विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बदामी, तालुका - मुंबई इलाखा. विजापूर जिल्ह्याचा नैर्ॠत्येकडील तालुका. क्षेत्रफळ ६१५ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) १०८२०२. या तालुक्यांतील हवा जिल्ह्यांतील इतर ठिकाणाच्या मानानें फार वाईट आहे. मुख्य ठिकाण बदामी हे आहे. गुळेदगुड व केरूर ही मोठी गांवे या तालुक्यांत आहेत.
गांव - तालुक्याचे मुख्य ठिकाण. हे सदर्नमराठा रेल्वेचे स्टेशन आहे. लोकसंख्या (१९०१) ४४८२. हिंदु व जैन लोकांनी तयार केलेली लेणी येथे आहेत. त्यांपैकी अनंतावर बसलेली नृसिंहाची मूर्ति अद्याप चांगली आहे. येथे दोन किल्ले आहेत, उत्तरेस बावनबंदे व दक्षिणेस रणमंडळ किल्ला. या गांवी ह्युएनत्संग सातव्या शतकाच्या आरंभी आला होता. पुष्कळ वर्षे हे गांव विजयानगरच्या व नंतर मराठयांच्या राज्यात होते. सन १८१८ त ते इंग्रजांच्या हातांत आले. सन १८४० त निजाम राज्यांतील १२५ अरबांनी एका आंधळया ब्राह्मणाच्या सेनाधिपत्याखाली या गांवावर हल्ला करुन खजिना व बाजार लुटला.