विभाग पंधरावा: तपून - धमन्या
दुंदेखान रोहिला- रोहिलखंडांतील रोहिले हे दिल्लीच्या पातशहास फार त्रास देत. त्यांचें पारिपत्य एकट्या पातशहाच्यानें होईना. अखेर अली मुहम्मदखान या रोहिल्यानें स्वातंत्र्य जाहीर केलें. (१७४४). तो मेल्यावर त्याचा पुत्र सादुर्ल्ली हा गादीवर आला आणि दुंदेखान व हाफीझ रहिमत हे सरदार कारभारी झाले. बील म्हणतो दुंदेखान हा अलीचाच मुलगा व तोच त्याच्या मागून गादीवर आला. महंमदशहानें अखेर रोहिले, अब्दल्ली व सिंधचे अमीर वगैरेंच्या त्रासापासून मोकळें होण्याकरितां मराठ्यांशीं एक तह करून (१७५०) त्यांनां रोहिलखंड वगैरे प्रांतांची चौथाई दिली. त्यामुळें मराठ्यांनीं रोहिल्यांवर स्वा-या करून त्यांचा पुष्कळ प्रांत खालसा केला (१७५१) आणि ५० लाख खंडणी वसूल केली. रोहिले पूर्वीपासून दिल्लीच्या पातशाहीविरुद्ध असत; त्यामुळें त्यांनींच अब्दल्लीस हिंदुस्थानांत बोलाविलें. पानिपतप्रकरणांत व या वरील सर्व गोष्टींत हाफीज रहिमतप्रमाणेंच दुंदेखानाचा हात होता. रोहिलखंडाची वांटणी झाली, तींत याच्या वांट्यास बिसौली, मुरादाबाद, चांदपूर व संबळ हे जिल्हे आले. हा स.१७७३ च सुमारास मेला. त्याच्यानंतर तीन मुलांपैकीं वडील मोहिबुल्लाह हा गादीवर आला. (राजवाडे खंड. १, ३ , ६; मराठी रियासत भा. ४ ; इलियट, पु. ८.)