विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें   
    
पाली- राजपुतान्यांतील जोधपूर संस्थानांतील पाली जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. हे बान्डी नदीच्या वामतीरावर आहे. लोकसंख्या (१९११) १२९३९. मुख्य उद्योधंदे पितळेचीं भांडीं करणें, हस्तिदंतावर नक्षी काढणें, रंग देणें, सुती कापडावर छाप देणें हे आहेत. गांवाचे जुना पुरा व नवा पुरा असे दोन भाग आहेत. दोन मोठीं देवालयें आहेत. सोमनाथ मंदिरांत ११४३ सालचा लेख आहे व नवलाख ह्या देवालयाच्या आवारांत एक मसजीद आहे. परमार व परिहार रजपुतांनीं पाली ब्राह्मणांस इनाम दिलें होतें. १२१२ सालीं हे रावसिंहजीच्या ताब्यांत गेलें.

पाली- पाली भाषा संस्कृतपासून झाली नसली तरी तिला संस्कृतची धाकटी बहीण म्हटल्यास अयोग्य होणार नाहीं. पाली या शब्दाची व्युत्पत्ति प्रकट पासून असल्याचें रा. राजवाडे देतात. विंटरनिझ्‍झ ''पाली'' चा मूळ अर्थ 'रांग' समजतो (विभाग १, प्र. ३ पहा). या भाषेचें व्याकरण बहुतेक संस्कृतच्या धर्तीवरच आहे. लिपि ब्राह्मी आहे, व तिची सिंहली, ब्रह्मी, कांबोजी वगैरे वळणें आहेत. ज्या देशचें लिखाण असतें त्या ब्रम्ही, सिंहली, किंवा कांबोजी लिपींत ही भाषा लिहिण्यांत येते. पाली व संस्कृत भाषाव्याकरण यांत फारसा फरक आढळणार नाहीं. संस्कृत स्वर-व्यंजनांप्रमाणें पालींतहि स्वर-व्यंजनें आहेत. पण ऋ व लृ हे स्वर नाहींत; तसेंच ऐ व औ हे स्वरद्वय नाहीं; तर अ, इ, उ हे तीन ऱ्हस्व स्वर; आ, ई, ऊ, ए व ओ हे पांच दीर्घ स्वर, व अम्, इम्, उम् हे तीन अनुनासिक स्वर आहेत.

व्यंजनें दोन प्रकारचीं मानितात, घोसवा (आवाजी) व अघोसा (मुकी). घोसवा :- क, च, ट, त, प या पांच वर्गांतील शेंवटचीं तीन तीन व्यंजनें, व य्, र्, ल्, व् आणि ह्. अघोसा:- पांच वर्गांतील पहिलीं दोन दोन व्यंजनें, व स्. पाली शब्दांच्या अंतीं नेहेमीं स्वर असतो त्यामुळें विभक्तिप्रत्यय लावतांना संस्कृतप्रमाणें फारसा त्रास पडत नाहीं. पाली भाषेंत तीन लिंगें, दोन वचनें (द्विवचन बहुधां उपयोगांत आणीत नाहींत) व आठ विभक्तया आहेत. भवादि, रुधादि, दिवादि, स्वादि, क्रियादि, तनादि, चुरादि असे क्रियापदांचे सात वर्ग संस्कृतप्रमाणें पाडतात. वर्तमान आणि अपूर्णभूत हे विशिष्ट काळ, व पूर्णभूत, अद्यतनभूत, भविष्य व संकेतार्थ असे सामान्य चार काळ मानतात. अव्ययें, धातुसाधितें वगैरे संस्कृतांतल्याप्रमाणेंच होतात. द्वंद्व, तत्पुरुष कर्मधारय, अव्ययीभाव हे समास आढळतात.

ही भाषा. ख्रि. पू. ७ व्या शतकापासून उत्तर हिंदुस्थानांत चांगले सुधारलेले लोक उपयोगांत आणीत आहेत. आजहि ती ब्रह्मदेश, सयाम व सिलोन यांची वाड्मयीन भाषा आहे. जगांत ज्या कांहीं थोडया वाड्मयीन भाषा महत्त्वास चढल्या आहेत त्यांपैकीं पाली ही एक आहे. धार्मिक व राजकीय कारणांमुळें पालीला हें महत्त्व प्राप्त झालें. ख्रि. पू. ७ व्या शतकांत कोसल राष्ट्राच्या उत्कर्षामुळें, पाली भाषेला मोठी मान्यता मिळाली व आजच्या इंग्रजीप्रमाणें ती जागतिक दळणवळणाची माध्यम होऊन बसली. गौतमबुद्धानें या भाषेच्या द्वारेंच आपला धर्म पसरविला. लूथरच्या धर्मसुधारणेच्या चळवळीमुळें जर्मन भाषेला जी प्रसिद्धि मिळाली तीच या बौद्धसंप्रदायी पाली भाषेला प्राप्त झाली.

प्राचीन काळीं या पाली भाषेला मागधी भाषा म्हणत. मागधी म्हणजे मगध देशांत बोलली जाणारी भाषा नव्हे, तर कोसल आणि मागधाचा सम्राट जो अशोक त्याच्या दरबारीं प्रचारांत असलेली भाषा होय. भाषाशास्त्रदृष्टया मागधी हें नांव चूकीचें असलें तरी ऐतिहासिकदृष्टया तें अगदीं योग्य होईल. पाली भाषेचीं निरनिराळीं रूपें दृष्टीस पडतात. पण आज पाली हें नांव फक्त बौद्ध धर्मग्रंथाच्या भाषेला लावणें योग्य होईल. तिपिटक किंवा बौद्धधर्मशास्त्र पालीमध्यें आहे त्याचें सविस्तर विवेचन 'बुद्धोत्तरजग' या विभागांत एका स्वतंत्र प्रकरणांत (११ वें) केलें आहे. तिपिटकेतर पाली ग्रंथांची यादी त्या प्रकरणाच्या शेंवटी जोडली आहे. सिलोन, ब्रह्मदेश, वगैरे ज्या प्रदेशांत बौद्ध संप्रदाय-विशेषत: त्याचा हीनयान हा पंथ-प्रचलित होता तेथें पाली भाषा बरीच दृढमूल झाली व त्या देशांतील प्राचीन धार्मिक वाङ्मय याच भाषेंत रचलें गेलें. अर्वाचीन कालीं मात्र या भाषेस संस्कृत भाषेचीच स्थिति प्राप्त झाली आहे व ही बोलण्याच्या प्रचारांतून गेली असून नवीन वाङ्मयहि तींत क्वचितच तयार होतें.