विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ
नंजराज (तिसरा)- हा म्हैसूरचा सर्वाधिकारी होता. याच्या बापाचें नांव कळ्ळे वीरराज होतें. म्हैसूरचा दोड्ड कृष्णराज मेल्यावर (१७३१) सर्व सत्ता या नंजराजाच्या हातीं आली. याच्याकडे सैन्याचें आधिपत्यहि होतें. हा स्वार्थी व महत्त्वाकांक्षी होता. याला दळवाई व सर्वाधिकारी असे किताब होते. यानें राजास नांवाचें बाहुलें केलें होतें. यानें दोन राजांस गादीवर बसविलें. दुसरा राजा याला कंटाळला व त्यानें हैदराच्या साहाय्यानें नंजराजाला अधिकारावरून सैन्याच्या बळावर दूर करविलें. हैदर हा मूळचा नंजराजाचा विश्वासू नोकर होता. नंजराजा व त्याचा भाऊ देवराज यांच्यांत तंटा लागला असतां व मराठ्यांनीं म्हैसूरवर स्वारी केली, तेव्हां (१७५९) हैदरच नंजराजाच्या उपयोगी पडला व त्याबद्दल त्यानें हंदैरास दळवाई केलें. पण राजाच्या सांगण्यावरून हैदरानें विश्वासघात करून नंजराजाला हद्दपार केलें; मात्र त्याला एक लाख होनांचा मुलूख खर्चाकरितां लावून दिला. याच्या वंशास दळवाई हें आडनांव पडलें आहे. कंठीय- नंजराज- बसवराज – नंजराज- कळ्ळॆ वीरराज- नंजराज व देवराज याप्रमाणें याची वंशावळी आहे. या दळव्यांनां म्हैसूरचें राजकर्ते म्हणत. [खरे-हैदरअल्लीवरील पहिली स्वारी; अय्यंगार- एन्शन्ट इंडिया.]