विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
डार्ट्माउथ - इंग्लंडमधील डेव्हॉनशायरच्या टॉरक्वे प्रतिनिधिविभागांत डार्टमाउथ बंदर, हें बाजारचें शहर असून म्युनिसिपालिटीचा एक विभाग आहे. क्लायमाउथच्या पूर्वेस २७ मैलांवर हें आहे. १९०१ सालीं येथील लोकसंख्या ६५७९ होती. पश्चिम तीरावर डार्ट नदीच्या मुखाजवळ हें आहे. येथून किंगस्वेअरपर्यंत आगबोटीचें दळणवळण होतें. सेंट सेव्हिऑर प्रार्थनामंदिर व डार्टमाऊथ किल्ला येथें आहे. बाष्प एंजिनाचा शोधक थॉमस निकोमन ह्याच्या झोपडीचे भाग अजून राखून ठेवले आहेत. याटबोटीचें, जहाजें बांधण्याचे, दारूचे व शिल्पकलेचे वगैरे कारखाने येथें आहेत. कोळसा हा येथील आयात माल आहे. ४ मेअर, सनदी शहरचे अधिकारी व १२ सभासद हे कारभार पाहतात. शहराचें क्षेत्रफळ १९२४ एकर आहे. १३०२ साली इंग्लंडच्या राजानें स्कॉटलंडवर स्वारी करण्याकरितां दोन आरमारी जहाजें घेतली. १३३७ सालीं येथील लोकांची डोईपट्टी माफ झाली. १३४२ सालीं हें शहर संघटित झालें. १४०४ सालीं फ्रेंचांनीं डार्टमाउथवर हल्ला केला पण त्याचा पुरा मोड झाला. १४ व्या आणि १५ व्या शतकांत बोर्डो व ब्रिटनीशीं याचा व्यापार होता.