विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बरद्वान, जमीनदारी – बंगाल प्रांतांत ही एक जमीनदारी आहे. क्षेत्रफळ ४१९४ चौरस मैल. जरी ही १९ जिल्ह्यांत विभागली आहे तरी हिचा मुख्य भाग बरद्वान, मानभुम, हुगळी व बीरहुम ह्या जिल्ह्यांत आहे.
१६५८ साली कोणी अबूराई नावांचा लाहोरचा एक कापूरखत्री येथे आला व तो फौजदाराच्या हाताखाली रीकाबी बाजाराचा चौधरी व कोतवाल झाला. ह्या अबूराईपासूनच बरद्वान राजांच्या वंशास सुरवात झाली असें समजतात. १६९६ साली येथील जमीनदाराला बंडखोर सुभासिंगाने मारले. पण कुमारीराजाने सुभासिंगाचा खून करुन सूड उगविला. १७४१ त चित्रसेनराय यास राजाची पदवी दिली. प्रसिध्द राजे - कीर्तिचंद्र (१७०२ -४०) तिलकचंद्र (१७४४ -७१), महताबचंद (१८३२ -७९) अफताबचंद (१८८१ – ८५) इत्यादी सध्याचे राजे महाराजाधिराज बहादुर विजयचंद हे १८८७ साली गादीवर आले. यांना सर ही पदवी असून कायदेमंडळ व कार्यकारीमंडळ यांत यांनी काम केलेले आहे. व ब-याच सार्वजनिक संस्थांशी त्यांचा संबंध आहे. यांना अनेक पदव्या मिळाल्या आहेत.
१७ व्या शतकांत ह्या जमीनदारीत फक्त ६।७ परगण्यांचाच समावेश होत होता. पण महाराजा कीर्तिचंद्र ह्यानें ५७ परगणे आपल्या ताब्यांत घेतले.
१७६० साली बरद्वान जेव्हा कंपनीस दिला गेला तेव्हा एकंदर सारावसुलीउत्पन्न तीन वर्षांचे पावणेबत्तीस लाख होते. बंगालच्या परमनंट सेटलमेन्टच्या वेळी महाराजानें एकंदर ४०१५१०९ रु. नगदी व १९३७२१ रु. पूलबांधणीबद्दल सरकारास देऊं केले. नंतर पटणी कास्तकारी काढून (निर्माण करून) त्यानें पैशाची भरपाई करणे सुरू केले १८९१ ते १८९३ च्या दरम्यान ह्या जमिनींची (ह्यांनां खास महाल हे नामाभिधान आहे) फेरतपासणी करून सारा ठरविण्यांत आला. बरद्वानचा राजा सा-या हिंदुस्थानांतील राजांपेक्षा सर्वात जास्त महसूल देतो.
जि ल्हा - बंगाल प्रांतातील बरद्वान विभांगातील एक जिल्हा. क्षेत्रफळ २७०३ चौरस मैल. अर्ध्या अधिक जिल्ह्याची जमीन सपाट आहे. ह्या जिल्ह्यांतून वाहणा-या दामोदर द्वारेकश्वर, खरी, बांका आणि अजय ह्या नद्या भागीरथीस अथवा हुगळीला जाऊन मिळतात. पाऊस ५४ इंच पडतो.
सातव्या शतकांत गुप्तवंशाचे राजे राज्य करीत होते त्यावेळी हा जिल्हा कर्णसुवर्णनामक राज्याचा एक भाग असून सेनवंशाच्या लोकांच्या ताब्यांत होता. मुसुलमानी इतिहासांत १५७४ साली पहिल्यानेच बरद्वानचा उल्लेख केलेला आढळतो. दाऊदखान ह्याचा पराभव होऊन तो राजमहल येथे मरण पावल्यावर त्याच्या कुटुंबांतील लोकांस अकबराने बरद्वान येथे पकडले. त्यांनतर दाऊदच्या मुलाच्या मोंगल सैन्याशी ज्या पुष्कळ लहान लढाया झाल्या त्या ह्याच जिल्ह्यांत झाल्या. सन १६२४ मध्ये राजपुत्र खुरम (शहाजहान) ह्यानें बरद्वान शहर व किल्ला दोन्ही हस्तगत केली. तदनंतर लवकरच अबुराई नांवाच्या एका कापूर खत्रीने पंजाबातून येथे येऊन बरद्वानराज नांवाचे संस्थान बसविले. नंतर १६९६ साली सुभासिंग नांवाच्या चितुआव वर्धा येथील जमीनदाराने बदद्वानच्या राजाचा खून केला.
