विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बदके – हिंदुस्थानांत आणि विशेषेंकरून महाराष्ट्रांत शेतकरी लोक सहसा बदकें व इतर प्राणी पाळीत नाहीत. याचें कारण ते स्वतः त्यांची अंडी, मांस वगैरे खात नाहीत आणि दुसरे त्यांजपासून फायदा किती होईल, त्यांस कसें पाळावयाचे वगैरेबद्दल त्यांस माहिती नसते. बहुतकरून मुसुलमान, इस्त्रायल लोक, युरेशियन व नेटिव्ह ख्रिस्ती लोक आपल्या घरच्या उपयोगाकरिता म्हणून कांही थोडी बदके बाळगतात.
बदके सहापासून आठ महिन्यांची झाली म्हणजे अंडी घालूं लागतात. यांची अंडी कोंबडीच्या अंडयांपेक्षा बरीच मोठी असतात. बदके एक वर्षाची होईपर्यंत त्यांचा संयोग न करणे चांगले. बदके पुष्कळ प्रमाणावर बाळगणे झाल्यास चार माद्यांस एक नर याप्रमाणे ठेवावी. एका कळपांत दोन नर व आठ माद्या यांपेक्षा जास्त ठेवूं नयेत, व सर्व जाती निरनिराळया ठेवाव्या. कांही कांही जाती फार भांडखोर असतात, उदाहरणार्थ, मास्कोव्हे, या जाती एके ठिकाणी मिसळल्यास त्यांत नेहमी भांडणे होतात. तसेंच कोंबडया व बदके एके ठिकाणी ठेवल्यास त्यापासून कोंबडयांनां फार त्रास होतो म्हणून बदांकांना नेहमी वेगळे चांगले. बदकांना नेहमी शांतता आवडते, त्यांचे पाय फार नाजूक असतात. व त्यांना फार पळविल्यास कांही तरी भयंकर इजा होऊन ती कायमची अधू होतात, म्हणून त्यांस घाबरवू नये. बदकांस पकडावयाचे असल्यास त्यांस घराकडे हांकलून नेऊन तेथे धरावे. बदके उचलावयाची असल्यास मानेच्या जवळ धरुन उचलतात कोंबडयांसारखे पाय धरुन उचलीत नाहीत. बदकांत नर ओळखावयाचा झाल्यास त्याच्या शेपटीत एक कुरळे पीस असते त्यावरुन ओळखतात, तसेंच त्याच्या आवाजावरुनहि त्यास ओळखता येते. मादीचा आवाज नराच्या आवाजापेक्षा फार मोठा व घोंगरा असतो. नराचा आवाज कोता व बारीक असतो.
बदकांची अंडी उबविणे झाल्यास ती बदकांखाली ठेवण्यापेक्षा कोंबडीखाली ठेवल्यास चांगली उबतात. व कोंबडीहि पुढे काही दिवस त्या पिलांचा सांभाळ चांगला करते. एका कोंबडीखाली पांच सहा अंडयांपेक्षा जास्त ठेवूं नयेत. अंडी उबवून पिले बाहेर येण्यास २४ दिवस लागतात. कांही जातींची अंडी उबण्यास ३५ ते ४० दिवसहि लागतात. सतत इतके दिवस एकाच कोंबडीखाली अंडी ठेवण्यापेक्षा दोन कोंबडयाकडे तें काम दिले असता त्यांस फारसा त्रास होत नाही. अठ्ठावीस दिवसांनी पिले बाहेर आली नाहीत तर अंडयाच्या मोठया भागाकडे एक लहानसे भोंक पाडावे व पिलांची चोंच कोणीकडे आहे ते पहावे व चोचीच्या वर अगदी बेताने कवची फोडून त्यांस बाहेर येण्यास मदत करावी व तें अंडे पुन्हां कोंबडीखाली ठेवावे, म्हणजे पिलूं आपोआप बाहेर येईल. यांची अंडी यंत्राच्या साहाय्यानेहि उबवितात. पण या धात्रीमंजूषेचा उपयोग पिले सांभाळण्याकडे मात्र होत नाही म्हणून त्यांस कोंबडीच्या ताब्यांतच द्यावे लागते. पिले बाहेर आली म्हणजे त्यांस खावयास शिकवावे लागते. पिलांनां जे खाणे घालावयाचे ते पातळ करुन