विभाग आठरावा : बडोदें ते मूर

बफली – अमेरिका. संयुक्तसंस्थानातील न्यूयॉर्क संस्थानामधील एरी काउंटीचे हे मुख्य शहर व बंदर आहे. लोकसंख्येच्या मानाने संस्थानांत हे दुसरे असून संयुक्तसंस्थानांत ८ वें आहे. एरी सरोवराच्या पूर्व टोंकावर हे वसले असून नायगर नदीच्या टोकावर आहे. हे शहर फारच आरोग्यकारक आहे. येथील रस्ते रुंद असून गांवासभोवती सुंदर उद्याने आहेत. यांत डेलावेअर नावाची मोठी बाग आहे. येथली इमारती फार प्रेक्षणीय आहेत. त्यांत फेडरल बिल्डिंग, सिटी ऍंड काउटी हॉल, विश्वविद्यालय, सेंट जोसेफ चर्च व सेंट पॉल कॅथेड्रल व दुसरी चर्चे आहेत.

मुलांच्या शाळा व शिक्षक तयार करण्याच्या ब-याच शाळा येथे आहेत. त्याशिवाय बफलो विश्वविद्यालय व कॅनिसियस कॉलेज याहि संस्था आहेत. येथील वाचनालयांत सुमारे ३ लाख पुस्तकें आहेत. दुसरीहि कांही वाचनालये येथे आहेत. रुग्णालये बरीच असून सोईची व व्यवस्थित आहेत. त्याचप्रमाणे गरीब लोकाकरिता व वेडयांकरिता वसातिस्थानेंहि आहेत. येथील लोकसंख्या (१९२०) सुमारें ५ लाख आहे. जर्मन लोक सर्वांत जास्त असून पोलिश कॅनेडियन आयरिश व ब्रिटिश लोकहि येथे आहेत.

हें शहर व्यापाराचे एक केंद्रस्थान आहे. सरोवरांतून येथील बराच व्यापार होतो. घोडयांचा बाजार सर्व अमेरिकेंत येथे फार मोठा आहे. त्याचप्रमाणे धान्य, लाकूडसामान, मासे, लोखंडाचे दगड यांचाहि येथे व्यापार आहे.