विभाग पंधरावा: तपून - धमन्या
थरवड्डी, जिल्हा— खालच्या ब्रह्मदेशांतीळ पेगू विभागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ २८५१ चौ. मैल. उत्तरेस प्रोम जिल्हा; पूर्वेस पेगूयोमा, दक्षिणेस इन्थवड्डी जिल्हा, पश्चिमेस इरावती नदी. ह्या नदीपलीकडे हेन्झड जिल्हा आहे. नदीकांठचा प्रदेश पाणथळ आहे. मुख्य नदी म्यिनमका हिचा उगम प्रोम जिल्ह्याच्या दक्षिणेस असलेल्या इनमातलावापासून होतो. पुढें रंगून नदी हें नांव तीस प्राप्त होऊन शेवटी ती समुद्रास जाऊन मिळते. ह्या नदीच्या पात्रांतून इमारती लांकडांचा वापर चालतो. इरावती व म्यिनमका ह्या दोन नद्यांमधील प्रदेश सखल आहे.
पेगूयोमा पहाडाच्या एका खोल दरीवर दगडाचा निसर्गनिर्मित पूल आहे. त्याची लांबी ५६० फूट आहे. जंगली श्वापदें— रान हत्ती, वाघ, चित्ते, गेंडे, हरिणें, अस्वलें वगैरे. हवा सर्द आहे. उन्हाळ्यात पारा १०३० पर्यंत चढतो. पावसाळा जून ते आक्टोबरपर्यंत. पाऊस ७९ इंच असतो.
१८ व्या शतकांत इरावती व पेगूयोमा मधील प्रदेशास थरवड्डी ही संज्ञा होती. दुसर्या ब्रह्मी युद्धानंतर जेव्हां पेगूचा प्रांत घेण्यांत आला होता तेव्हां थरवड्डी व हेन्झड ह्या दोन जिल्ह्यांचा 'थरवाव' नावाचा एकच जिल्हा बनविण्यांत आला होता. तेव्हा १८७८ पर्यंतचा थरवड्डी व हेन्झडचा इतिहास एकसारखाच आहे. पेगूच्या प्रांत ब्रिटिश राज्यास जोडण्यापूर्वी थरवड्डी हा पेगूच्या तेलैंग राज्याचा एक भाग होता. १९ व्या शतकांत येथील लोकांनीं बराच त्रास दिला. त्यांचा मुख्य कोणी गांगर्गइ म्हणून होता. पहिल्यानें ह्यानें कर देण्याचें नाकारिले व सरकारने नेमलेल्या माणसास त्यानें हाकून लाविलें. ह्यास ब्रह्मी सरकारची आंतून फूस होती. १८५५ सालीं त्यास ब्रह्मी राज्यांत हाकून लाविलें. सध्याचा जिल्हा १८७८ सालीं बनविण्यांत आला. या जिल्ह्याची लो. सं. (१९०१) ३,९५,५७०. सार्या ब्रह्मदेशांत थरवड्डी ह्या जिल्ह्यांत लोकसंख्या सर्वात अधिक आहे. मोठी गांवे लेटपडन, गियोबिनगाक, थोन्झ, झिगन, व मिन्हल; पैकी, पहिल्या तीन गांवी म्युनिसिपालिट्या आहेत. बहुतेक लोक बौद्धधर्मी आहेत.
ब्रह्मी व करेण ह्या दोन भाषा आहेत. खेडीं १८१९ टोनशिप ६— थरवड्डी, लेटपडन, मिव्हल, मोनयो. गोयबिनगाक व तपून लोक ब्रह्मी, करेण व शान असे तीन तर्हेचे आहेत.
येथें पाऊस नियमित व पुरेसा पडत असल्यामुळें जमीन अत्यंत सुपीक आहे. पाटाच्या पाण्याची किंवा खताची फारशी जरूरी नसते. म्यिनमका व इरावतीमधील प्रदेश अत्यंत सुपीक आहे. पण पुरामुळे पीक वाहून जाण्याची भीती असते. येथें तांदुळाची लावणी करतात. पहाडांच्या उतारांतूनहि पिकाची लागवड करितात. शेतकरी लोक आपआपल्या जमीनीत लागवड करितात. त्या लावून देत नाहींत. मुख्य पिकें तांदूळ, वाटाणे, तंबाखू, ऊस व मका ही आहेत.
पेगूयोमा डोंगरावरील जंगलांत सागवानी लांकूड सांपडते. राखून ठेवलेलें जंगल ७३६ चौ. मैल. सनिवे नांवाच्या खेडेंगांवी लांकडांची खूप जंगी वखार आहे. येथें मातीची भांडी तयार करितात. इतर धंदे करुन वेळेनुसार हा धंदा केला जातो. झिगन पोटविभागांत कापड वगैरे विणतात. मुख्यत्वेकरुन कांवळी जास्त विणतात.
रंगून ही मुख्य बाजार पेठ आहे. तेव्हां लांकूडफांटा वगैरे माल रंगूनास पाठविला जातो. आंत येणारा माल:— सर्व तर्हेचा परदेशी माल, कपडे, सुकी मच्छी तेल वगैरे. दळणवळण रेल्वेनें आणि इरावती व म्यिनमका नद्यांच्या पात्रांतून चालते. रंगून ते प्रोमला असणारी रेल्वे लाईन ह्या जिल्ह्यांतून जाते. नुकतीच लेटपडनहून थर्रवावपर्यंत एक रेल्वेलाईन सुरु करण्यांत आली आहे.
१९०३-०४ सालीं जमिनीपासून उत्पन्न ११२२ हजार रुपये झाले व एकंदर उत्पन्न २३२७ रुपयें होतें. झिगन व मिन्हल ह्या दोन ठिकाणीं गांवकमेट्या आहेत. शिक्षणाच्या बाबतींत हा जिल्हा बराच पुढे सरसावत आहे. येथें रुग्णालयें व बर्याच शिक्षणसंस्था आहेत.
टाउनशिप— याच जिल्ह्यांतील दक्षिणेकडील टाउनशिप. क्षेत्रफळ ३९१ चौरस मैल. १९०३-०४ सालीं ९७ चौरस मैल जमीन वहितीची होती, व उत्पन्न २,१३,००० रुपये होते.
गांव:— याच जिल्ह्याचें हे मुख्य ठिकाण आहे. लोकसंख्या १९०१ सालीं १६९३. यांत मामुली कचेर्या, फॉरेस्टस्कूल व इतर इमारती वगैरे आहेत. येथे पाण्याचा पुरवठा चांगला असल्यामुळें हें गांव जिल्ह्याचें मुख्य ठिकाण केलें आहे.