विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें
पटेलिया– मुंबई इलाख्यांत यांची वस्ती मुख्यत्वेकरून पंचमहाल जिल्ह्यांत आहे. लोकसंख्या सुमारें १४ हजार. चंपानेरच्या रजपुतांपासून आमची उत्पत्ति आहे असें त्यांचे म्हणणें आहे. १४९५ सालीं महंमद बेगडा यानें जेव्हां चंपानेर काबीज केलें त्यावेळेस हे लोक दोहद व बरैया येथें गेलें. मागें त्यांच्या बायका तशाच राहिल्या. नंतर त्यांनी भिल्लांच्या बायकांशीं लग्नें केलीं. यावरून त्यांना वेतालिग अथवा अशुद्ध म्हणूं लागले. बहुधां हे शेतकी अगर शेतांत मजुरी काम करणारे असतात. लग्नें मोठेपणीं करतात. लग्नाचा खर्च येऊं नये म्हणून मुलींनां पळवून नेण्याची चाल यांच्यात प्रचारांत आली आहे. त्यांचा मुख्य देव इंद्र व देवी हिंगलाज. त्यांचे उपाध्याय औदीच ब्राह्मण अथवा श्रीगोडब्राह्मण आहेत. [से.रि. (मुंबई) १९११.]