा म्हणतात हीत एकंदर ९१ खेडी आहेत. उत्पन्न सरासरी ४८००० रु आहे. व ८२० रुपये खंडणी इंग्रज सरकारला दिली जाते. येथील सरदार झाला रजपूत आहेत. यांनी १६ व्या शतकाच्या आरंभी काठेवाडांतील झालवाड रक्षण करून ही मिळविली व 'राजा' ही पदवी, राण्याच्या जवळची मानाची जागा व मेवाडचे निशाण नेण्याचा आणि राजवाडयापर्यत आपला नगारा वाजविण्याचा अधिकार वगैरे हक्क मिळावले. हे हक्क त्यांच्या वंशाकडे अद्याप आहेत.