विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
फैजाबाद- अफगाणिस्तानांतील बदक्शानची राजाधानी. ही कोकचा नदीच्या उजव्या तीरावर आहे. स. १८२९ मध्यें मुरादबेगनें हे शहर अगदीं धुळीस मिळविलें. बदक्शानचा सुभेदार फैजमहंमदखान यानें हें शहर पुन्हां १८६५ सालीं वसविलें. अबदुल रहमान अमीरानें हें पुन्हां भरभराटीस आणलें. पूर्व अफगाण व पामीर प्रांत यांचें हें लष्करी ठाणें आहे.
फैजाबाद, जिल्हा- संयुक्त प्रांत, अयोध्या प्रांतांतील फैजाबाद विभागांतील एक जिल्हा. हा गोग्रा नदीच्या दक्षिणेस पसरला आहे. क्षेत्रफळ १७३२ चौरस मैल व लोकसंख्या (१९११) ११७१९३०. यांत मोठीं गांवें ८ व खेडीं २७४६ आहेत. यांत अयोध्या हें हिंदूंच्या अत्यंत पवित्र स्थानांपैकीं एक आहे.
तहशील- ही गोग्रा नदीच्या तीरावर असून क्षेत्रफळ ३५९ चौरस मैल आहे. लोकसंख्या (१९११) २०८७५९. खेडीं ४६७ व गांवें ४; पैकीं फैजाबाद शहर जिल्ह्याचें व तहशिलीचें मुख्य ठिकाण आहे. जमीन एकंदरींत सुपीक आहे. ठिकठिकाणीं दाट जंगलें व दलदलीचे भाग आहेत.
गांव- लोकसंख्या (१९११) छावणी धरून ५४६५५. या ठिकाणीं औध-रोहिलखंड-रेल्वेच्या तीन शाखा मिळतात. गांवांत दोन इस्पितळें व तीन हायस्कुलें आहेत. येथें साखर शुद्ध करण्याचा मोठा कारखाना आहे. अयोध्या व फैजाबाद मिळून एक म्युनिसिपालिटी आहे. हें गांव अयोध्येचा नबाव सादतखान यानें वसविलें. पुढें लखनौस महत्त्व येऊन हें मागें पडलें.