विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
फिरदौसी (९४१-१०२०)- अबुल कासीम हसन बिन शरफ शाह फिरदौसी हा इराणी कवि तुझ (सांप्रतचें मशाद) जवळील शादब गांवीं (९४१) जन्मला. याला इराणचा होमर असें म्हणतात. यानें शाहनामा नांवाच्या ६० हजार श्लोकांच्या ग्रंथांत इराणी इतिहास साद्यंत नमूद केला आहे. यांत कैओमूर्सपासून सस्सानियन वंशीय येझ्दजर्द (तिसरा) याच्या अरबांनीं केलेल्या पदच्युतीपर्यंतचा (६४१) इराणचा इतिहास आहे. हा लिहिण्यास ३० वर्षें लागलीं. याच्या स. १४२६ त लिहिलेल्या प्रस्तावनेंत फिरदौसीची हकीकत आहे. येझ्दजर्द यानें कैओमूर्सपासून खुश्रूपर्यंतचा (६००) इतिहास (बास्ताननामा) अगाऊच लिहून ठेवला होता. पुढें महंमूद गिझनीकर यानें हें काम फिरदौसीस सांगितलें. त्याचा अबिआत फिरदौसी म्हणून दुसरा एक ग्रंथ आहे. (बील, शाहनामा.)