विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें
नेपियर, सर चार्लस जेम्स (१७८२-१८५३)- हा ब्रिटीश लडवय्या व मुत्सद्दी, लंडन शहरांतील व्हाइटहॉलमध्यें १७७२ सालीं जन्मला. १७९७ सालीं त्याला लष्करांत नोकरी मिळाली. पुढें तो १८०४ सालीं कॅप्टनच्या व स. १८०६ मध्यें मेजरच्या हुद्दयावर चढला. पोर्तुगालमध्ये कोरुन्नाच्या लढाईत तो मरणोन्मुख होऊन फ्रेंचांच्या हातीं लागला असतां फ्रेंच सेनापतीनें त्याला कैदेत न ठेवितां अंध मातेला भेटण्याकरितां इंग्लंडांत जाण्याची मोकळीक दिली. १८१०-१८११ सालीं तो पुन्हां स्पेन-पोर्तुगालमधील युद्धात सामील झाला. स. १८२२ मध्यें त्यानें सेफालोनिया येथें राहून आठ वर्षे लष्करी रेसिटेंड व गव्हर्नर या जागेवर नौकरी केली. तेथें त्यानें एकतंत्रीपणानें राज्य केलें. पुढे १८०३ साली वरिष्ठ अधिकार्यांशीं भांडून नोकरी सोडून तो इंग्लंडांत परत आला. १८३९ सालीं त्याला इंग्लंडांत पुन्हां नोकरीवर नेमलें. यॉर्कशायर, लँकॅशायर वगैरे ठिकाणीं चार्टिस्ट लोकांचे दंगे मोडण्याचें काम त्यानें केलें. १८४० मध्यें तो हिंदुस्थानांत नोकरीकरितां प्रथम पुण्यास आला. इ.स. १८४२ त गव्हर्नर जनरल एलेन्बरोनें औटराम व इतर पोलिटिकल अधिकारी यांस सिंधमधून काढून ( कारण तो त्यांचा द्वेष करी ) त्या जागीं नेपियर यास मुलकी व लष्करी सर्व अधिकार देऊन आपला खास प्रतिनिधि म्हणून नेमिलें. नेपियरनें पूर्वीचे तह व करामदार सर्व एकीकडे गुंडाळून ठेवून व हिंदुस्थानसरकारची आपल्यास संमति आहे या मानीव आधारावर दरोडेगिरी सुरू करून सिंध प्रांत खालसा करण्यास सुरवात केली (स्मिथ-ऑक्स-हिस्टरी, इंडिया पृ. ६८५). त्याच्या या दडपशाहीनेंच अखेरीस बलुची लोकांनीं त्रासून जाऊन नाइलाजानें कमिशनरच्या बंगल्यावर हल्ला केला (फेब्रु.१८४३). नेपियर तर या संधीचीच वाट पहात होता. त्यानें याचा फायदा घेऊन ताबडतोब लढाई पुकारली. मार्शमन म्णतो कीं, अमीराबद्दल कलुषित मन करुन घेऊनच नेपियर हा सिंधमध्यें प्रथम आला होता. गव्हर्नर जनरलनें त्याच्याकडे अमीरानें केलेल्या ( इंग्रजांच्या म्हणण्याप्रमाणें ) राजद्रोही गोष्टींचा छडा लावण्याचें काम सोपविलें. मात्र त्याबरोबरच अगदीं खात्रीलायक पुरावा असल्याशिवाय निकाल देऊं नये असेंहि फर्माविलें होतें. नेपियरनें प्रथम अमीरावरील तीन आरोपांशिवाय बाकीचे सर्व आरोप काढून टाकले. या तीन आरोपांना आधार काय तो फक्त एक सिंधी भाषेंत लिहिलेलें पत्र होतें. त्या पत्राच्या खरेपणाबद्दल तत्कालीन हिंदुस्थानांतील बहुतेक तत्ज्ञांनां संशय होता, असें असतां व स्वत:स सिंधी भाषा बिलकूल येत नसतां आणि अमीरास आपल्यावरील आरोंपाचें निराकरण करण्याची संधीहि न देतां नेपियरनें ‘’ईजिप्तसारखा सुपीक’’ सिंध प्रांत अमीरास दोषी ठरवून खालसा केला व १८३९ च्या तहास हरताळ फांसला. या कामी अमीराचा एक नातेवाईक अली मुराद याचेंहि साहाय्य त्यास होतें. नेपियरनें तर सिंधमध्यें दरोडेगिरी सुरू केली होती ( मार्शमन-हिस्टरी ऑफ इंडिया, तिसरी आवृत्ती. पृ. ४३१ - ३६ ). तेथील सरदारांचा कांही अपराध नसतांना त्यांचे किल्ले काबीज केले. ज्या अमीराला त्यानें पदच्युत केलें, त्यानेच हैदराबाद येथें (१८४३ फेब्रु.) तेथील प्रजेनें आपलें राज्य हरण केल्यामुळे चिडून नेपियरवर उघडपणें चाल केली असतां नेपियरचें रक्षण करून त्याचे प्राण वांचविले. नंतर प्रजेच्या या बंडाचा मोड करून नेपियरनें अमिराची सर्व संपत्ति लुटली. त्यांत एकट्या नेपियरच्या वांट्यास ७ लाख रु. आले. या एकंदर कृत्यास हॉबहाऊस ( ई. ई. कंपनीच्या बोर्ड ऑफ कंट्रोलचा प्रेसिडेंट ) यानें पाजीपणा व लुच्चेगिरी असें नांव दिलें आहे. या लुटीबद्दल नेपियर व औटराम यांच्यांत भांडणें जुंपलीं होतीं. नेपियरच्या एकंदर कृत्यावर कंपनीच्या अधिकार्यांचा ठपका आल्यानें तो इंग्लंडास परत गेला. पुढें शीख युद्धाच्या वेळीं तो पुन्हां हिंदुस्थानांत आला होता. त्यावेळीं शिपायांनां भत्ता देण्याच्या बाबतींत त्याचा व गव्हर्नर जनरल डलहौसी याचा तंटा होऊन नेपियर राजीनामा देऊन परत गेला, व थोड्याच दिवसांनीं मरण पावला. [ स्मिथ-हिस्टरी ऑफ इंडिया; मार्शमन-हि. इंडिया; एन्सा. ब्रिटा. ]