प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें 
          
पोपसत्ता– पोप हा धार्मिक द्दष्टया ख्रिस्ती धर्मामध्ये प्रीस्ट, विशेष वगैरे जे धर्माधिकारी आहेत त्यांपैकी सर्वात वरिष्ठ अधिकारी असून राजकीय द्दष्टया ख्रिस्ती धर्मात जागतिक राजसत्तेच्या कल्पनेचा अवशिष्ट राजसत्ताधारी प्रतिनिधि आहे. प्राचीन रोमन साम्राज्य भरभराटीत असताना ख्रिस्ती धर्मसंस्थापक झीजस ख्राइस्ट जन्मास आला ते जेरुसलेम शहर ख्रिस्ती धर्माचे आद्य पवित्र स्थान होय. पण पुढे रोमन साम्राज्य व ज्यू लोक यांत झालेल्या युद्धमध्ये जेरुसलेम शहराचे महत्त्व कमी झाले व रोम येथील बिशपला अधिकाधिक महत्त्व येऊन तोच पुढे सर्वात वरिष्ठ अधिकारी उर्फ पोप मानला जाऊ लागला. रोमच्या पोपांची परंपरा सुमारे इ.स. ४१ पासून सुरु होऊन दोन हजार वर्षे सतत चालू आहे. इतक्या दीर्घ काळात या पोपच्या धार्मिक व राजकीय सत्तेत अनेक स्थित्यंतरे झाली असू न ख्रिस्ती समाजांतील धार्मिक व राजकीय या दोन सत्तांमधील पोपकृत लढा इतर धर्मीयांस मनोरंजक व बोधप्रद होण्यासारखा आहे. पोपचा अधिकार वंशपरंपरागत नसून निवडणुकीने प्राप्त होत असतो तरी या गादीवर कांही अत्यंत नालायक इतकेच नव्हे तर नैतिक द्दष्टया अत्यंत दुर्गुणी इसम बसलेले आढळतात. व्हिक्टर या नांवाचे ३, कॅलिक्सटस २, अर्बानस ८, स्टीफेनस १०, सिक्सटस ५, आनास्टासियस ४, इनोसेंटियस ८, बॉनिफेसियस ९, लिओ १३, क्लेमन्स १४, ग्रेगोरियस १६, जोनेस २३, हाड्रिआनस ६, पॉलस ५, ज्यूलियस ३, मार्सेलस २, पायस १०, व इतर अनेक नांवाचे मिळून सुमारे २७० पोप होऊन गेले आहेत.

रोमन चर्च.– ज्यूबरोबरच्या युद्धामुळे रोमन चर्च हे सर्व चर्चमधील प्रमुख बनून इसवी सनाच्या दुसर्‍या शतकात सर्व ख्रिस्ती लोक रोम शहरी गेले; निरनिराळ्या देशातून बिशप वगैरे लोकहि तेथे नेहमी येत असत. रोममध्ये ज्या ज्या गोष्टी घडत त्या त्या गोष्टीचे अनुकरण इतर सर्व चर्चमध्ये करण्यात येई. सर्व यूरोपखंडात रोमन चर्चच्या तोडीचे दुसरे चर्च नव्हते, परंतु आशियात कित्येक चर्च फार भरभराटीत होती. पुष्कळ दिवसपर्यंत आशियातील चर्च व रोमन चर्च यांमध्ये सख्य होते; परंतु इ. स. १९० त ईस्टरच्या सणाबद्दल त्यामध्ये लढा उत्पन्न झाला. रोमचा बिशप व्हिक्टर, याने आशियातील चर्चना कॅथोलिक संघातून काढून टाकिले. तेवहांपासून रोमन चर्च हे विश्वव्यापी आहे असे ठरविण्यात आले. पौरस्त्य देश, आफ्रिका, गोल व स्पेन या ठिकाणच्या धर्मविषयक गोष्टीत रोमचे बिशप अनेक प्रसंगी पडल्याची उदाहरणे आहेत. परंतु कालांतराने इतर कित्येक चर्च प्रबळ झाल्यामुळे, रोमन चर्चचे महत्त्व कमी होते गेले.

कार्थेज, अलेक्झांड्रिया अँटिआक व कान्स्टांटिनोपल या शहरांनीहि आपल्याकडे धर्माधिकार घेतला. पुढे काही कालाने पूर्वरोमन साम्राज्याच्या बादशहांच्या अंमलाखाली तिकडील चर्चे गेली व अशा प्रकारे रोमन चर्चचे त्या चर्चवरील वर्चस्व नाहीसे झाले, कारण रोमन चर्चमध्ये ग्रीक भाषा बंद पडल्यामुळे ग्रीक ख्रिस्ती मंडळ्यापासून रोमन चर्च अगदी भिन्न झाले.

इ. सनाच्या चवथ्या शतकात पाश्चात्त्य देशात रोमन चर्चचे फारसे वजन नव्हते. दमॅशस व सिरीशस या पोपांच्या वेळेपासून, आफ्रिका, स्पेन व गॉल या देशातील कित्येक तंटे निकालासाठी रोमकडे येत असत. मिलन ही पश्चिमरोमन साम्राज्याची राजधानी असल्यामुळे, रोमप्रमाणेच तेथेहि एक पोप होता. यामुळे रोमचे महत्त्व कमी होण्याचा रंग दिसत होता, परंतु इटलीचा उत्तर भाग एरियन लोकांनी बळकाविल्यामुळे व होनोरियस बादशहाने रॅव्हेना ही आपली राजधानी केल्यामुळे ही भीति नाहीशी झाली. परंतु रोमच्या बिशपचे सर्व पाश्चात्त्य बिशपांवरील वर्चस्व बरेच कमी झाले; हे सर्व बिशप स्वतंत्रपणे वागू लागले; परंतु `होली सी’शी मात्र त्यांचा विरोध नव्हता. पूर्व रोमन साम्राज्यांतील चर्चच्या भांडणात सर्व पश्चिमरोमन साम्राज्यातील चर्चना प्रतिनिधी म्हणून पोपने काम करावे हे सर्व बिशपांना संमत होते.

सेंट ग्रेगरी (पहिला).– इ.स. ५९० त सेंट ग्रेगरी (पहिला) याला पोप निवडण्यात आले. या वेळी न्यू रोम ही राजधानी असल्यामुळे, त्या शहराचे रोमवर वर्चस्व असे. स. ७५४ त फ्रँक्स लोकांच्या ताब्यात रोम शहर गेल्यामुळे रोमन चर्च व ग्रीक चर्च यांचा संबंध तुटून गेला. पोपांना बादशहा विचारीनासे झाले. परंतु ग्रीक बिशपांच्या इच्छेविरुद्ध जेव्हां जेव्हां काही गोष्टी करण्याची वेळ येई, तेव्हां तेव्हां कान्स्टांटिनोपलचे बादशहा पोपची मदत घेत असत. पहिल्या ग्रेगरीने स्वतंत्र चर्चांची सत्ता बरीच नियंत्रित केली. त्याने व नंतरच्या पोपांनी इंग्लंडमध्ये धर्मप्रचारक मंडळ पाठविल्यामुळे, रोमन चर्चच्या धर्तीवर, इंग्लंडमध्ये एक चर्च बांधण्यात आले. थिओडोर, वुइल्फ्रेड, बेनिडिक्ट वगैरे मंडळीनी धार्मिक शिक्षणाची चळवळ सुरू केली; व त्या चळवळीचा प्रसार यूरोपखंडातहि झाला. इंग्लंड व जर्मनी येथे पोपच्या प्रतिनिधींनी स्थापिलेली चर्चे रोमच्या सत्तेखाली होती. फ्रँक लोकांच्या साम्राज्यात जरी रोम शहराचा समावेश केलेला होता, तरी तेथील पोपांनी प्रीस्ट लोकांवरील आपला अधिकार वाढविण्याची खटपट केली नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे. फ्रँक चर्चांचे नेतृत्त्व चार्लमन व लुई दि पायस यांच्याकडेच होते परंतु लुईनंतर फार अव्यवस्था माजल्यामुळे चर्चला कोणीहि नियंता राहिला नाही.