घालावे लागते. पहिल्या आठवडयांत दूध, तांदुळाचे पीठ व सातूंचे पीठ एकत्र करुन द्यावे. दुस-या आठवडयांत भरडलेले गहूं, भरडलेले सातू, तांदुळाच्या कण्या व थोडेसे मांस दुधांत किंवा पाण्यांत एकत्र करुन द्यावे. कधी कधी हरभ-याची डाळ आणि भात घालावा. वर सांगितलेले अन्न शिजवून घातलेले फार चांगले. हेच अन्न पिले दीड दोन महिन्यांची होईपर्यंत घालावे. लहानपणी अन्न वरचेवर घालावे लागते. परंतु पुढे ते दिवसांतून तीन चार वेळ घातले तरी चालते. बदकें लहान असतांना त्यांनां पाण्याची फारशी आवश्यकता नसते. परंतु ती मोठी झाल्यावर त्यांच्या शेजारी एखादे पाण्यानें भरलेले भांडे सदोदित ठेवावे लागते. शेजारी नदी, तलाव वगैरे असल्यास फारच उत्तम. बदकांनां लहानपणी अंगण थोडे असले तरी पुरते, परंतु मोठेपणी ते निदान कमीतकमी १२ * १२ चौरस फूट असावे लागते कोंबडयांप्रमाणे यांनांहि हिरवे अन्न, वाळू, चुना वगैरेंची आवश्यकता आहे.
बदकांकरिता घरे बांधावयाची झाल्यास प्रत्येक बदकास चार चौरस फूट जागा मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे. आठ फूट लांब व सहा फूट रुंद एवढया घरांत एक डझन बदकें राहूं शकतील. या घरांस जोडून एक आवार दोनशे चौरस फुटाचे असावे व हे चोहो बाजूंनी तारेच्या जाळयाने किंवा दुस-या कशाने तरी बंद करावे. बदके रात्री अंडी घालू लागतात व त्यांची सकाळी दहा वाजेपर्यंत अंडी घालण्याची वेळ असते. म्हणून तोपर्यंत त्यांस आवारांतून बाहेर सोडू नये. अंडी घातल्यानंतर त्यांनां शेजारी असलेल्या तळयांत अगर टांकीत सोडावे. तळे नसेल तर टाकी बांधणे अवश्य आहे. ही टाकी बदकांच्या घराच्या आवारांतच बांधावी व आवार शक्य तितके मोठे ठेवावे. २४ बदकांना बारा फूट लांब, आठ फूट रुंद व तीन फूट उंच एवढी टांकी लागते. या टांकीतून पाणी वरच्यावर काढता येईल व नवे घालता येईल अशी योजना असावी.
बदकांनां कोणतेहि खाणे घातले तरी चालते असे जरी आहे तरी विशेष प्रकारचे खाणे घातल्यास त्यांचे मांस अधिक रुचकर व चवदार होते. सर्वांत उत्तम अन्न म्हणजे गव्हाचा कोंडा, सातूचा भरडा, तांदुळाचा कोंडा, भात व मासांचे तुकडे वगैरे एकत्र करुन शिजवून पातळ करुन घालणे. लांकडाच्या फळीचा एक अरुंद परंतु लांब असा रहाटास पन्हळ लावतात त्याप्रमाणे पन्हळ करावा व त्यांतून अन्न खावयास घालावे. बदकांनां दिवसांतून दोन वेळ अन्न खावयास घालावे. अंडी घालणा-या बदकांनां इतर बदकांपेक्षा जास्त अन्न लागते.
ब द कां च्या जा ती. – बदकांच्या मुख्य जाती सहा आहेत. त्यांच्या माहितीचे कोष्टक पुढे दिले आहे, परंतु या जातीचे हल्ली पुष्कळ मिश्र संयोगहि प्रचारांत आहेत. या जाती सुधारावयाच्या झाल्यास कोंबडयांप्रमाणेच त्यांचे संयोग करावे लागतात. या जातींपैकी कांही जाती कोंबडयांप्रमाणेंच लठ्ठ करतां येतात व त्याकरितां त्यांनां पीवरीकरणमंजूषेत ठेवावे लागते. आणखी विशेष माहिती ''कोंबडया'' या सदराखाली मिळेल.
बदकांच्या जाती |