विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
तत्रक - यूरोपांत याचे सुमक असें नांव आढळतें. हें छोटें झाड कॅनरीज व मदीरा बेटें आणि भूमध्यसमुद्राचा कांहीं भाग व पूर्वेस अफगाणिस्तानापर्यंतच्या प्रदेशांत रानटी स्थितींत आढळतें. कित्येक ठिकाणीं याची मोठ्या प्रमाणावर लागवडहि करतात. ह्याच्या पानांत रंजक द्रव्य असतें. यूरोपमध्यें पानें व डहाळ्या या दोन्हीचा कातडीं कमाविण्याकडे उपयोग करतात. यूरोपमध्यें मोठमोठ्या कारखान्यांत कातडीं कमाविण्यासाठीं बाहेरून विशेषत: सिसिलीमधून पानें व हिंदुस्थानांतून डहाळ्या आणवितात. याच्यापासून मोरोक्को कातडें कमावितात. पुस्तक बांधणीला लागणारें कातडें यांच्यापासून उत्तम प्रकारें कमावितां येतें. ऑगस्टच्या सुमारास या झाडाचीं पानें पिकतात. नंतर झाडें कापून वाळत ठेवितात. वाळल्यानंतर पानें छाटतात. नंतर पानांची पूड करितात. ही पूड शुद्ध केल्यावर कातडीं कमाविण्याकरतां योग्य होते. या रोपासारखें ‘सोमॅक्को फेमिनेल्लो’ नांवाचें दुसरें एक झाड आहे. याची पानें लहान व हलक्या प्रतीचीं असून कधीं कधीं तत्रक झाडाच्या पानांत यांची भेसळ करतात.