निकोलस (पहिला).- ८५८ साली निकोलस (पहिला) याची पोपच्या जागी निवडणूक झाली. त्याने पूर्व व पश्चिम रोमन साम्राज्यांतील चर्चमध्ये बरीच चळवळ केली. यावेळी सर्व यूरोपखंडामध्ये लष्करी जहागिरीची पद्धत चालू झाली होती. रानटी लोक, नार्समेन, सॅरेसिन व हूण लोकांनी ख्रिस्ती लोकांवर हल्ले केले व पोपची सत्ता अमीरउमरावांकडे जाऊन, पहिल्या ओटोनंतर ह्या सत्तेबद्दल अमीरउमराव व जर्मन राजे यांचा वाद सुरू झाला. अकराव्या शतकात हिल्डेब्रँडने (७ वा ग्रेगरी) ती सत्ता बळकावून अधिकारदानाविषयी युद्ध सुरू केले. नंतर पोप लोकांची सत्ता विलक्षण वाढली.

पाश्चात्त्य देशांत रोम शहराबद्दल पूज्यबुद्धि असल्यामुळे तेथील यात्रेस फार महत्त्व होते. धर्मप्रकरणविषयक सर्व सत्ता त्याच्याकडे सोंपविलेली होती; मोठमोठे राजेहि त्याच्या अंकित असून, बादशहास अभिषेक करण्याचा अधिकार पोपकडेच असे. पहिला ख्रिस्ती बादशहा कान्स्टांटिनोपल येथे राहू लागल्यामुळे त्याने पश्चिम रोमन साम्राज्यापैकी सर्व प्रदेश पोपला देऊन टाकिले होते; यामुळे पश्चिमेतील सर्व राजसत्ता पोपपासून मिळाली आहे अशी कल्पना होती. अशा प्रकारे धार्मिक व राजकीय बाबतीत पोप हा सर्वांत वरिष्ठ अधिकारी होता. रोमचे बिशप हे सेंटपीटरचे वंशज आहेत ही कल्पना इ. सनाच्या दुसर्‍या शतकापासून प्रचलित होती. बिशपांच्या सभेत पोप नेहमी अध्यक्ष असून त्याच्या संमतीशिवाय कोणत्याहि प्रश्नाचा निकाल होत नसे.

फार प्राचीन काळापासून रोमन चर्च फार धनाढय होते; डायओक्लिशनच्या वेळी रोमन चर्चच्या जिंदगीची जप्ती करण्यात आली; परंतु कान्स्टन्टाईन बादशहाने ती सर्व परत दिली व तेव्हांपासून देणग्यांच्या रूपाने रोमन चर्चच्या मालमत्तेत एकसारखी भर पडत गेली. चवथ्या व पाचव्या शतकांत रोमन चर्चच्या अंमलाखाली बराच मुलूख होता; परंतु पुढे फक्त इटलीतील भागावरच पोपचा अंमल राहिला. लोंबार्ड लोकांनी चर्चचा प्रदेश जप्त केल्यामुळे, सेंट ग्रेगरीच्या वेळी बायझन्टाईन इटलीवरच पोपचा ताबा होता. परंतु पोप व बायझंटाईन बादशहा यांमध्ये भांडण झाल्यामुळे, फक्त रोमच्या आसपास थोड्याशा प्रदेशावर रोमन चर्चचा अंमल होता.

ग्रीक बादशहांपासून पोपचे संरक्षण न झाल्यामुळे आठव्या शतकात पोपने फ्रँक राजाचा आश्रय मागितला. रोम व त्याच्या आसपासचा थोडा मुलुख पीटर नामक गुमास्त्याला अर्पण केलेला असल्यामुळे त्याचा वारस पोप याने त्या सर्व प्रदेशाचा राज्यकारभार पहावा असे त्या वेळेपासून ठरविण्यात आले. अशा प्रकारे पोपच्या राज्याकारभारास प्रारंभ झाला. वरिष्ठ जागा क्लर्जी लोकांनी दिलेल्या होत्या; परंतु उपाध्यायेत्तर लोकांची मदत घेणे त्या लोकांना भाग पडले; परंतु हलक्या जागांमुळे उपाध्यायेत्तर लोक भांडू लागल्यामुळे फ्रँक राजांना मध्यस्थी करावी लागली. इ.स. ८२४ त एक संरक्षित संस्थान बनविण्यात येऊन उपाध्यायेतर लोकांना बर्‍याच सवलती देण्यात आल्या.

इतर बिशपांप्रमाणेच, पोपची निवडणुकहि क्लर्जी लोकांकडून व उपाध्यायेतर लोकांकडून होत असे. बादशहाने पोपच्या निवडणुकीस आपली संमति दिल्याशिवाय पोपला धर्मासनावर बसवू नये, असे बायझन्टाईन राजांच्या वेळी ठरविण्यात आले; परंतु ही चाल मध्यंतरी बंद पडली. दहाव्या शतकातील रोमन राजे व नंतर सॅक्सन बादशहा हे स्वत: पोपची नेमणूक करू लागले.

हिल्डे ब्रँड किंवा सातवा ग्रेगरी.– पोपांच्या मसलतगारात हिल्डेब्रँडच्या प्रवेश झाल्याबरोबर बरीच सुधारणा झाली. पोपच्या निवडणुकीचा अधिकार लॉर्ड लोकांकडून काढून तो पुन्हां क्लर्जी देण्यात आला. इ.स. १०७३ त रोमन लोकांच्या संमतीने हिल्डेब्रँड याची पोपच्या जागी निवडणूक झाली. त्याने `सातवा ग्रेगरी’ हे नांव धारण केले. गृहस्थाश्रमी लोकांच्या इच्छेवर पोपांची निवडणूक आता अवलंबून राहिली नाही. बिशपांची निवडणूकहि उपाध्यायेतर लोकांवर अवलंबून असू नये असे ग्रेगरीचे म्हणणे होते. याच त्याच्या मतामुळे अधिकारदानाविषयी भांडण सुरू झाले. राजे लोकांवरच चर्चचा ताबा असावा व त्याना गादीवर बसविण्याचा किंवा पदच्युत करण्याचा अधिकार पोपकडे असावा असेहि ग्रेगरीचे मत होते. यामुळे पोप व बादशहा यांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले.

प्रत्येक गोष्टीत चर्चमध्ये सुधारणा घडवून आणणे, रोमन चर्चचे वर्चस्व सर्व चर्चवर प्रस्थापित करणे, यूरोपमधील सर्व राजांना पोपच्या अंमलाखाली आणणे, सर्व ख्रिस्ती लोकांत एकोपा करवून, इतर लोकांपासून ख्रिस्ती लोकांचे संरक्षण करणे हे ग्रेगरीचे मुख्य उद्देश होते. परंतु हे काम इतके अवघड होते की, सुमारे दीडशे वर्षांच्या प्रयत्‍नांनी, त्या कामात अगदी थोडे यश प्राप्त झाले.

अर्बन (दुसरा).– ग्रेगरीनंतर जे पोप झाले त्यात दुसरा अर्बन हा फार महत्त्वाचा पोप होऊन गेला. त्याने कित्येक राजांना बहिष्कृत करून, त्याच्या सुधारणांच्या विरुद्ध असणार्‍या कित्येक बिशपांना त्याने देहान्त शिक्षा दिल्या. प्रीस्ट व बिशप यांनी राजांना वंदन करू नये असेहि त्याने ठरविले. जेरूसलेममधील ख्रिस्ती लोकांच्या तक्रारी नाहीशा करण्याकरिता, यात्रेकरूंचे हाल कमी करण्याकरिता व मुसुलमानांपासून होणारा त्रास चुकविण्यासाठी त्याने धर्मयुद्धची (क्रूसेड) तयारी केली. परंतु जेरुसलेम, अँटिऑक अलेकझॅंड्रिया व कान्स्टांटिनोपल येथील चर्चे रोमन चर्चला जोडणे हे धर्मयुद्धचे खरे कारण होते.

