विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
पिशुलोस (सेल्युलोज)- उद्भिज पेशीतत्त्वधारकास पिशुलोस असें म्हणतात. ह्या पिशुलोसमध्यें संयुक्त कर्बोज्जितें असून त्यांवर जलक्रिया केली असतां शेवटचा पदार्थ एकोज हा मिळतो. एका प्रकारच्या पिशुलोसची प्रयोगसिद्ध सारणी क६ उ१० प्र५ अशी असून ती पिष्टसत्वाच्या सारणीशीं जुळती आहे. पिशुलोसवे व सत्त्वाचे कांही कांहीं गुणधर्म बरेच जुळतात. वर सांगितलेला पिशुलोस कापसांतील असून तो कच्च्या स्वरूपापासून हर किंवा स्तंभ वायुयुक्त क्षीण व उकळणार्या अनाम्लाच्या क्रियेनें वेगळा करतां येतो. या प्रकारचा पिशुलोस पुन्हां क्षीण अनाम्लासह उकळला असतां शुद्ध स्वरुपांत मिळतो. पिशुलोसवर्गाखालीं येणारे बरेच पदार्थ या कापसापासून काढलेल्या पिशुलोससारखे गुणधर्म दाखवितात तरी ते कांहीं बाबतींत भिन्न गुणधर्मीय आहेत. उदाहरणार्थ, संयोगीकरणाच्या बाबतींत ते सधर्मी असून विघटनेच्या बाबतींत विधर्मी आहेत.
खुद्द पिशुलोस हा जरी पेशींच्या मूळ जीवनरसांत उत्पन्न होत असला तरी त्यामध्यें नत्र नसतो पण अपुष्प वनस्पतींच्या पेशीबंधांतून हें नत्राचें प्रमाण शें. २-४ पर्यंत दिसून येतें, व अशा पिशुलोसवर जलक्रिया केली असतां आपणास एकोजशिवाय चिक्कस-अमिन व दार्वाम्ल (निरनिराळ्या पदार्थांतील) मिळतील. सपुष्प वनस्पतींच्या पिशुलोसमध्यें कांहीचें मिश्रण व कांहींचा रासायनिक संयोग झालेला असतो; ह्यांस संयुक्त पिशुलोस म्हणतात. ह्यामध्यें जे पदार्थ त्याच्याशीं संयुक्त झालेले असतात त्यावरुन त्यांचे पेक्टो, लिग्नो, क्यूटो यांसारखे निरनिराळे वर्ग करणे सोपें जातें. यांपैकीं पेक्टो पिशुलोसमध्यें कर्बोज्जितें त्यांच्या प्राणिदीकृत पदार्थांसह असून त्यांवर जलक्रिया केली असतां पिक्टिकाम्ल मिळतें. लिग्नोपिशुसमध्यें काष्ठीभूत पेशिजाल त्याच्या अपिशुलोस भागास लिग्नोन म्हणतात. क्युटो पिशुलोस हे उद्भिज द्वाररक्षक आच्छादनामध्यें असून त्याच्या विघटनापासून स्निग्धवर्गांतील अम्लासारखे निरनिराळे पदार्थ मिळतात. अंबाडीच्या वाखांतील तंतू हे पहिल्या प्रकारचे आहेत. धान्ययुक्त गवताच्या देंठांमध्येंहि याच प्रकारचे पिशुलोस असतात, व लांकडामध्यें हे पिशुलोस असल्याकारणानें ते बर्याच ठिकाणीं सांपडतात. व्यापारी दृष्टयाहि त्यांचा बराच उपयोग आहे. उद्भिाजांच्या बाह्य त्त्वचेंत क्यूटो पिशुलोसांचा प्रादुर्भाव असून त्यावर बर्याच रासायनिक द्रव्यांची क्रिया होत नाहीं, व म्हणूनच त्यांच्याकडून उद्भिाजाच्या अंतर्भागाचें संरक्षण केलें जातें.
