विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें
न्हावी– हिंदुस्थानांतील यांची लोकसंख्या (१९११) ३०१३३९९ असून त्यांत हिंदु व मुसुलमान आहेत. ही जात प्राचीन आहे. बुद्धाचा पट्टशिष्य उपाली हा न्हावीच होता. यांनां प्रांतभेदानें क्षौरक, केलासी, नायेड, खवास, महाल, भंडारी, मंगला, नायिंदा , हजाम, कारागीर इत्यादि नांवें आहेत. शंकराच्या अथवा शेषाच्या नाभी (बेंबी) पासून हे झाले अशी दंतकथा आहे. मराठी न्हाव्याचीं नांवें आडनांवें, देवकें व चालीरीती महाराष्ट्रांतील मराठ्यांप्रमाणें असल्यानें ते व मराठे पूर्वी एकाच जातीचे असावेत असा तर्क आहे. अद्यापि कांहीं ठिकाणीं उच्च मराठ्यांच्या जेवणावीळींत न्हावी हा पाणी वाढतो व नाशिक आणि खानदेशांत या मराठ्यांनां त्यांच्या हातचा स्वयंपाकहि चालतो. (सेन्सेस रिपोर्ट १९११. पु. ७ भा. १, पृ.२६१, पहा). हे अस्पृश्यांची हजामत करीत नाहींत. कांहीं वाजंत्र्याचा धंदा करतात. यांच्यांत मराठा व कोंकणी असा पोटभेद आहे. मराठ्यांमध्यें आठ कुळ्या आहेत. यांच्यांत पंचायती आहेत. महाराष्ट्रांत यांचे ठिकठिकाणीं गट आहेत. यांचे उपाध्याय ब्राह्मण असतात. विश्वनाथ नांवाच्या न्हाव्यानें अलीकडे एक नापित (नाभिक) पुराण रचिलें. यांच्यांत सेना न्हावी नांवाचा एक वारकरी साधु झाला होता. शिवाजीचा अंगरक्षक जिऊ महाला हा न्हावी होता. साप्रत या जातींत इंजिनियर, कंत्राटदार वगैरे धंदेवाले आहेत. बडोद्याचे प्रसिद्ध सनई वाजविणारे रा. गणपतराव पिराजी वसईकर हे न्हावी जातीचे आहेत. त्यांनीं सनईवादनावर पुस्तकें लिहिलीं आहेत. मुंबईस पहिला न्हावीखाना (हेअर कटिंग सलून) कै. लोणकर व बडनेरकर यांनीं काढला म्हणतात. गुजराथेंत हे लोक लग्न जुळविण्यांत मध्यस्थ असतात. पूर्वी हे लोक शस्त्रक्रिया करून तुंबड्या लावीत. यांच्या बायका सुयिणीचा धंदा करतात. यांच्यांत पांच पोटभेद आहेत. त्यांत लिंबाचिआ लोक श्रेष्ठ आहेत. यांच्यांत दिराशीं पुनर्विवाह लावतात. यांचे संस्कार व चालीरीती कुणब्यांप्रमाणें आहेत. यांच्या पंचायतीस एकाडा म्हणतात. मध्यप्रांतांतील यांचे पोटभेद स्थानिक आहेत. यांच्या चालीरीती कूर्मी किंवा कुणब्यांप्रमाणें आहेत. न्हावी हा गांववाड्यांतील एक बलुतेदार आहे. परदेशीं हिंदुस्थानी न्हावी लग्नाची मध्यस्थी करून, बहुतेक लग्नांतील कामें करतो. त्याच्या हातचें हुक्का पाणी त्या लोकांनां चालतें. तीर्थक्षेत्रांतील न्हावी यात्रेकरूंस फार त्रास देतात. यांच्या बायका चिंचेच्या झाडासमोर बुरखा घेतात. म्हैसूरकडे हे लोक शेतीहि करतात. तिकडे यांवे मोरासु, उप्पिना, नाडीगुर, राद्धिभूमी, शिलावंत (हे लिंगायत आहेत) हे पोटभेद आहेत. कानडी पोटजातींत गोत्रें आहेत. इकडे यांच्यातील एखादी मुलगी जन्मभर कुंवारहि राहते. मुलीच्या लग्नास वयोमर्यादा नाहीं. आसामांतील हे लोक स्वच्छ व टापटिपीचे असल्यानें त्यांच्या हातचें पाणी तिकडील ब्राह्मण पितात. आसाम खिंडींतील लोक कलिता जातीचे असावेत. पंजाबांतील हिंदु न्हावी आणल्यास क्षत्रियांचे व मुसुलमान न्हावी मोंगलांचे वंशज म्हणवितात. काश्मिरांतील यांची जात निरनिराळ्या जातींची मिळून झाली आहे. [ सेन्सेस ऑफ इंडिया. १९११ पु. ३, ७, १४, २०, २१; रसेल व हिरालाल पु. ४; रोझ-ग्लॉसरी. पु. ३; क्रुक्स-ट्राईब्ज अॅन्ड कास्ट्स. पु. ४; रा.म.सा. मांडे. बडोदे यांच्या माहितीचा सारांश. ]