जर्मन बादशहा पांचवा हेनरी व पोप पॅश्चल (दुसरा).– जर्मन बादशहा, पांचवा हेनरी याने पोप पॅश्चल (दुसरा) पासून बर्‍याच सवलती मिळवून घेतल्या. तथापि चर्चने राजकीय बाबतीत पडू नये व गृहस्थ लोकांनी पोपच्या निवडणुकीत व अधिकारदानाच्या भानगडीत पडू नये असे पोपने बादशहाला सुचविले. राजकीय व धार्मिक प्रकरणे अगदी भिन्न भिन्न ठेवावी असे पोपचे मत होते. दुसर्‍या ख्रिस्ती राजांचा पाठिंबा असल्याशिवाय पोपांनां जर्मनीशी भांडता येणार नाही हे पॅश्चल यास पूर्णपणे कळून आले, फ्रान्सच्या पहिल्या फिलिफशी व लुई दि फॅटशी पोपने इ.स. ११०७ मध्ये तह केल्यामुळे रोमचा बचाव झाला. पॅश्चलने प्रत्येक बाबतीत शांततेचे व प्रतिक्रियेचे धोरण स्वीकारिले; व त्याने पोप व बादशहा यांमधील तंटयास पुन्हां धार्मिक स्वरुप दिले. पोप व बादशहा या दोघांमध्ये अधिकारदानाचा हक्क विभागला जावा असे इ.स. ११२२ त ठरविण्यात आले. परंतु या दोन पक्षांची मने एकमेकांविषयी शुद्ध झाली नाहीत. अकराव्या व बाराव्या शतकात सुधारणा व धर्मयुद्ध अशा ज्या दोन चळवळी उत्पन्न झाल्या त्यांच्या योगाने पोपांच्या राज्याचा पाया बसविला गेला.

धर्मयुद्धाचे परिणाम.– ख्रिस्ती लोकांचा जेरुसलेम येथे प्रवेश झाल्याबरोबर, पोपच्या अंगी दैविक शक्ति आहे असे पाश्चात्य भाविक लोकांना वाटू लागले. जेरुसलेम व जाफा ही रोमन चर्चच्या स्वाधीन करण्यात आली; धर्मयुद्धामुळे रोमची सत्ता वाढली. इतकेच नव्हे तर मध्य युगामध्ये पोपचें राजकीय व सांपत्ति द्दष्टया फार हित झाले. धर्मयुद्धांतील वीरांना विशिष्ठ प्रकारचे हक्क देण्यात येऊन पोप व चर्च यांपासून त्यांना मदत मिळू लागली.

पोपच्या सत्तेचा विस्तार.– बाराव्या शतकांतील दुसर्‍या इनोसंटने व तिसर्‍या अलेक्झांडरने आपली (पोपची) सत्ता बरीच वाढविली. दुसर्‍या होनोरियस पोपच्या वेळी, तिसरा लोथेर बादशहा पोपच्या पूर्णपणे ताब्यात होता; आपली निवडणूक कायम करावी अशी लोथेर बादशहाने पोपला विनंति केली होती. बिशप लोकांना निवडून देण्याचा आपला हक्क त्याने सोडून दिला; अशा प्रकारे या वेळचे बादशहा पोपांना अगदी नमून होते; परंतु इ.स. ११५२ त ही स्थिति बदलून गेली. त्या साली फ्रेडरिक बारबरोसा हा जर्मनीचा राजा झाला. त्याने आपल्या निवडणुकीस पोपची मंजुरी मिळविण्याची बिलकुल पर्वा केली नाही. परंतु पोपला फ्रेडरिकच्या मदतीची अपेक्षा असल्यामुळे त्याला फ्रेडरिकच्या या कृत्याचा राग न येता उलट त्याने आनंद प्रदर्शित करून त्याच्याशी सख्य केले. परंतु पोपवर बादशहाचे वर्चस्व स्थापण्याचा त्याचा प्रयत्‍न असल्यामुळे, यांमध्ये वितुष्ट पडणे अपरिहार्य झाले. चवथा अ‍ॅड्रियन व तिसरा अलेक्झांडर या पोपनी आपल्या पक्षाचे समर्थन करण्याकरिता आटोकाट प्रयत्‍न केले. अलेक्झांडरच्या अंगी मनोधैर्य व चिकाटी हे गुण विशेष प्रमाणात असल्यामुळे, पोपला जय मिळून फ्रेडरिक बारबरोसा याला शरण जाणे भाग पडले. त्याने रोमन चर्चचे धार्मिक बाबतीतील वर्चस्व कबूल केले व आपण एकनिष्ठ राहू अशी शपथ घेतली. इंग्लंडमध्ये थॉमस बेकेटचा खून झाल्यामुळे, तिसर्‍या अलेक्झांडर पोपने इंग्लंडचा राजा दुसरा हेनरी यास शरण येण्यास भाग पाडून, इंग्लंडच्या चर्चवर पोपचे वर्चस्व शाबीत केले व कँटरबरीच्या आर्चबिशपचे हक्क व उत्पन्न वाढविले. परंतु अलेक्झांडरच्या पश्चात झेलेले पोप अगदी दुर्बल असल्यामुळे, सहाव्या हेनरी बादशहाच्या वेळी त्यांची स्थिति फार शोचनीय झाली, परंतु हा हेनरी लवकरच मरण पावला.

ब्रेशियाचा आर्नोल्ड.– क्लर्जी लोकांनी जहागिरी वगैरे घेऊ नयेत, फक्त धर्मविषयक अधिकार त्यांच्याकडे असावा अशी बाराव्या शतकात चळवळ सुरू झाली; ब्रेशियाचा आर्नोल्ड हा या चळवळीचा प्रचारक होता. तिसर्‍या युजिनियस पोपच्या वेळी रोमन लोकांनी क्लार्क व कार्डिनल यांवर हल्ले करून यात्रेकरुंची कत्तल केली. पोप तर पळून गेला. परंतु चवथ्या अ‍ॅड्रियन पोपने या बंडखोर लोकांची खोड मोडण्यासाठी फ्रेडरिक बारबरोसाची मदत मागितली (११५५). ब्रेशियाच्या आर्नोल्डने रोमचे प्रजासत्तात्मक राज्य पुन्हां स्थापन करण्याचा प्रयत्‍न केल्यामुळे, पोप व बादशहा यांच्या संमतीने त्याला फाशी देण्यात आले. रोमच्या लोकांनी जरी अडथळा केला तरी पोपची ऐहिक सत्ता वाढतच गेली.

पोपची सत्ता वाढत असता असंतोषाची चिन्हे दिसू लागली. सत्तेच्या केंद्रीकरणास प्रत्यक्ष बिशपांनी विरोध केला. पोपच्या प्रतिनिधीच्या जुलमाबद्दलहि कित्येकांनी तक्रारी केल्या. सेंट बर्नार्ड याने पोपच्या फाजील महत्वाकांक्षेवर व ऐषारामावर आल्या एका ग्रंथात कडक टीका केली.

तिसरा इनोसंट– तिसर्‍या इनोसंट पोपच्या कर्तृवामुळे राजसत्तेची परमावधि झाली. तो मोठा कायदेपंडित व धर्मशास्त्रज्ञ होता. त्याने आपली राजसत्ता वाढविली; यूरोपमधील राजांना आपले मांडलिक करण्याचा त्याने प्रयत्‍न केला. आपण पोप व बादशहा व्हावे अशी त्याची फार इच्छा होती; त्याचा अनेक प्रांतावर ताबा होता; इंग्लंडचा राजा जॉन व तिसरा हेनरी यांच्या वेळी इंग्लंडवर पोपचा बराच अंमल होता. परंतु प्रत्यक्ष रोममध्ये, स्थानिक स्वराज्याबरोबर दहा वर्षे पर्यंत पोपला झगडावे लागले. तथापि रोमन चर्चशिवाय रोमन लोकांचे चालण्यासारखे नसल्यामुळे, अखेरीस पोपचाच जय झाला; इटलीच्या म्युनिसिपालिटयांनी मात्र पोपचा अधिकार जुमानला नाही. एकंदरीत तिसर्‍या इनोसंटच्या वेळी पोपच्या ताब्यात बराच मुलूख होता, त्याच्यानंतर झालेल्या चार पाच पोपांनी आपले वर्चस्व कायम राखिले. विश्वविद्यालयांची स्थापना झाल्यामुळे रोमन सत्ता फार वाढली; या विश्वविद्यालयांनी स्थानिक बिशपांची सत्ता झुगारुन देऊन रोमन चर्चचा अंमल कबूल केला. आंतरराष्ट्रीय शिक्षण रोमच्या ताब्यात येऊन, भिक्षुकवृत्तीच्या मंक लोकांनी अध्यापकांच्या जागा मिळाल्या.

