विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बदक्शान - अफगाणिस्तानच्या ईशान्य सरहद्दीवरील रशियन राज्याच्या लगतचा प्रांत, यांत वाखानचा समावेश होतो. या प्रदेशांत आग्नेयीकडून वायव्येकडे कोक्यानदी वाहते इतर नद्या कुंडुझ व मिंजन ह्या होत. मुख्य पाळीव जनावरें म्हटली म्हणजे याक, शेळया, गाई, बकरे, तट्टे, छानदार कुत्रे व बॅक्ट्रियन उंट ही होत. जंगली शेळी (ओव्हिस पोली), कोल्हे, लांडगे, अस्वलें, डुकरे, हरीण व चित्ते ही जंगली जनावरे या देशांत सांपडतात. तितरे, चिमण्या, चंडोल, ससाणे हेच काय ते पक्षी सांपडतात.
या देशांत ताजिक, तुर्क व अरब लोक राहतात. हे लोक फारशी व तुर्की भाषा बोलातात. हे सुनी आहेत; पण डोंगरी भागांत शियापंथाचे व निरनिराळया भागांत निरनिराळया भाषा बोलणारे ताजिक लोक राहतात.
इ ति हा स. – बदक्शान हा ग्रीक बॉक्ट्रियाचा भाग आहे. इ.स. ६३० – ६४४ या वर्षी ह्युएनत्संग या देशात आला होता. दहाव्या शतकांतील अरब भूगोलवेत्ते येथील पाच व हिरेमाणके यांच्या खाणी व वाक्ष व खोटल या मोठया शहरांची व येथील भराभराटीच्या व्यापाराची माहिती देतात. १२७२-७३ साली मार्कोपोलो व त्याचे सोबती येथे कांही काळपर्यंत राहिले. या व पुढील काळांत येथे जे राजे झाले ते आपणांस शिकंदराचे वंशज असे म्हणवीत असत. यांपैकी शेवटचा राजा शहा महमंद हा १५ व्या शतकाच्या मध्यकाली मरण पावला व त्याच्यामागे त्याच्या विवाहित मुलीच गादीवर होत्या. १५५० च्या सुमारास उसबेग लोकांनी या देशाचा ताबा मिळविला, परंतु त्यांनां लवकरच हांकून लावण्यात आले व नंतर या देशावर जुन्या राज्यघराण्यांतील स्त्रियांचे वंशज राज्य करीत असत. १८ व्या शतकाच्या मध्याच्या सुमारास मीर लोकांच्या सध्याच्या घराण्यानें या देशाचा ताबा मिळविला, या वेळेस जुने घराणे नाहीसे झाले होते. १७६५ साली काबूलच्या राजाने या देशावर स्वारी करून त्याची धूळघाण उडविली. १९ व्या शतकाच्या पहिल्या तीस वर्षांत कुंदझच्या उसबेग लोकांच्या कोहानबेग व त्याचा मुलगा मुरादबेग या नायकांनी या देशावर स्वा-या करुन हा देश ओसाड केला. मुरादबेग या देशावर स्वा-या करुन हा देश ओसाड केला. मुरादबेग मेल्यावर महंमद अमीरखान नांवाच्या दुस-या एका उसबेगाच्या हातांत येथील सत्ता गेली. १८५९ साली काटाघान उसबेग लोकांनां हाकून लावण्यांत आले, व सध्यांच्या राजघराण्यांतील मीर जहांदरशहाला अफगाण लोकांच्या अधिपत्याखाली पुन्हा गादीवर बसविण्यांत आले. १८६७ साली अबदुर रहमानाने त्याला हांकून देऊन त्याच्या जागी मीर महंमदशहाला बसविले व त्याच्या मागून त्याच्या घराण्यांतील दुसरे लोक गादीवर बसले.