विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ
नॅक्सास- हें ईजिअन समुद्रांत एक बेट आहे. येथें उत्तम द्राक्षाचे मळे होते. बॅक्कसचा येथें फार मोठा उत्सव होत असे. प्राचीन ग्रीक लोकांच्या इतिहासांत येथील शिल्पकंलेला फार महत्त्व प्राप्त झालें होतें. हें डेलियन संघाचें घटक होतें. ख्रि. पू. ५०१ च्या सुमारास येथें लिग्डामिस नांवाचा एक राजा राज्य करीत असे. ख्रि. पू. ४९० या वर्षी हें बेट इराणी लोकांनीं जिंकलें. पुढें तें अथेन्सनें जिंकलें. तें अथेन्सचें साम्राज्य लयास जाईपर्यंत अथेन्सच्या ताब्यांत होतें. इ.स. १२०७ मध्यें व्हेनेशिअन मार्कोसॅनुडो यानें तें घेतलें. पुढें तें १५६६ सालीं तुर्कांच्या ताब्यांत गेलें. परंतु स्वातंत्र्याच्या युद्धांपासून तें ग्रीक राज्यांत आलें आहे. अजूनहि याची फळफळावळीविषयीं फार ख्याति आहे. येथील लोकसंख्या (१९०७) २५१८५.