नववा ग्रेगरी व चवथा इनोसंट.– नववा ग्रेगरी (१२२७-१२४१) व चवथा इनोसंट (१२४३-१२५४) या पोपांच्या वेळी बादशहा व पोप यांचे भांडण पुन्हां सुरू होऊन त्यात होहेनस्टाफेन बादशहांची आहुति पडली इतकेच नव्हे तर पोप साम्राज्यहि मोडकळीस आले.
तेराव्या शतकाच्या अखेरीस व चवदाव्या शतकाच्या आरंभी फ्रेंच राजाची सत्ता अवाढव्य झाल्यामुळे, इतर देशाप्रमाणेच रोमहि फ्रेंच राजाचे अंकित झाले होते. दहाव्या ग्रेगरीने (१२७१–१२७६) फ्रेंच वर्चस्व झुगारुन आपली पूर्वीची सत्ता मिळविण्याची खटपट केली. चवथा होनोरियस (१२८५–१२८७) व चवथा निकोलस (१२८८–१२९२) हे पोप स्वतंत्र वृत्तीचे असून उत्तर इटलीचा काही भाग व टस्कनी ही पोपच्या साम्राज्याला जोडण्याची त्यांनी खटपट केली. आठव्या बॉनिफेस पोपच्या वेळी (१२९४–१३०३) फ्रेंच राजा व पोप यांमध्ये झालेल्या युद्धात पोपचा पराभव होऊन पांचवा क्लीर्मेट पोप कॅपेशियन राजाच्या पूर्णपणे ताब्यात आला.

पोपच्या सत्तेचा र्‍हास.- या वेळी लोकांची धर्मश्रद्धा कमी होऊन उपाध्याय लोकांचे वजन कमी कमी होत गेल्यामुळे, पापेसंस्थेचा र्‍हास होऊ लागला; व गृहस्थ लोकांची सत्ता वाढू लागली. अक्षम्य धनतृष्णा हे देखील पोपसत्तेच्या र्‍हासाचे एक कारण असून, याच कारणामुळे आठवा वॉनिफेस पोप व लुई दि फेअर यांमध्ये तंटा उपस्थित झाला. १३०५ त पांचवा क्लीमेंट हा पोप झाला; तेव्हांपासून इतिहासास नवीनच वळण लागले. हा पोप फ्रान्समध्येच राहिला. इटलीमध्ये निरनिराळे पक्ष असल्यामुळे आपल्या धार्मिक स्वातंत्र्यास धक्का बसेल या भीतीने तो रोममध्ये गेलाहि नाही. फ्रेंच राजा लुई दि फेअर याच्याशी त्याचे वर्तन अगदी नम्रपणाचे होते. इ.स. १३०९ त तो अ‍ॅव्हिग्नान येथे राहू लागला. तेव्हांपासून पोपांच्या बाबिलोनमधील हद्दपारीच्या काळाला सुरवात झाली. त्यामुळे चर्चचे फार नुकसान झाले. त्याच्या मरणानंतर दोन वर्षेपर्यंत पोपची जागा रिकामी पडली होती; नंतर स. १३१६ त २२ व्या जॉनची पोपच्या जागी निवड झाली. तोहि अ‍ॅव्हिग्नान येथेच रहात असे. या वेळेपासून रोम व इटली यांपासून पोपांची ताटातूट झाली व ते फ्रेंच राजांचे तावेदार बनले. यामुळे इतर राष्ट्रांच्या मनातून तो अगदी उतरला. चर्च व साम्राज्य यांमधील भांडण पुन्हां सुरू झाले. जर्मन राजा, लुई ऑफ बव्हेरिया हा पोपचा मुख्य प्रतिपक्षी असून त्याला मोठमोठ्या बलाढय राजांचे साहाय्य होते. अखेरीस पोपला पदच्युत करून, दुसर्‍या पोपची निवड झाली. या भांडणामुळे पोपला फ्रेंच राजावर अधिकच अवलंबून रहावे लागले. हे भांडण चालले असतांच पोप, २२ वा जॉन इ.स. १३३४ त मरण पावला.

सहावा इनोसंट.– इ.स. १३५२ त सहावा इनोसंट हा पोपच्या गादीवर बसला. तो प्रामाणिक व सरळमार्गी होता. धार्मिक सुधारणा करुन साम्राज्याला स्थायिक स्वरूप देण्याचा त्याने प्रयत्‍न केला; व इटलीमध्ये पोपचे वर्चस्व पुन्हां स्थापिले. आपली राजधानी पुन्हां रोम येथे न्यावी असेहि त्याच्या मनात होते, परंतु ती गोष्ट तडीस गेली नाही.

पांचवा अर्बन.– पांचवा अर्बन पोपने चवथ्या इनोसंटची इच्छा पूर्ण केली. इसवी सन १३५६ मध्ये तो रोममध्ये परत गेला. इ.स. १३६८ त चवथा चार्लस बादशहा रोम शहरी गेला व पोप आणि बादशहा यांचा समेट झाला. या दोन गोष्टींमुळे अर्बनचे नांव संस्मरणीय झाले आहे. परंतु इटलीमधील परिस्थिति चमत्कारिक असल्यामुळे, इटलीशी पोपचे न पटून तो इ.स. १३७० त अ‍ॅव्हिग्नान येथे परत गेला. तो फार सुस्वभावी होता; चर्चमधील अनीतिप्रवर्तक आचरणास आळा घालण्याचा त्याने प्रयत्‍न केला, परंतु त्यात त्याला यश आले नाही.

अकरावा ग्रेगरी.– अकरावा ग्रेगरी (१३७०-१३७८) हाहि, विद्वान, नीतिमान, धार्मिक, विनयशील व सुज्ञ होता, परंतु अर्बनने रोम शहराचा त्याग केल्यामुळे ग्रेगरीला बराच त्रास झाला. पोपला फ्रेंच वळण लागलेले पाहून इटलीचे मन पोपविषयी कलुषित होऊन इटली व फ्रान्स यांमध्ये लढा उत्पन्न झाला. सेंट कॅथेराइनच्या विनंतीवरून ग्रेगरीने रोममध्ये प्रवेश केला (१३७७), व अशा प्रकारे फ्रान्समध्ये झालेली पोपांची हद्दपारी संपली.

इ. स. १३७८ त सहाव्या पोप करण्यात आले; परंतु या निवडणुकीला कार्डिनल लोकांनी विरोध केला. कारण त्याच्या सुधारणांच्या कल्पना त्यांना संमत नव्हत्या. रोमन लोकांनी केलेली पोपची निवडणूक बेकायदेशीर आहे असे कार्डिनलांनी प्रसिद्ध केले; फ्रेंच राजा पांचवा चार्लस यावी त्या लोकांना मदत असल्यामुळे, त्यांनी एका प्रतिस्पर्धी पोपाची (सातवा क्लीमेंट) निवड केली व अशा प्रकारे ख्रिश्चन लोकांमध्ये दुफळी झाली (१३७८–१४१७).

पोप अ‍ॅव्हिग्नान येथे रहात असता प्रपंचरत कार्डिनलांचे एक कॉलेज स्थापन झाले; या दुफळीचा सर्व दोष या कॉलेजकडे व फ्रान्सच्या पांचव्या चार्लसकडे आहे. बादशहा चवथा चार्लस, इंग्लंड, हंगेरी, पोलंड वगैरे देश व इटलीमधील बहुतेक संस्थाने (मूळ) पोपच्या बाजूची असून, फ्रेंच राजा पांचवा चार्लस, स्कॉटलंड, स्पेन व पोर्तुगाल यांनी प्रतिस्पर्धी पोपला पाठिंबा दिला. पहिल्या पोपने कार्डिनलांचे एक नवे कॉलेज काढिले; परंतु आपल्या स्वत:च्या हिताकडे त्याने अधिक लक्ष्य दिले ही त्याची मोठी चूक झाली; त्याने नेपल्सशी भांडण केले. कार्डिनलांच्या नव्या कॉलेजशीहि त्याचे वैमनस्य पडले. अशा स्थितीत तो इ.स. १३८९ त मरण पावला.