पिशुलोस व वनस्पतिशास्त्र.- गुरांनीं खावयाच्या वनस्पतींपासून व भाजीपाल्याच्या वनस्पतींपासून अम्लिक व अनाम्लिक जलक्रिया करुन राहिलेला अवशिष्ट मूळतंतु हा त्या वनस्पतीमध्यें असणार्या पिशुलोसचें प्रमाण मोजण्यास उपयुक्त असतो. ह्या मूळ तंतूचें प्रमाण बीजामध्यें (म्हणजे गहूं, तांदुळ; व तैलयुक्त म्हणजे सरकी वगैरे) शें. २.८ ते १० पर्यंत, गुरांच्या चार्यास उपयोगी पडणार्या धान्यांत शें.२ ते ४, गवत वगैरेंमधून शें. ६० ते ७५ इतके असतें. पचल्या जाणार्या भागाचें प्रमाण हें ह्या आंकडयांच्या उलट प्रमाणांत मोजलें जातें. वनस्पतींतील सर्वच भाग पचला जात नाहीं. हिरवा चारा, वाळकें गवत व इतर धान्यें वगैरेंचें पचनाचें प्रमाण शें. २० ते ७५ पर्यंत आहे. पचन न झालेले पदार्थ हे, जास्त पाचक पदार्थ लवकर पचविण्यास उपयोगी पडतात. आतां हे पचन झालेले पदार्थ इतर पेशीयुक्त पदार्थांशीं मिश्रित करुन त्यांचा जमिनींत खताकडे उपयोग केला गेला तर ते आपले तंतू जमिनींत असणार्या खनिज पदार्थांशीं मिश्रित होऊन त्यांनां कमजोर करतात. वातावरणांतील वायु व आर्द्रता ह्यांचा जमिनींत शिरकाव करण्यास मदत करतात. कांही संयुक्त कलायडल् द्रव्यांवरहि यांची क्रिया होत असून ह्यूमस नांवाचा एक पदार्थ तयार होतो व या दृष्टीनें त्यांचा रासायनिक उपयोग बराच आहे.
पिशुलोस व रसायन शास्त्र.- कापसापासून काढलेला शुद्ध पिशुलोस हा एकोसचा संयुक्त पदार्थ आहे. त्यावरच गंधकाम्लाची क्रिया करुन मिळालेल्या संयुक्त द्रवावर जलक्रिया केली असतां विभक्त होऊन द्राक्षशर्करा मिळते. पिशुलोसची प्रयोगसिद्ध सारणी क६ उ१० प्र५ आहे. म्हणून त्यास द्राक्षशर्करेचें बहुपद अनुज्जिद असें म्हणतात. त्याचा साधीं इथ्रें उत्प्राणिदाशीं ३उ. प्र: क६ उ१० प्र५ या प्रमाणानें संयुक्त होऊं देण्याचा गुणधर्म व त्यांचा कर्बोज्जिताशीं असणारा संबंध लक्षांत घेऊन ग्रीन यानें खालील सारणी सुचविली.
Inset image
आपणांस हेंच मूलमान धरुन पिशुलोसची सारणी बसवितां येईल आणि हें मूलमान जर लहान असेल तर प्राणसांखळी वाढवून मोठी करतां येईल असें ग्रीनचें मत आहे.
inset image
याप्रमाणें दुसरीहि पिशुलोशच्या मूलमानाची सारणी सुचविलेली आहे. आतां कप्र आणि कउ२ यांच्या सान्निध्यांत त्यांचें कप्रउ व कउ यांमध्यें रुपांतर होत असल्यानें जास्त पदें घालून हें मूलमान मोठें करतां येतें. या सारणीच्या योगानें आपणास कोळसा उत्पन्न होण्याच्या वेळी त्यांत होत असलेलें कर्बाचें दृढीकरण, कांही पिशुलोसच्या बाबतींत जलक्रिया न होण्याचा गुणधर्म व सत्त्वाच्या गुणधर्माहून पिशुलोसमध्यें असलेल्या गुणधर्माची भिन्नता चांगलीच निदर्शनास येते. वास्तविक पहातां आज पिशुलोस आपणास ज्या स्थितींत मिळतो त्या स्थितींत असतांना किंवा त्यावर रासायनिक क्रिया करीत असतांना त्याची घटना साध्या सारणीच्या योगानें दर्शवितां येत नाहीं. त्याचे कलायडल् गुणधर्म लक्षांत घेतले असतां असेंहि म्हणतां येईल कीं पिशुलोस हें अण्वीय पिंडीकरण व इतर अवशिष्ट भाग या दोहोंविरुद्ध ध्रुवीभवनसमयीं होणार्या संयोगांतील स्थिति आहे. आणि ही स्थिति अस्थिर असून पिशुलोसवर रासायनिक क्रिया होत असतांना ती सारखी बदलत जाते.
