विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
पार्मा- इटली एका प्रांताची राजधानी. हें पो नदीस मिळणार्या पार्मा नदीच्या तीरावर असून बलोन्जच्या वायव्येस ५५ मैलांवर आहे. येथील लोकसंख्या १९१२ सालीं ५४५८४ होती. हें शहर लोम्बार्डच्या सुपीक मैदानांत आहे. पुष्कळ ठिकाणीं पार्मा नदीचे कालवे पसरले आहेत. शहरांत एक भव्य चौक असून त्यांत गव्हर्नरचा वाडा व म्युनिसिपालिटी अशा दोन सुंदर इमारती आहेत. तेथें असम्शन नांवाचें एक संगमरवरी दगडाचें भव्य प्रार्थनामंदिर आहे.
इसवी सन १६०१ सालीं पडिल्ला रान्सिओ यानें येथें एक विद्यापीठ स्थापिलें. या पीठांत कायदा, वैद्यक आणि सृष्टिशास्त्र ह्यांचा शाखा असून एक प्राणिसंग्रहालय आहे. येथें धान्याचा आणि जनावरांचा व्यापार असून एक गोरसशाला (डेरी) आहे.
ख्रिस्ती शकाच्या पूर्वी १८३ सालीं पार्मा ही रोमन लोकांची वसाहत होती. ११, १२ आणि १३ ह्या तीन शतकांत चालूं असलेल्या ग्यूलेप आणि घिघेलाइनच्या तंटयांत पार्मा सामील होते. पार्माचे लोक ग्यूलेपच्या बाजूनें लढत होते. दुसरा फ्रेडरिक यानें १२४८ सालीं पार्माला वेढा दिला. परंतु त्याचा कांहीं फायदा झाला नाहीं. इसवी सन १३०७ सालीं हें कॉरोडीओ घराण्यांत गेलें. परंतु पुन्हां लवकरच स्वतंत्र झालें. १३४६ सालीं व्हायकाउंटनें तें विकत घेऊन तेथें एक बालेकिल्ला बांधला. इसवी सन १५१२ पासून ४५ पर्यंत पार्मा येथें पोपची सत्ता होती. यानंतर पार्मा येथें ८ डयूकांनीं राज्य केलें.