नववा बॉनिफेस.– नवीन कार्डिनलांनी पीट्रो तोमेसेली यास पोप केले; नववा बॉनिफेस या नांवाने तो प्रसिद्ध आहे. तो नीतिवान, दयाळु व चतुर होता. त्याने नेपल्सशी सख्य केले. रोममधील लोकसत्तात्मक राज्य मोडून त्याने तेथे पोपचे वर्चस्व स्थापिले. राज्यकर्ता या द्दष्टीने नवव्या बॉनिफेसचे फार महत्त्व आहे; परंतु पोप या नात्याने नांव ठेवण्यास त्याला वरचि जागा आहे. त्याची धनप्राप्तीची साधने निंद्य असून तो पक्षपातीहि होता. त्याने पोपांची दुफळी मोडण्याच्या कामी दुर्लक्ष केले. त्याने त्याचा प्रतिस्पर्धी पोप सातवा क्लीमेंट मरण पावल्यावर अ‍ॅव्हिग्नानच्या कार्डिनलांनी तेराव्या बेनिडिक्टची पोपच्या जागी निवडणूक केली. दोन निरनिराळे पोप निवडले गेल्यामुळे जिकडे तिकडे बंडाळी माजून राहिली होती. व अशा प्रकारे कॅथलिक चर्चवर फारच आणीबाणीचा प्रसंग आला होता; क्लर्जी लोक ऐहिक सुखात निमग्न झाले होते व नास्तिक लोकांचे इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी व बोहेमिया या देशात प्राबल्य झाल्यामुळे चर्चवर मोठे संकट आले होते.

बारावा ग्रेगरी.– बाराव्या ग्रेगरीने (१४०६-१५) चर्चमध्ये ऐक्य असावे याबद्दल प्रथम बरीच खटपट केली; परंतु पुढे त्याने आपले धोरण बदलले, यामुळे कार्डिनल लोकांची मने क्षुब्ध झाली. हे पाहातांच त्याने नवीन कार्डिनलांची नेमणूक केली.

प्रतिस्पर्धी पोप तेरावा बेनिडिक्ट हा पोपांची दुफळी मोडण्याचा प्रयत्‍न करीत नाही असे पाहून फ्रान्सने त्याची बाजू सोडून देऊन त्याचे कार्डिनल आणि बाराव्या ग्रेगरीशी भांडून गेलेले कार्डिनल यांच्यामध्ये ऐक्य केले. पोपची जागा रिकामी पडली आहे अशी कल्पना करून कार्डिनलांनी चर्चचा कारभार आपल्या हाती घेतला व पीसा येथे एक सभा भरविण्याचा त्यांनी घाट घातला. दोन्ही पोपांनी याविरुद्ध बरीच खटपट केली, परंतु त्यांचे काही एक चालले नाही.

विश्वविद्यालये व अनेक विद्वान लोक कार्डिनल लोकांच्या पक्षाचे असल्यामुळे दोन्ही पोपांवर आमचा ताबा आहे असे कार्डिनल म्हणू लागले; व दोन्ही पोप नास्तिक असून दुफळी माजविणारे असल्यामुळे ते पदच्युत झाले आहेत असे त्यांनी जाहीर केले व इ.स. १४०९ त मिलनच्या कार्डिनल आर्चबिशपला पोप निवडले. त्याने पांचवा अलेक्झाँडर असे नांव धारण केले. परंतु दोन्ही पोपांना निरनिराळ्या देशांची मदत असल्यामुळे त्यांनी आपला अधिकार सोडला नाही; अशा प्रकारे आता तीन निरनिराळे पोप झाले. या नवीन पोपच्या मृत्यूनंतर २३ वा जॉन हा पोप झाला, परंतु हा नीतिभ्रष्ट असल्यामुळे पोप होण्यास अगदी नालायक होता. जर्मनीचा बलाढ्य राजा सिजिस्मंड याने हा पोपासंबंधाचा तंटा मिटवावा असे लोक म्हणू लागले. सिजिस्मंडने एक मोठी सभा भरविली (कौन्सिल ऑफ कान्स्टंस). तेविसाव्या जॉनने त्या सभेला हजर राजण्याचे कबूल केले; परंतु तेथे आपले काहीच वजन नाही असे पाहून तो तेथून पळून गेला. पोपची सत्ता मर्यादित करावी व सर्वसाधारण सभेचे नियम पोपसह सर्वांनी पाळावे असे ठरविण्यात आले. त्या सभेने २३ व्या जॉनला पदच्युत केले. आपण कायदेशीर पोप आहोत असे सामान्य सभेने कबूल केल्यास आपण राजीनामा देण्यास तयार आहोत असे बाराव्या ग्रेगरीने त्या सभेला कळविले. ही अट मान्य करुन त्याचा राजीनामा मंजूर करण्यात आला.

ग्रेगरीनंतर पोपची जागा रिकामी पडल्यामुळे चर्चचा कारभार मंत्रिमंडळाकडे गेला; परंतु पोपची निवडणूक करण्याची कार्डिनलांनी खटपट केल्यामुळे पांचव्या मार्टिनची पोपच्या जागी नेमणूक झाली.

पांचवा मार्टिन.– मार्टिन पोप झाल्याबरोबर चर्चमध्ये ऐक्य झाले. विश्वव्यापी चर्चचा कारभार हांवण्याची योग्यता मार्टिनच्या अंगी होती. फ्रान्स किंवा जर्मनीत पोपचे वसतिस्थान न करता रोममध्ये राहण्याचे त्याने ठरविले. त्याने कलाकौशल्यास उत्तेजन देऊन रोम शहराची सुधारणा करण्याकरिता बराच पैसा खर्च केला. त्याने आपली राजकीय सत्ताहि वाढविण्याचा प्रयत्‍न केला; व आपल्या कुटुंबातील लोकांना मोठमोठ्या जागा दिल्या. थ्याने पोपची दुफळी मोडून टाकिली. कार्डिनलांच्या कॉटेजात त्याने प्रसिद्ध लोकांचा समावेश केला. तो इ.सन १४३१ त मरण पावला. त्याच्या वेळच्या लोकांना त्या पोपपासून परमानंद झाले असे त्याच्या थडग्यावर लिहिले आहे.

चवथ्या युजिनियसची कारकीर्द सुखावह झाली नाही. जिकडे तिकडे भांडणे सुरू झाली. सिजिस्मंड बादशहाने पोप व मंत्रिमंडळ यांचा समेट केला. परंतु इ. सन १४३४ त फारच मोठी बंडाळी झाल्यामुळे पोप फ्लोरेन्समध्ये पळून गेला.

पोप फ्लोरेन्स येथे गेल्यावर उदात्त- वाङ्‌मयाचा अभ्यास करणार्‍या लोकांशी त्याचा निकट सहवास झाला व याच गोष्टीमुळे त्या लोकांचा रोमच्या व्यवस्थापक मंडळात हळू हळू प्रवेश झाला.

युजिनियस हा नास्तिक आहे असे ठरवून त्यास पदच्युत करण्यात आले, व पांचवा फेलिक्स हा पोप झाला. परंतु ही दुफळी लोकांना न आवडून त्यांनी चवथ्या युजिनियसला परत बोलाविले.

पांचवा निकोलस.- युजिनियसनंतर पांचवा निकोलस (१४४७-१४५५) हा पोप झाला. तो पोपच्या गादीवर बसताच विद्या व ललितकला यांचे पुनरुज्जीवन झाले. चर्चच्या हिताकडे त्याचे फार लक्ष असे. त्याने शास्त्र व कला भरभराटीस आणिल्या. त्याने बॅसेलचे मंत्रिमंडळ मोडून पांचवा फेलिक्स (प्रतिस्पर्धी पोप) यास राजीनामा देण्यास लावले. पुढे तुर्क लोकांनी इ.स. १४५३त कान्स्टांटिनोपल काबीज केल्यामुळे त्या लोकांबरोबरच झगडण्यासाठी सर्व ख्रिस्ती लोकांची एकी करण्याचा निकोलसने प्रयत्‍न केला पण तो निष्फळ झाला. तो इ.स. १५५५ त मरण पावला. या वेळेस रोम हे वाङ्‌मय व कला यांचे केंद्रस्थान झाले.

