विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
डार्डानेल्स, सामुद्रधुनी .- डार्डानेल्स सामुद्रधुनी (तुर्की-बहर-सफेद बोधसी) मार्मोराचा समुद्र व ईजियनसमुद्र यांनां जोडते. हिचें प्राचीन नांव हेलेस्पांट असें होतें. अगदीं अरुंद भागाचें रक्षण करणार्या दोन किल्ल्यांवरून हिला डार्डानेल्स म्हणतात व सुला व मिश्रडेटस यांच्या तहाबद्दल (ख्रिस्तपूर्व ८४) प्रसिध्द असलेलें ट्रोडमधील डार्डानेल्सचें नांव या सामुद्रधुनीला आहे. हिचा वायव्य किनारा म्हणजे गॅलिपोलीचें द्वीपकल्प असून आशियामायनरचा भाग म्हणजे आग्नेय किनारा आहे. या सामुद्रधुनीची लांबी ४७ मैल असून रुंदी सरासरी ३-४ मैल आहे. ईजियन बेटाकडे यूरोप व आशिया खंडांत अनुक्रमें सेदिल बहर व कुमकले नांवाचे किल्ले आहेत. मार्मोराच्या बाजूला अनुक्रमें उत्तर व दक्षिण बेटावर गॅलिपोली व लॅमसर्ड अथवा लॅपसद्दी हीं दोन गांवें आहेत. डार्डानेलेसचे दोन चांगले किल्ले म्हणजे चजक-कलेहसी व सुलतानिए कलेहसी अथवा टालमियालियाचा जुना किल्ला आणि किलिर बहर अथवा रुमेलियाचा जुना किल्ला. डार्डानेल्स ऐतिहासिक दृष्टया फार प्रसिध्द असून क्सक्र्सीझ व शिंकदर यांनीं होड्यांचा पूल करून ही सामुद्रधुनी ओलांडली होती. व्यूहरचनाशास्त्राच्या दृष्टीनें सुध्दां डार्डानेल्सचें महत्त्व असून भूमध्यसमुदांतून कॉन्स्टांटिनोपलकडे येणार्या मार्गाचें हें नाक आहे. या मार्गांचें रक्षण करण्यास फार त्रास पडत नाहीं इतकें असून सुध्दां इंग्लिश अॅडमिरल डफवर्थ हा सर्व किल्ल्यावरून मार्मोराच्या समुद्रांत शिरला. स. १८४१ जुलैचा तह व स. १८५६ चा पॅरिसचा तह यांच्या अन्वयें तुर्की सरकारच्या हुकुमाशिवाय कोणत्याहि लढाऊ जहाजांस आंत शिरतां येत नसे. परंतु गेल्या महायुध्दानंतर ही सामुद्रधुनी सर्वांस खुली ठेवण्यांत आली आहे.
शहर.- डार्डानेल्स (तुर्की-सुलतानिए कलेहसी अथवा चनक कलेहसी) हें आशियामायनरमधील बिघा नांवाच्या लहान तुर्की प्रांताचें मुख्य शहर आहे. हें होडियस नदीच्या मुखाशी असून डार्डानेलेस सामुद्रधुनीच्या सर्वांत अरुंद भागावर आहे. ह्या ठिकाणीं सामुद्रधुनीची रुंदी ३ मैल आहे. अलीकडे हें शहर फार भरभराटीस चढलें. लष्करी लोक खेरीजकरून येथील लोकसंख्या १३००० आहे. तींत निम्मे तुर्क आहेत. येथील गव्हर्नर व सामुद्रधुनीच्या दोन्ही कांठावर असलेल्या किल्ल्यांचे किल्लेदार येथें राहतात. तुर्की आरमार नागारा (प्राचीन श्रविडॉस) येथे आहे. दरवर्षी सुमारें १२००० व्यापारी गलबतें या सामुद्रधुनींतून जातात. तयार माल, साखर, पीठ, कॉफी, तांदूळ, कातडी व लोखंड यांची आयात होते व निर्गत मालांत व्हॅलोनिया ओक, गहुं, जव, बीन (कडधान्य), इमारती लांकूड, मद्य व मातीची भांडी हा मुख्य माल आहे.