विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बरहामपूर – मद्रास, गंजम जिल्ह्यांतील अगदी पूर्वेकडील एक तालुका. क्षेत्रफळ ५७१ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) २७५४५४. या तालुक्यांत ५४९ खेडी असून बरहामपूर, इच्छापुरम् आणि गंजम ही तीन मोठी गांवे आहेत, पैकी बरहामपूर हे मुख्य ठिकाण (लोकसंख्या ३२७३१) आहे. या गांवी उत्तम रेशमी कापड विणले जाते. येथे एक साखरेचा कारखानाहि आहे.
(२) बंगाल इलाख्यांत मुर्शिदाबाद जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे गांव भागीरथी नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे. लोकसंख्या (१९११) २६१४३. याच ठिकाणी १८५७ सालांत १९ नंबरच्या पलटणींतील शिपायांनी बंड केले होते. येथे एक कॉलेज व त्याला लागूनच एक हायस्कूल आहे. यशिवाय येथे तेलाची व सरकी काढण्याची गिरणी व सुतारकामाचा कारखाना आहे, लोकांचे येथील हेच मुख्य उद्योगधंदे आहेत.