मूळ पिशुलोस हा तंतुमय पदार्थ असून नेहमीं क्लेदयुक्त असतो. सुका असतांना तो विद्युद्विन्यस्त असतो, पण ओलसर केल्यास त्यामधून विद्युत् जाऊं शकते. पाण्यामध्यें त्याचा द्रव होत नाहीं. शे. ४० ते ५० अशा जशद- हरिदामध्यें किंवा अम्नयुक्त ताम्रप्राणिदामध्यें त्याचा द्रव मिळतो. ह्या त्याच्या द्रावणापासून पहिल्यामध्यें अल्कहल टाकलें असतां व दुसर्यामध्यें अल्क टाकलें असतां पुष्कळ जलयुक्त असा सांका मिळतो. व्यापारी दृष्टया या अम्ल- द्रवाचा बराच उपयोग असून त्यापासून (सांकायुक्त द्रावणामध्यें हे द्राव टाकले असतांना मिळणार्या घनापासून) निरनिराळ्या लांबीचे तंतू काढतां येतात. हे पुन्हां तयार केलेले तंतू आकारविशेषरहित असतात ह्या तंतूसच कृत्रिम रेशीम म्हणतात. ह्या पिशुलोसमध्यें मूळ पिशुलोसचे साधारण गुणधर्म दिसून येतात. हे त्याच्यापेक्षां जास्त स्वेदयुक्त असून हवेमधून जास्त आर्द्रता ओढून घेतात.
पिशुलोसपासून उत्पन्न होणार्या पदार्थांत सेंद्रिय किंवा निरिंद्रिय अम्लापासून तयार होणारीं संयुक्त इथ्रें बरीच महत्त्वाचीं आहेत. हीं संयुक्त इथ्रें देतेवेळेस हे पिशुलोश त्रिउज्ज- अल्कहलाप्रमाणें क्रिया देतात. ह्याच्यापासून नत्राम्लाची किंवा गंधकाम्लयुक्त नत्राम्लाची क्रिया केली असतां नत्रितें मिळतात. या नत्रितांपासून कृत्रिम रेशीम, सेल्युलाईड वगैरे तयार करतां येतात. ह्या नत्रितांचा उपयोग स्फोटक द्रव्यें म्हणून केला जातो, दार्विक अनुज्जिदांबरोबर संयुक्त इथ्रें मिळतात. अनाम्लिक पिशुलोस व कर्बद्विगंधकिद यांच्यापासून पिशुलोसपितितें मिळतात व अलीकडील 'व्हिक्सोस' व इतर कांहीं कारखान्यांतून ह्यांचा बराच उपयोग केला जातो. कापसांतील पिशुलोसवर शें. १५ ते २० दाहक सोडयाची क्रिया केली असतांना अनाम्लिक पिशुलोश मिळतात या अनाम्लीकरणाच्या योगानें मूळ पिशुलोस मधील सुरकुत्या वगैरे सर्व जाऊन तंतूस एक प्रकारची तकाकी येते. या कृतीस इंग्रजीमध्यें 'मर्सरायझेशन' असें म्हणतात.
विघटन.- पिशुलोसचा गंधकाम्लांतील द्राव पातळ करुन खूप उकळला असतां, त्यावर जलक्रिया होऊन आंबल्या जाणार्या शर्करा मिळतात. याच रीतीनें चिंण्यांपासून चिक्कल- शर्करा मिळते. थंड व क्षीण अम्लाची क्रिया यांच्यावर फारशी दिसून येत नाहीं पण ह्या क्रियेचा उपयोग पिशुलोस रंगविण्याकडे किंवा ओपविण्याकडे फार केला जातो. आम्लिक प्राणिदीकरणापासून प्राण- पिशुलोस तयार होतात. पण व्यापारी दृष्टया त्यांचें अनाम्लिक प्राणिदीकरण महत्त्वाचें आहे. कारण तें लवकर सुरु करतां येऊन थांबवितांहि येतें व त्याच्या योगानें मूळ पिशुलोसला कांही धक्का न लावतांना पिशुलोसला चिकटलेले कांहीं पदार्थ व रंगहि काढतां येतात. पिशुलोसवर विपाकक्रिया होत नाहीं व ज्या कांहीं थोड्यावर होते त्यांच्या विघातानें कर्ब- द्वि- प्राणिद वगैरे मिळूं शकतें. पिशुलोस तेजयुक्त ज्योतीनें जळतात. गंधकाम्लाशीं मिश्रित केलेल्या क्रुमिताम्लाच्या योगानें पिशुलोसचें प्राणिदीकरण पूर्ण होऊन आपणास कर्बाम्ल व पाणी मिळतें.
