विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बत्ता - सुमात्राच्या मध्यभागांत बत्ता नांवाच्या पूर्वी स्वतंत्र असलेल्या प्रदेशांतील रहिवाशी. या लोकांची संस्कृति व भाषा यासंबंधी सविस्तर विवेचन ज्ञानकोश वि.१, पृ. १८८ या ठिकाणी केले आहे. बत्ता लोकांच्या उत्पत्तीबद्दलची माहिती मिळत नाही. हे बहुधां मलायी रक्ताचे असावे. परंतु मलायी लोकांपेक्षां त्यांचे शरीरिक गुणधर्म भिन्न आहेत. त्यांचे खांदे रुंद व अवयव पिळदार असतात. त्यांचा रंग काळसर पिंगट असून डोके लांबट असते. त्यांचे डोळे काळे, मोठे व विशाल असतात. त्यांची रहाणी व पोषाख फार घाणेरडा असून ते कोणतेहि अन्न खातात. ते नरमांस भक्षक आहेत. सुधारलेले बत्ता लोक चांगले शेतकरी असून विणकाम, रंग देणे व उत्तम दुमजली घरे बांधणे वगैरे कामे करतात. त्यांची शासनपध्दती सुव्यवस्थित असून त्यांच्यात वंशपरंपरागत अधिकारी, लोकसभा व दिवाणी व फौजदारी कायदेसंग्रहहि आहेत. भुताखेतांची पूजा करणे हा त्यांचा धर्म होय. हे लोक बत्ता भाषा बोलतात.