विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
डेलवेअर - उत्तर अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांपैकीं एक संस्थान. याचें क्षेत्रफळ २३७० चौ. मै. असून त्यापैकीं ४०५ चौ. मैलांचा प्रदेश पाण्यानें व्यापिला आहे. लो. सं. (१९१८) २१६९४१ असून डोव्हर हें राजधानीचें शहर व त्याची लो. सं. (१९१०) ३७२० आहे. विल्मिंग्टन हे संस्थानांतील सर्वांत मोठें शहर आहे. या शहराची लो. सं. (१९१७) ९५३६९. मिलफोर्ड (लो. सं. २६०३) हेहि एक मोठें शहर आहे.
धा र्मि क पं थ इ त्या दि.- मेथॉडिस्ट, रोमन कॅथोलिक, प्रेतविटेरियन, एपिस्मोपेलियन आणि बॅप्टिस्ट हे संस्थानांतील मुख्य धर्मसंप्रदाय होत.
शिक्षण.- संस्थानांत सार्वजनिक शाळा अनेक असून त्यातून प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचें आहे. निग्रो लोकांच्या मुलांकरितां वेगळ्या शाळा आहेत. नेवार्क शहरीं उच्च शिक्षणाकरितां एक कॉलेज असून त्यास ‘डेलवेअर कॉलेज’ म्हणतात. डोव्हर येथें निग्रो जातींच्या विद्यार्थ्यांकरितां एक कॉलेज आहे.
संस्थानात एक रूग्णालय असून मुलीकरितां स्थापिलेली उद्योगशाळा आहे. आंधळे, बहिरे आणि मुके यांनां शिक्षण देणार्या संस्था असून अशा संस्थांनां संस्थानांकडून मदत मिळते. प्रत्येक परगण्यांत, अनाथपंगुगृहें असून त्यांची सर्व व्यवस्था ट्रस्टीच्या हातीं असते. आपल्या व्यंग असलेल्या मुलांचें पोषण आईबापांनां करावें लागतें. भणंग भिकार्यांना परगण्यांत घेण्याची बंदी असून या नियमाविरूद्ध वर्तन करणार्यास सिक्षा होते. येथील जमाखर्चांत ‘स्टेट जनरल फंडाची’ जमा (१९१८) ३२९४३३८२ व खर्च १०५२९५० डॉलर्स होता.
ख नि ज सं प त्ति व उ द्यो ग धं दे- हें संस्थान कृषिप्रधान असून शेंकडा ८५ एकर जमीन लागवडीखालीं (१९१०) आहे. मका आणि गहूं हीं मुख्य पिकें होत. टोमाटो आणि फळफळावळ यांचें मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतें. सुमारें १६००० एकर जमीन टोमाटोकरतां राखून ठेविली आहे. टोमाटोच्या निर्गतींत डेलवेअर संस्थानचा नंबर संयुक्त संस्थानात दुसरा लागतो. घोडे, खेचरें, मेंढ्या, डुकरें व दुभत्या गाई हीं जनावरें मुख्य आहेत. मासे मारण्याचा धंदाहि दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणांत चालत आहे. १९१५ त डेलवेअरमधील २८२२९२ डॉलर किंमतीच्या खनिज मालाची निर्गत झाली. बकर्याचीं कातडीं, लोकरीचें सामान (होजिअरी) आणि फळफळावळ यांची निपज मोठ्या प्रमाणावर होते.
रेल्वे.- १९१६ सालीं संस्थानात ३३५ मैल लांबीची रेल्वे होती. शिवाय १५३ मै. लांबीची विजेची रेल्वे होती. विल्मिंग्टन व न्यूयॉर्क या शहरांच्या मध्ये जलमार्गानें बराच व्यापार चालतो. १९१७ साली संस्थानांत २ सोव्हिंग्ज बँका असून, ३९,३१८ लोकांनीं त्यांत ठेवी ठेविल्या होत्या.
रा ज्य व्य व स्था.- १७ सभासदांचें वरिष्ठ मंडळ (सेनेट) आणि ३५ सभासदांचें प्रतिनिधिमंडळ असतें. वरिष्ठ मंडळांतील सभासदांची दर चार वर्षांनीं आणि प्रतिनिधिमंडळांतील सभासदांची दर दोन वर्षांनीं नवी निवडणूक होते, सेनेटर २७ वर्षांचा आणि प्रतिनिधि २४ वर्षें वयाचा असावा लागतो. काँग्रेसमध्यें डेलवेअर संस्थानांतून वरिष्ठ मंडळांतील २ सभासद आणि प्रतिनिधिमंडळांतील १ सभासद जातो. डेलवेअर संस्थान तीन परगण्यात विभागलें गेलें आहे.