विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बदाउन, जिल्हा - संयुक्त प्रांत. बरेली विभागाचा नैर्ॠत्येकडील जिल्हा. क्षेत्रफळ १९८७ चौरस मैल. हा जिल्हा बहुतेक सपाटीचा असून यांतून पुष्कळ नद्या वाहतात. खोत किंवा यार-इ-वफादार, महाव, रामगंगा व गंगा या मुख्य नद्या आहेत. रोहिलखंडाच्या इतर जिल्ह्यांप्रमाणेंच या जिल्ह्याची हवा आहे.
इतिहासः - दहाव्या शतकाच्या आरंभी बुध्द नांवाच्या अहर राजाने एक गांव वसविले त्यावरून या जिल्ह्याला बदाउन असे नाव पडले. मुसुलमानी सैन्याने हिंदुस्थानांत पूर्वेकडे जाण्यास सुरवात केली त्यावेळी येथे लखणपाल नांवाचा राठोड राजा राज्य करीत होता. दंतकथेंत वर्णिलेला सय्यद सालर राजा कांही काळ बदाउनमध्ये रहात होता असें म्हणतात. पण कुतुबद्दीन ऐबकने या राजाना मारून शहर लुटले (११९६) त्यावेळेपासून विश्वसनीय इतिहासाला सुरवात होते. कुतुबद्दीनच्या मागून शम्सुद्दीन अल्तमश आला. १२१० साली ही सुभेदारी सोडून तो दिल्ली येथे तक्तारूढ झाला. त्याच्यामागून आलेल्या सुभेदारांच्या अंमलांत बदाउनला बरेंच महत्व असून १२३६ साली या शहरानें दिल्लीस दुसरा बादशहा-रुकनुद्दीन- दिला. १३ व्या व १४ व्या शतकांत स्थानिक बंडे व रक्तपाताशिवाय महत्वाच्या गोष्टी घडलेल्या नाहीत. १४१५ साली मोहबतखान सुभेदाराने खिजरखानाविरुध्द बंड करुन ११ वर्षे राज्य केल्यावर १४२६ साली खिजर खानाच्या मागून आलेल्या मुबारकशहाने त्याचा पराभव करुन त्याला शरण यावयास लाविले. सय्यद घराण्यांतील शेवटचा पुरुष अलमशहा हा १४५० साली बदाउनमध्ये येऊन राहिला. त्यावेळी बहलोल लोदीने त्याचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यांत घेऊन फक्त बदाउन जिल्हा अलमशहाकडे त्याच्या हयातीपर्यंत ठेवला. मोंगल सत्ता स्थापन झाल्यावर हुमायूननें संबल व बदाउन यांवर सुभेदार नेमले. पण त्यांचे आपसांत न पटून संबलच्या सुभेदाराने आपल्या प्रतिपक्ष्यास ठार मारून बदाउन आपल्या ताब्यांत घेतले. अकबराच्या कारकीर्दीत (१५५६) बदाउन हा दिल्ली सुभ्यांतील एक सरकार करून कासीम अल्लीखानाला लष्करी जहागीर म्हणून देण्यांत आला होता. शहाजहानच्या वेळी बरेली ही राजधानी झाली. येथे रोहिल्यांची सत्ता वाढत जाऊन बदाउनचा -हास जोराने होऊं लागला. महमंदशहाच्या कारकीर्दीत (१७१९) महंमदखान बंगष यानें बदाउन शहरासुध्दां जिल्ह्याचा अग्नेय भाग फरुखाबादला जोडला, व उरलेला भाग अल्ली महंमदाच्या हाताखाली रोहिल्यांनी बळकावला. पण १७५४ साली फरुखाबादला जोडलेले परगणे रोहिल्यांनी मिळविले. १७७४ साली बुंदेलखंडाच्या इतर भागांबरोबर बदाउन जिल्हा अयोध्येच्या नवाबाच्या हाती गेला. व अखेर १८०१ साली इतर प्रदेशाबरोबर तो इंग्रजांना देण्यांत आला.