दुसरा पायस.– पोप दुसरा पायस (१४५८-६४) हा पोपच्या जागेला अगदी योग्य मनुष्य होता; तो कवि, इतिहासकार व मुत्सद्दी होता. त्याने रोमन चर्चचा दरारा बराच वाढविला. अविश्रांत परिश्रम करून प्रचंड धर्मयुद्धाची त्याने तयारी केली, परंतु तो मध्यंतरीच मरण पावला.

चवथ्या सिक्सटस (१४७१-८४) पासून राजकारणी पोपांच्या मालिकेस सुरवात झाली. या पोपने प्रापंचिक गोष्टीत अधिक लक्ष घातले, इटलीच्या राजाच्या तंत्राने तो वागू लागला व आपल्या आप्तेष्टांना मोठमोठ्या हुद्यांच्या जागा त्याने दिल्या; आणि कला व शास्त्रे यांस त्याने उत्तेजन दिले.

पंधराव्या शतकाच्या अखेरीस कार्डिनल लोक प्रापंचिक बनल्यामुळे नीतिभ्रष्ट अशा मनुष्याची (सहावा अलेक्झांडर १४९२-१५०३) पोपच्या जागी निवडणूक झाली. लवकरच कार्डिनल लोकांनी पोपच्या विरुद्ध तक्रारी करुन फ्रान्सच्या राजाची मदत मागितली, परंतु फ्रान्स राजाने पोपशी समेट केला. पेपने तुर्क लोकांबरोबर लढण्याचा प्रयत्‍न करून ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला.

दुसरा ज्यूलियस.– दुसर्‍या ज्यूलियसने (१५०३–१३) पोपची सत्ता वाढवून फ्रान्सच्या वर्चस्वापासून रोमन चर्चची मुत्तच्ता केली. परंतु तेथे स्पेनचे वर्चस्व झाले. धर्मविषयक बाबतीत लांच घेण्याची चाल त्याने बंद केली, व कलाकौशल्यास उत्तेजन दिले. त्याने सेंटपिटरचे कॅथिड्रल बांधण्यास सुरवात केली.

दहावा लिओ.– इ.स. १५१३ त दहावा लिओ हा पोप झाला. राजकीय व धार्मिक बाबतीत रोमन चर्चचे स्वातंत्र्य वाढविण्याची त्याने खटपट केली. त्याने धर्मयुद्धाची तयारी देखील केली. तो चैनी व विलासी होता, तरी दानधर्म करण्यात त्याने मोठे औदार्य दाखविले.

सहावा अ‍ॅड्रियन.– सहाव्या अ‍ॅड्रियनने चर्चमध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या. परंतु लूथर व त्याचे अनुयायी यांनी अ‍ॅड्रियनची फार निंदा केली. हा पोप फार सन्माननीय होता यांत संशय नाही. स्वार्थाकडे यात्किंचितहि लक्ष न देता चर्चमध्ये सुधारणा करण्यात त्याने आपला काळ घालविला.

तिसरा पॉल.– तिसर्‍या पॉलन रोमन कॅथोलिक पंथात बरीच सुधारणा केली. त्याने माणसांची निवड करून कार्डिनलांच्या कॉलेजात पुन्हां उत्साह उत्पन्न केला व प्रॉटेस्टंट पंथाचा प्रसार बंद करण्याकरिता इन्क्किझिशन सभा स्थापिली.

पांचवा पायस.– पांचवा पायस (१५६६-७२) हा डॉमिनिकन ऑरडरचा मेंबर होता; तो स्वत: त्या पंथाचे नियम कडकपणे पाळीत असे; त्याला साधु असे म्हणत असत. मठवासी लोकांना त्याने उत्तम शिस्त लाविली व बिशपांनी आपल्या वसतिस्थानात राहिले पाहिजे असा त्याने नियम केला. पोपने मेरी स्टुअर्ट, फ्रान्सचा राजा नववा चार्लस व स्पेनचा राजा दुसरा फिलिप यांना साहाय्य केले. तुर्क लोकांच्या बरोबर भांडणातहि त्याला यश प्राप्त झाले. त्याच्या कारकीर्दीत कॅथोलिक पंथाची पूर्ण सुधारणा झाली. पांचव्या पायसनंतर जे पोप होऊन गेले त्यांनी कॅथोलिक पंथाचा प्रसार करण्याकरिता अमेरिका, हिंदुस्थान, चीन व जपान येथे धर्मोपदेशक पाठविले, व प्रॉटेस्टंट धर्माची प्रगति होऊ न देण्याविषयी बरेच प्रयत्‍न केले.

तेराव्या ग्रगरीने (१५७२-८५) कॅथोलिक पंथाचा प्रसार सर्वत्र करण्याकरिता अत्यंत परिश्रम घेतले. त्याने शिक्षणसंस्थांना उत्तेजन दिले. रोममध्ये त्याने कॉलेज ऑफ जेसुइट्स स्थापन केले. त्याने पंचागात केलेली सुधारणा प्रसिद्ध आहे, ह्युगीनॉटपासून कॅथॉलिक पंथाचे व राजकुटुंवाचे संरक्षण करण्यासाठी त्याने सेंट बार्थोलोम्यूचा सण साजरा केला.

पांचवा सिक्सटस.– पांचव्या सिक्सटसने (१५८५-९०) लुटारू लोकांचा बंदोबस्त करून पोपसाम्राज्यांत नीट व्यवस्था केली. त्याने शास्त्रांना उत्तेजन देऊन व्हॅटिकन लायब्ररीची वाढ केली. शेतकी व व्यापार यांचा त्याच्यावेळी उत्कर्ष झाला. इंग्लंडला रोमच्या अंमलाखाली आणण्याची त्याची इच्च्छा होती. परंतु स्पॅनिश आर्मेडाचा नाश झाल्यामुळे त्याची इच्छा सफल झाली नाही.

आठवा क्लीमेंट.– आठव्या क्लीमेंटने (१५९२–१६०५) फ्रान्सशी सख्य केले. पंधराव्या ग्रेगरीच्या वेळी (१६२१–२३) रोमन चर्चमध्ये ज्याप्रमाणे सुधारणा झाली, तशी केव्हांच झाली नाही. फ्रान्समध्ये ह्युगीनॉटस लोकांचे सर्व लष्करी अधिकार काढून घेण्यात आले. इंग्लंडमध्ये पहिल्या जेम्सनेहि कॅथॉलिक पंथाला विरोध केला नाही.

पोपची राजसत्ता.- यावेळी पोपच्या राजकीय सत्तेचा बराच विस्तार झाला; परंतु सांपत्तिक स्थिति समाधानकारक नव्हती. केवळ आपल्यावर अवलंबून राहतील अशी काही माणसे आपणांपाशी पाहिजेत असे पोपना वाटू लागल्यामुळे त्यांनी आपल्या नातलगांना मोठमोठ्या हुद्याच्या जागा देऊन टाकिल्या. परंतु एखाद्या घराण्याला जे हितकारक होते ते राज्याला विनाशकारक झाले. एका पोपाचे जे मित्र असत ते दुसर्‍या पोपचे शत्रू होत, कारण प्रत्येक वेळी पोप निवडला जात असल्यामुळे एका पोपचा दुसर्‍याशी संबंध नसे. पैशाच्या अडचणीमुळे कर वाढवावे लागले. हा करांचा बोजा सामान्य जनसमूहावर पडला. शेतकरी लोकांचे हाल होऊ लागले; चोर्‍या होऊ लागल्यामुळे व्यापारहि नीट चालेनासा झाला. परंतु कॅथोलिक धर्मप्रचारकांनी आपले काम उत्तम प्रकारे केले.