लिग्नो पिशुलोस.- वर सांगितलेले पिशुलोसचे बरेच गुणधर्म याहि पिशुलोसमध्यें दिसून येतात. ह्यामध्यें पिशुलोसचा भाग शें. ८० ते ५० पर्यंत दिसून येतो, व इतर लिग्नोनभाग असतो. लिग्नोनची सारणी क१९ उ२२ प्र किंवा क२६ उ३० प्र१० अशी असावी. कांही क्रियांचा योगानें पिशुलोस व लिग्नोन निरनिराळे करतां येऊन लिग्नोनचे विद्रुत होणारे पदार्थ मिळतात. हा पिशुलोस हरयुक्त होत असतांना मिळालेले पदार्थ द्विगंधकितामध्यें विद्रुत होणारे असतात. नुसत्याच द्वि- गंधकिताची पिशुलोसवर क्रिया करुन मिळालेले गंधकित पदार्थ पाण्यामध्यें विद्रुत होणारे असे असतात. या दुसर्या क्रियेचा उपयोग सकोन झाडांच्या पिशुलोसपासून कागद तयार करण्याकडे करतात. लिग्नोपिशुलोसे निलीन क्षाराशीं संयोगानें पिवळा रंग देतात. अदयुक्तपालाशअदिदांतील अद हें पिशुलोसमध्यें शोषलें गेल्याकारणानें पिंगट पिवळसर रंग मिळतो. वर सांगितलेले हरयुक्त पदार्थ व गंधकायितासह मिळणारे पदार्थ महत्त्वाचे आहेत. नत्राम्लाच्या योगानें लिग्नोपिशुलोसपासून लिग्नोन निराळे करतां येतात. लिग्नोनचें पूर्ण प्राणिदीकरण केलें असतां त्यापासून आपणांस काष्ठाम्ल, कर्बाम्ल, दार्वम्ल, पुत्तलिकाम्ल वगैरे अम्लें मिळतात. एकंदर क्रिया लक्ष्यांत घेतल्या असतां लिग्नोन पिशुलोसची सारणी 'बेंझनाइड' धर्तीवर आहे. क्युटो पिशुलोसचें अद्याप निर्णायक असें संशोधन झालें नाहीं.
पिशुलोसचा व्यापारी दृष्टया उपयोग.- हा उपयोग त्यांच्या दोन गुणधर्मांवर अवलंबून असतो. ते गुणधर्म म्हणजे (१) रचना व (२) रासायनिक गुणधर्म; त्यांपैकीं पहिल्या गुणधर्माचा उपयोग कागदांच्या वगैरे कारखान्यांतून होतो. रासायनिक गुणधर्माच्या बाबतींत. त्याच्यावर हवा, पाणी वगैरे द्रव्यांची रासायनिक क्रिया होत नसल्यानें ते चांगल्या रितीनें वापरतां येतात. सकोन झाडांच्या पिशुलोसपासून कागद तयार होत असल्याकारणानें ज्या ठिकाणी अशा झाडांची निपज फार आहे त्या ठिकाणींच हे कारखाने जोरानें चालतात. पिशुलोस नत्रितांचा उपयोग स्फोटक द्रव्याकडे केला जातो. विद्युद्वाहक तारांनां पिशुलोसदार्वित लावलें असतां विद्युद्विन्यस्त होतात. वर सांगितलेल्या मर्सरायझेशनच्या योगानें तंतूंस बरीच तकाकी आणतां येते. पिशुलोसपासून खालील तीन प्रकारांनीं कृत्रिम रेशीम तयार करतां येतें. (१) पिशुलोस नत्रित हें इथ्रअल्कोहलमध्यें विद्रुत करुन तें कांचेच्या अगदीं बारीक नळीमधून कारंज्यासारखें पाण्यामध्यें किंवा हवेमध्यें सोडलें असतां मिळालेल्या घन पदार्थापासून बारीक बारीक धागे काढतां येतात. यापासून आपणांस पाहिजे त्या जाडीचा धागा तयार करतां येतो. (२) पिशुलोसच्या ताम्र अम्रदावापासून अशाच प्रकारानें हा द्राव अम्लामध्यें जोरानें गरगर फिरवून मिळालेल्या घन पदार्थापासून निरनिराळ्या प्रकारचे धागे काढतां येतात. (३) पिशुलोस पितजिनिकाम्ल यास व्हिस्कोज असें म्हणतात यापासून कृत्रिम रेशीम तयार करतां येतें. प्रथमत: हें अम्रामध्यें किंवा अम्लामध्यें ओतलें असतां मिळणारा पदार्थ हेंच कृत्रिम रेशीम होय. याचा आणखीहि उपयोग कागदपांजणीकडे, कागदास चोपडण्याकडे, धागे विणण्याजोगे करण्याकरितां, पुस्तकास लागणारें कापड व निरनिराळ्या रचना असलेले घन तयार करण्याकडे करतात.