जिल्ह्याची लो.सं.(१९२१) ९७५३४७ पैकी शें. ८३ हिंदु आहेत. येथे पश्चिम हिंदीची व्रज नावाची पोटभाषा चालते. हिंदूंमध्ये मुख्य जात अहर ( हे शेतकरी आहेत) ही आहे. शेकडा ६७ पेक्षा जास्त लोक शेतकीवर पोट भरतात. गहू व ज्वारी ही मुख्य पिके असून तांदूळ व ऊस हीहि थोडी बहुत होतात. संयुक्त प्रांतातील इतर भागाप्रमाणे येथे थोडी बहुत होतात. संयुत्तच् प्रातांतील इतर भागांप्रमाणे येथे जमीनदारी, पट्टीदारी व भय्याचारा या पध्दती चालू आहेत. साखर करणे हा येथील मुख्य धंदा आहे. कापड विणणे, सुतारकाम, पितळी काम वगैरे कामे साधारण प्रतीची होतात. दळणवळणाची साधने कमी असल्याने येथे व्यापाराची वाढ चांगली झालेली नाही. एके काळी व्यापाराची मोठी ठाणी असलेल्या बिल्सी व सहस्वान ह्या गांवांना हल्ली कांहीच महत्व उरलेले नाही. औध-रोहिलखंड-रेल्वेची बरेली पासून अलीगडकडे जाणारी शाखा जिल्ह्याच्या उत्तरभागांतून जाते. आगगाडीचा दुसरा एक फांटा बरेलीपासून निघून बदाउनवरून गेलेला आहे. साक्षरतेमध्ये संयुक्तप्रांतांत हा जिल्हा फारच मागसलेला आहे.
त ह शी ल - बदाउन जिल्ह्याची मुख्य तहशील. क्षेत्रफळ ४४२ चौरस मैल. लोकसंख्या (१९९१) २५१७५९. बदाउन व उझानी ही मोठी गांवे व खेडी ३८० आहेत. तालुक्याचा बराच भाग कटेहर या सुपीक प्रदेशांत आहे.
गां व - जिल्ह्याचे व तालुक्याचे ठाणे. हे गांव इतिहासांतील पुष्कळ प्रसंगी पुढे आले आहे. कांही दंतकथान्वये हे गांव राजा बुध्द अहर यानें किंवा अजयपाऴ नांवाच्या त्याच्या वंशजाने इ.स.९०५ मध्ये बसविले असावे असा अंदाज आहे. या ठिकाणी एक देवालय बांधल्याचे आणि येथे राठोड वंशांतील अकरा राजांनी राज्य केल्याचे इ.स च्या १२ व्या शतकाच्या आरंभीच्या एका खोदीव लिखांणात नमूद केले आहे. त्यांत या गावांस 'बोदामयुन' असे नाव दिले आहे. इ.स. १०२८ मध्ये 'सय्यद सालीर' याने हे गांव घेतल्याबद्दलहि एक दंतकथा आहे. पण इ.स. ११९६ त कुतुबुद्दीन ऐबक यानें हे गांव काबीज केल्याचा ऐतिहासिक पुरावा आहे, व तेव्हांपासून निरनिराळया मोंगल व पटाणबादशहांच्या अमदानीत हें नांवारुपास आलें व कांही वेळ स्वतंत्र संस्थान म्हणून देखील होते. १८३८ साली ब्रिटिशांच्या कारकीर्दीत हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण झाले, व १८५७ सालच्या बंडात येथील लोकांनी (खजीनदार अंमलदारासह) बराच भाग घेतला होता व त्यावेळी हें काही दिवस हिंदूंच्या ताब्यात राहिले बंडानंतर सर्वत्र शांतता झाल्यावर पुन्हा हे पूर्ववत ब्रिटिशांच्या जिल्ह्याचे ठिकाण झाले. ते अद्यापि भरभराटीत आहे.
येथे इ.स. १२२३ मध्ये सुलतानशमसुद्दिन अल्तमश याने बांधलेली मशीद आहे. तिला येथील देवळाचे बरेंच सामान लाविले आहे. येथे मोंगलाच्या वेळचे असंख्य दर्गे असून त्यांत सुलतान अल्लउद्दीन व त्याची पत्नी यांच्या कबरी आहेत. तसेच अकबराच्या नवरत्नांतील प्रसिध्द कवि अबुल फजल याचा प्रतिस्पर्धी 'बदाउनी' (बदौनी) याची ही जन्मभूमि आहे.