१६४८ पासून १७८९ पर्यंतच्या मुदतीत पोपच्या राजकीय सत्तेचा र्‍हास होऊन सांपत्तिक स्थितीहि निकृष्ट झाली व लोकांची धर्मजागृतीहि अगदी शिथिल झाली. परंतु सातवा अलेक्झांडर (१६५५–६७) व बारावा इनोसंट (१६९१–१७००) या पोपांनी आजपर्यंत चालत आलेला नातलगाविषयीचा पक्षपात सोडून दिला व त्याच्यानंतर झालेल्या पोपांनी आपली सांपत्तिक स्थिति सुधारण्याचा प्रयत्‍न केला. दाराव्या क्लीमेंटने (१७३०–४०) कागदी नोटा काढून एक सोडत (लॉटरी) काढिली परंतु त्याचा परिणाम चांगला झाला नाही. सहाव्या पायसच्या वेळी (१७७५–१७९९) कागदी नोटांना कोणी विचारीनासे झाले व चर्चचे दिवाळे वाजण्याची वेळ आली. परंतु मोठ्या फ्रेंच राज्यक्रांतीमुळे चर्चचा बचाव झाला.

पोप व फ्रान्सचा राजा या दोघांचीहि सांपत्तिक स्थिति फार भयंकर झालेली होती; परंतु धर्मसंस्थेच्या मालमत्तेची जप्ति व विक्री करून फ्रान्सने आपला बचाव केला; परंतु पोपला ही गोष्ट करता येण्यासारखी नव्हती; पोपने फ्रान्सच्या या कृत्याचा निषेध केल्यामुळे फ्रान्सचे पोपशी वैमनस्य पडले. स. १७९१ त फ्रान्सने अ‍ॅव्हिग्नान व व्हेनेशिन आपल्या ताब्यात घेतली. स. १७९३ त रोम शहरात फ्रेंच वकिलाचा खून झाला. स. १७९७ त पोपने अ‍ॅव्हिग्नान वगैरे शहरांवरचा आपला हक्क सोडून, आपले सैन्य कमी करण्याचे व मोठा दंड भरण्याचे कबूल केले. परंतु रोममध्ये फ्रेंच जनरल डयूफो याचा खून झाल्यामुळे फ्रेंच सैन्याने पोपला कैद करून नेले. तो कैदेतच इ.स. १७९९ त मरण पावला. त्याच्यानंतर सातवा पायस पोप झाला (१८००–२३). फ्रान्सने चर्चच्या मालमत्तेच्या केलेल्या विक्रीस पोपने आपली संमति देऊन धर्माधिकार्‍यांच्या जागाहि कमी केल्या; सरकारने बिशप नेमावेत परंतु त्या नेमणुका पोपने कायम कराव्या असे ठरविण्यात आले व फ्रान्सने पोपची ऐहिक सत्ता कबूल केली. नेपोलियन यास राज्याभिषेक करण्याचे पोपने कबूल केले (१८०४). परंतु लवकरच फ्रान्स व पोप यांचे वितुष्ट पडून नेपोलियनने पोपचा मुलूख आपल्या ताब्यात घेतला व त्याला फ्रान्समध्ये नेले. पुढे नेपोलियनच्या सत्तेला उतरती कळा लागल्यामुळे त्याने पोपला बंधमुक्त करून त्याचा मुलूख त्याच्या स्वाधीन केला. इ.स. १८१४ त पोपने रोममध्ये प्रवेश केला. त्याने जीझसच्या सोसायटीची पुनर्घटना केली (१८१४). साम्राज्याच्या घटकावयवांमध्ये जो करार झाला त्याच्या योगाने जर्मनीतील सर्व धर्मसंस्था प्रांपचिक झाल्या. अशा प्रकारे होली रोमन साम्राज्यांतील धर्माधिकार्‍यांची राजकीय सत्ता नष्ट झाली व प्रॉटेस्टंटपंथी प्रशियाच्या ताब्यात हा सर्व मुलूख गेला.

१८१४ पासून १८३० पर्यंतच्या कालामध्ये यूरोपमध्ये सर्व ठिकाणी राज्यसत्तेची पुन्हां स्थापना झाली; या राजांनी कॅथॉलिक चर्चची पुन्हां स्थापना केल्यावर राजे व पोप यांनी राज्यक्रांतीविरुद्ध आपले मत प्रदर्शित केले. मोठ्या युक्तीने पोपने ग्रेटब्रिटनशी सख्य केले. आठव्या पायस पोपच्या वेळी (१८२९–३०) इंग्लंडमध्ये कॅथॉलिक बंधविमोचन (राजकीय, सामाजिक वगैरे हक्कांची प्राप्ति) झाले. फ्रान्समध्ये जेसुइटस लोकांच्या विरुद्ध चळवळ चालू होती. फ्रान्समधील जेसुइटस लोकांची घरे बंद करण्याची पोपने परवानगी दिली (१८४५).

स. १८३० च्या राज्यक्रांतीमुळे पोपला परकी लोकांवर अवलंबून रहावे लागले. फ्रान्स व ऑस्ट्रिया यांच्या तंत्राने त्याला वागावे लागले. यामुळे इटलीच्या एकीकरणाला अडथळा झाला. इटालियन लोकांना पोपचा राग आला. चर्चचा वरिष्ठ अधिकारी व इटालीतील एका भागाचा राजा असा पोप हा दुहेरी अधिकारी होता; हा त्याचा परस्परविरोधी अधिकार नाहीसा होण्याच्या बेतात होता, परंतु पोप नववा पायस (१८४६–७८) याच्या कर्तृत्त्वशक्तीमुळे हे संकट लांबणीवर गेले.

स. १८४९ पासून १८७० पर्यंत पोपचे फ्रान्सशी विशेष सख्य होते. पोपला मदत केल्याने कॅथॉलिक लोकांना बरे वाटेल व आपल्यालाहि अनेक सवलती मिळतील असे लुई नेपोलियनला वाटले. चर्चला खूष ठेवण्यासाठी प्रजासत्तात्मक फ्रान्सने रोमन प्रजासत्तात्मक राज्य नाहीसे केले. परंतु त्यापासून काही एक फायदा झाला नाही, परंतु त्याला पोपचे रक्षण करावे लागले. १८५९ सालांतील इटलीच्या युद्धांत पोपचा बहुतेक मुलूख त्याच्या ताब्यातून गेला. पोपला मदत करणे, ऑस्ट्रेलियन लोकांना इटलीतून हांकून देणे व प्रशियावर हल्ला करणे ह्या तीन मुख्य गोष्टी नेपोलियन (तिसरा) ने आपल्यापुढे ठेविल्या.

फ्रेंच सैन्य रोममधून निघून गेल्यावर व्हिक्टर इमॅन्युल (इटलीचा)  राजाच्या सैन्याने त्या शहरी प्रवेश केला. या राजाचे पोपशी वैमनस्य होते. इटलीच्या राज्याची घटना करतेवेळी याने पोपचा बहुतेक सर्व मुलुख हरण केल्यामुळे, पोपकडे फक्त पाचच प्रांत शिल्लक राहिले (१८६१) . श. १८६७ त चर्चमालमत्तेची जप्ती करुन रोम शहरहि त्याने आपल्या हस्तगत केले.

इटलीचा पोपशी विरोध होता, परंतु स्पेनने पोपचे वर्चस्व कबूल केले. स्पेनच्या दुसर्‍या इसाबेलाने १८५१ साली रोमन धर्माचे सर्व हक्क कबूल करून, शिक्षणखाते चर्चच्या हवाली केले. परंतु स. १८६८ च्या राज्यक्रांतीनंतर स्पेनने आपल्या लोकांना धर्मस्वातंत्र्य दिले. ऑस्ट्रियानेहि चर्चचे हक्क कबूल केले; परंतु पुढे ऑस्ट्रियाने आपल्या लोकांस धर्मस्वातंत्र्य दिले.

बेलजम हा देश कॅथॉलिक पंथाचा कट्टा अभिमानी आहे. हॉलंडमध्ये रोमनकॅथॉलिक लोकांची संख्या फारशी नाही.

एकोणिसाव्या शतकात रोमन कॅथॉलिक पंथाला यूरोपात फारसे नवीन अनुयायी मिळाले नाहीत.

