विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
पेन्शन– खाजगी किंवा सरकारी नोकरांना नोकरीची ठराविक मुदत संपल्यानंतर किंवा नोकरीची जागाच नष्ट झाल्यामुळे मागील नोकरीबद्दल जे नियमित किंवा नियतकालिक वेतन मिळते त्याला पेन्शन म्हणतात. ठराविक मुदतीनंतर पेन्शन देण्याचा मुख्य हेतु नोकर कायम टिकावेत व वृद्धपकाळी किंवा अकाली शारीरिक व्यंगामुळे नालायकी आल्यास नोकरीतून कमी झालेल्या इसमाची उपासमार होऊ नये हा असतो. तथापि जे नोकर नोकरीतच किंवा नोकरी सुटल्यावर लवकरच मरण पावतात त्यांना या पेन्शनपद्धतीचा फायदा मुळीच नाही, उलटपक्षी नोकरी पुरी झाल्यानंतर जे दीर्घकाळ जगतील त्यांना मात्र पुष्कळ फायदा मिळतो, हा या पद्धतीत मोठा दोष आहे. त्यामुळे प्राव्हिडंट फंडाची म्हणजे नोकरी चालू असताना काही पगारापैकी अंश व काही सरकारी अंश मिळून फंड जमवून तो सर्व एकदम नोकरी सुटताच नोकरास किंवा त्याच्या कायदेशीर वारसास देण्याची पद्धति पुष्कळ ठिकाणी अवलंबिली जाते. इंग्लंडमध्ये पेन्शनचे प्रकार : (१) सिव्हिल सर्व्हिस, (२) पर्पेच्यूअल किंवा हेरिडिटरी (वंशपरंपरा) पेन्शन, (३) पोलिटिकल पेन्शन, (४) सिव्हिल लिस्ट पेन्शन, (५) ज्युडिशियल म्युनिसिपल, इत्यादि, (६) इक्लिझिअॅस्टिकल पेन्शन, (७) आर्मी, (८) नेव्ही पेन्शन, इत्यादि निरनिराळे आहेत. पैकी वंशपरंपरा पेन्शन १८८७ साली नेमलेल्या कमिटीच्या सूचनानुसार त्यापुढे देण्याचे सरकारने बंद केले इतकेच नव्हे तर मागील चालू असलेली मार्लबरो, नेल्सन, रॉडने, ग्रॅफ्टन, रिचमंड, हॅमिल्टन वगैरे अनेकांची पेन्शनेहि एकदम काही रक्कम देऊन बंद केली; आणि मोठ्या राष्ट्रीय कामगिरीबद्दल एकदम द्रव्यद्वारा देणगी देण्याची पद्धति सुरू करुन लॉर्ड किचनेरला ५०००० पौंड (१९०२ साली), लॉर्ड क्रोमरला ५०००० पौंड (१९०७ साली) अशा प्रकारे देणग्या दिल्या. १९०८ साली ओल्ड एज पेन्शन अॅक्ट पास झाला व १९१९ त तो दुरुस्त करण्यात आला. या कायद्यान्वये ७० वर्षे वयाच्या माणसांना त्यांच्या स्वत:च्या व नवराबायकोच्या उत्पन्नाच्या मानाने प्रमाणशीर साप्ताहिक पेन्शन देण्यात येते. या पेन्शनची १९२१-२२ सालची रक्कम २६०००००० पौंड भरली. गेल्या महायुद्धत ज्यांना कायमचे व्यंग आले असून जे पोट भरण्याला असमर्थ आहेत अशांनाहि पेन्शन देण्यात येत असते.