१८ व्या शतकाच्या सुमारास मराठे लोक काटवा येथे आले व अंदाजे ५० वर्षे ह्या जिल्ह्यांत फार धुमाकूळ घातला. बंगालच्या गव्हरर्नच्या गादीवरून मीजाफरखानास काढून त्याऐवजी मीर कासीमखान यास त्याच्या गादीवर बसविले. ह्याबद्दल मीर कासीमखानाने कंपनी सरकारास १७६० साली बरद्वान, मिदनापूर व चित्तगांव हे जिल्हे दिले. सन १८०५ मध्ये विष्णूपूर जमीनदारी महाल जंगलास जोडली आणि १८१९ साली हुगळीहि वेगळे करण्यांत आले. बरद्वान जिल्ह्यास सध्याचे स्वरुप १८८५ साली मिळाले.
सेन पहारी जवळ गढजंगलामध्ये राजा चित्रसेनाने बांधलेल्या किल्ल्याचा एक मोडकातोडका भाग अवशिष्ट आहे. १९२१ साली लोकसंख्या १४३८९२६ होती. बंगाली राही नांवाची भाषा येथे बोलतात. शें. ८० लोक हिंदु आहेत. जिल्ह्याचा बहुतेक भाग सुपीक आहे. यांत बागाईत होते.
असनसोल पोटविभागात अन्दालपासून बराकपूरपर्यंत सर्वत्र कोळसा सांपडतो. अलीकडे खाणीतून कोळसा काढण्याचे काम मोठया प्रमाणावर सुरू आहे. राणीगंज येथून ११ मैलांवर बारूल येथे लोंखडाची खाण आहे. राणीगंज येथे मातीची भांडी करतात. पूर्वी रेशमी व सुती कामाचे असे महत्वाचे दोन धंदे होते. तांब्याचे कारखाने देन्हार, बेगनखोला, बनपास वगैरे ठिकाणी आहेत, व खुद्द बरद्वान येथे चाकू सु-यांचा व दिग्ननर येथे एक रंगाचा कारखाना आहे. ह्या जिल्ह्यांत कित्येक महत्वाचे कारखाने आहेत. येथून लोंखड व कोळसा खेरीजकरून तांदूळ, कडधान्य, पेंड वगैरे जिन्नस बाहेर पाठविले जातात. राणीगंज, असनसोल व बरद्वान ही व्यापाराची मुख्य ठिकाणे असून पश्चिम भागांत म्हणजे संयुक्तप्रांताकडे येथून बरेच धान्य पाठविले जाते. या जिल्ह्यांतून ग्रडट्रंकरोड जातो. भागीरथीच्या पात्रावरहि होडयांतून व्यापारी मालाची बरीच ने आण होते. शेकडा नऊ लोकांना लिहितावाचता येते.
श ह र (वर्धमान) - हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून बांकानदीवर वसलेले आहे. लोकसंख्या सुमारे ३५ हजार. राजपुत्र खुर्रमने १५२४ साली हे शहर घेतले तेव्हापासून ह्या शहराचा इतिहासांत उल्लेख आढळतो. १६९६ साली बंडखोर सुभासिंगाने हे शहर घेतले. येथे महादेवाची १०८ देवळे आहेत असे म्हणतात. दोन तेल काढण्याच्या गिरण्या असून एक चाकूकात्र्यांचाहि कारखाना आहे. कांचन येथे दरवर्षी मोठी जत्रा भरते. या शहरास म्युनिसिपालिटी १८६५ साली मिळाली. येथे उत्तम त-हेची नवार होते, येथे बरीच हायस्कुले असून बरद्वानराज कॉलेज आहे.