जर्मन व आयरिश लोकांनी युनायटेडस्टेट्स ऑफ अमेरिकेत स्थलांतर केल्यामुळे, तेथे मात्र कॅथॉलिक पंथाचा प्रसार फार झपाटयाने झाला.

एकोणिसाव्या शतकात चर्चच्या ताब्यांतील प्रदेशावरील पोपची सत्ता ढिली होत होती, परंतु परकीय देशातील प्रांपचिक गोष्टीत त्याचा अधिकार वाढत गेला. पोपच्या सत्तेचा फाजील कैवार घेतला गेल्यामुळे, रोम शहर हे सत्तेचे केंन्द्रस्थान झाले. अशा प्रकारे पोपची राजकीय सत्ता ज्या वेळी कमी झाली, त्याच वेळी त्याच्या पारमार्थिक सत्तेची वाढ झाली.

इ.स. १८७० मध्ये चार महत्त्वाच्या गोष्टी घडून आल्या : (१) पोप हा दोषतीत आहे, असे प्रसिद्ध करण्यात आले. (२) तिसर्‍या फ्रेंच प्रजासत्तात्मक राज्याची स्थापना झाली. (३) इटलीने रोम शहर आपल्या ताब्यात घेतल्यामुळे, चर्चच्या शिल्लक राहिलेल्या संस्थानांचा इटलीच्या राज्यात समावेश झाला व (४) प्रशियाचा राजा जर्मन बादशहा झाला. या गोष्टीचा परिणाम सर्व यूरोपवर झाला, इतकेच नाही, तर पोपच्या धोरणावरहि त्याचा परिणाम झाला. जर्मन व प्रशियन मुत्सद्दयांनी रोमन चर्चची राजसत्ता नाहीशी करण्याचा प्रयत्‍न चालविला होता. प्रशियन मंत्रिमंडळातून कॅथॉलिक लोकांची लवकरच हकालपट्टी झाली.

पोप हा दोषातीत आहे अशी सर्व लोकांची खात्री करून देण्याचा नवव्या पायसचा उद्देश होता. परंतु जर्मनी व फ्रान्स या देशात वरील मताविरुद्ध चळवळ चालू होती. परंतु शाळा व चर्चनेमणुका ताब्यात घेण्याविषयी जर्मन बादशहा व पोप यांचा जो तंटा झाला (१८७२–८७) त्या तंटयामुळे पोपचा बचाव झाला. इ.स. १८७८ त नववा पायस मरण पावला. त्याच्या मरणसमयी रोमन चर्च अगदी मोडकळीस आले होते व बहुतेक सर्व देशांशी त्याचे वैमनस्य होते.

लिओ, तेरावा (१८७८–१९०३):- त्याच्यानंतर तेरावा लिओ हा पोप झाला. तो स्वभावाने शांत व विचारी असून विद्वान होता. त्याला अर्वाचीन राजकारणाचीहि बरीच माहिती होती. तो आजपर्यंत रोममध्ये रहात नसल्यामुळे तो नि:पक्षपाती असेल असे लोकांना वाटत होते. रशिया, जर्मनी व फ्रान्स यांना बर्‍याच सवलती देऊन पोपने त्याच्याशी सख्य केले.

राजसत्ता मिळविण्याची त्याची फार इच्छा होती; परंतु आस्ट्रिया, जर्मनी व इटली यानी सलोख्याचा तह केल्यामुळे पोपची बरीच निराशा झाली. इटलीच्या राजाचे पोपशी वैमनस्य होते. इटलीत प्रजासत्तात्मक राज्य असावे असे पोपला वाटत होते. परंतु तसे घडून येण्यास फ्रेंच प्रजासत्तात्मक राज्य कायम राहणे अवश्यक होते. सबब, प्रजासत्तात्मक राज्यपद्धत हीच सर्व राज्यपद्धतीत उत्तम आहे असे प्रतिपादन करीत जा, असे फ्रेंच कॅथॅलिक लोकांना सांगण्यात आले.

निरनिराळ्या राष्ट्रांच्या सामर्थ्यात समतोलपणा राखण्याचा तेराव्या लिओचा प्रथमत: उद्देश होता; परंतु फ्रान्सशी सख्य केल्याबरोबर त्याने आपला तो उद्देश सोडून दिला. त्याच्या वेळी कॅथॉलिक विद्वानांचा छळ झाला. सर्व धर्माधिकार्‍यांना त्याने राजकारणात गुंतवून दिले. लिओच्या कारकीर्दीत झालेल्या सर्व अनर्थाबद्दल त्याला जबाबदार धरणे योग्य नाही हे खरे आहे. परंतु सामाजिक बाबतीत त्याने ढवळाढवळ केली इतकेच नव्हे, तर राजकीय गोष्टीतहि चर्चचे वर्चस्व असले पाहिजे असे त्याने जाहीर केले.

लिओच्या कारकीर्दीत चर्चमधील धार्मिक विधीसंबंधी औदासिन्य दिसू लागले. धर्माधिकार्‍यांचे ऐहिक गोष्टींकडे लक्ष गेले. विद्वान व उदारमतवादी लोकांचा छळ झाला. जर्मन व अ‍ॅग्लो सॅक्सन लोकांची मने अधिकाधिक कलुषित होऊ लागली. परंतु सामाजिक प्रश्न आपल्या हाती घेऊन गरीब व दुबळ्या लोकांविषयी आपले काय कर्तव्य आहे ते चर्चने श्रीमंत लोकांना नीट समजावून सांगितले. लिओने आपली ज्युबिली केली त्यावेळी जगातील सर्व धर्मांच्या व पंथाच्या लोकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले. पुढे लवकरच तो मरण पावला (१९०३).

दहावा पायस.– लिओनंतरचा दहावा पायस हा पोप राजकारणी नसून साधुवृत्तीचा होता. इटलीशी आजपर्यंत असलेले पोपचे धोरण आता बदलेल अशी कल्पना होती. परंतु पहिल्या धोरणात बदल षोणे शक्य नाही असे दिसून आले. पोप हा ख्रिस्तीचा पृथ्वीवरील प्रतिनिधि असल्यामुळे ख्रिस्ताच्या तत्त्वाप्रमाणे सर्व गोष्टी करावयाच्या असा त्याचा बाणा होता. नीतिबाह्य आचरण न करता पोपचा अधिकार वाढविण्याची त्याची इच्छा होती. चर्चला बळकटी आणण्यासाठी पायसने चर्चमधील तंटे मिटवून टाकून त्यात सुधारणा केल्या.

एकंदरीत विसाव्या शतकाच्या आरंभी पोपमध्ये बराच उत्साह दिसत होता यात शंका नाही. सहावा व सातवा पायस यांची स्थिति इतकी निकृष्ट झाली होती की, पोपची जागा नाहीशी होते किंवा काय अशी त्यावेळी लोकांना भीति वाटत होती. चर्चमधील फाटाफूट हे याचे कारण होते, परंतु पोपपासूनच आपला बचाव होईल असे राज्यक्रांतीच्या युगानंतर लोकांना वाटू लागले.

पोपची राजसत्ता नाहीशी झाल्याबरोबर त्याची धार्मिक सत्ता वाढली यात संशय नाही. धार्मिक बाबतीत सर्व जगावर त्याचा ताबा असल्यामुळे जेव्हां जेव्हां एखाद्या राजाशी पोपचा तंटा लागतो त्यावेळी कॅथॉलिक लोक कितीहि राजनिष्ठ असले तरी ते पोपलाच मदत करीत. कारण पोप हा ईश्वराचा प्रतिनिधि असल्यामुळे राजाला मदत करण्यापेक्षा पोपला मदत करणे अधिक श्रेयस्कर आहे असे त्यांना वाटे. परंतु अर्वाचीन जीवितक्रमविरोधक अशा काही गोष्टीमुळे कॅथॉलिक पंथाच्या देशांमध्येहि पोपविरुद्ध चळवळ चालू आहे. फ्रान्स, इटली व स्पेन या देशांत रोमन चर्चबद्दल विशेष आस्था आढळत नाही. परंतु इंग्रजी भाषा बोलणार्‍या देशात इ. स. १८६० पासून पोपबद्दल अत्यंत पूज्यबुद्धि आहे.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .