विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
पुनर्जन्म- आत्म्याचें एका शरीरांतून दुसर्या शरीरांत जाणें याला पुनर्जन्म म्हणतात ही 'देहान्तरप्राप्ति' त्याच जातींत किंवा उच्च किंवा नीच जातींत पूर्वजन्मांतील पापपुण्यात्मक कर्मानुसार होते. पुनर्जन्माची कल्पना जीव हा, शरीर व आत्मा अशा दोन पृथक भागांचा बनलेला असतो या समजुतीवर उभारलेली आहे. ही कल्पना हिंदुधर्माप्रमाणें बौद्ध व जैन या धर्मांतहि आहे. पुण्यवान लोक मृत्यूनंतर स्वर्गांत जाऊन तेथें देवांबरोबरीनें सुखोपभोग भोगतात आणि पापी लोक नरकांत जातात, या कल्पना वैदिक कालांत होत्या. पुढें शतपथब्राह्मणांत पुनर्जन्माची कल्पना अशी स्पष्ट मांडलेली आहे कीं, मेल्याबरोबर जीव पुन्हां जन्म घेऊन मागील जन्मांतल्या कर्मांचें बरें वाईट फळ भोगतो. या पुनर्जन्माच्या सिद्धांताला खात्रीलायक पुरावा पुढें मांडलेला नाहीं; तरी हा सिद्धांत एकदम सर्वमान्य झालेला दिसतो आणि भारतीय समाजांतील आद्य वैदिककालीन आनंदमय वृत्ति नाहींशीं होऊन तिच्या जागीं निराशावाद (पहा) पसरलेला आढळतो. पुनर्जन्माच्या सिद्धांताला मुख्य पुरावा असा मांडला गेला आहे कीं, चालू आयुष्यांत भोगावें लागणारें सुख किंवा दु:ख यांचें कारण चालू जन्मांतील नैतिक आचरणांत पुष्कळ वेळां सांपडूं शकत नाहीं. उदाहरणार्थ, एक इसम जन्मत:च श्रीमंत व सुखी आणि दुसरा जन्मत: दरिद्री व दु:खी असतो; किंवा एखादा अगदीं नैतिक दृष्टया सदाचरणी मनुष्य सर्वदा संकटांत व दु:खांत सांपडलेला आढळतो. अर्थात चालू जन्मांतील श्रीमंतीचें किंवा आपत्तीचें कारण पूर्वजन्मांतील पापपुण्य हें असलें पाहिजे. त्याप्रमाणें चालू जन्मांतील स्थितीला कारण मागील जन्मांतील पापपुण्य, आणि मागील जन्मांतील स्थितीस त्याच्या मागील जन्मांतील; याप्रमाणें ही जन्मांतरांची सांखळी अनंत आहे. या विचारसरणीमुळें दुसरा असा प्रश्न उद्भवतो कीं, या जन्ममरणाच्या चक्रांतून सुटण्यास कांही मार्ग आहे कीं नाहीं. याचें उत्तर ज्ञानप्राप्तीनें मोक्ष मिळविणें हें असून, हें पुनर्जन्माचें व मोक्षप्राप्तीचें तत्त्वज्ञान प्राचीन उपनिषद्ग्रंथांतून विवेचिलें आहे.
ग्रीक- रोमन लोकांत पुनर्जन्माची कल्पना होती; पण ती त्यांनीं ती ईजिप्शियन, हिंदु, कीं प्राचीन अप्रगत यूरोपीय थ्रेसियन, सिथियन, गॉल वगैरे लोकांपासून घेतली याबद्दल मतभेद आहे. साधारणत: असें दिसतें कीं, एका विशिष्ट देशांतून ही कल्पना जगभर पसरली असें नसून अनेक ठिकाणच्या अप्रगत लोकसमाजांत ती पृथक पृथकपणें उद्भत झाली.