विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
डामर(डांबर) - हा २ प्रकारचा असतो; (१) निरनिराळ्या झाडांपासून होणारा, व (२) कोळशापासून होणारा. यूरोपांत रशिया, फिनलंड व स्वीडन या देशांतील पाइन झाडांच्या अरण्यांत पहिल्या प्रकारचा डामर तयार होतो. युनायटेडस्टेट्स् देशांतील कॅरोलिना, ऑर्जिया, वगैरे संस्थानांतहि पाइन झाडांपासून डामर करतात. या डामराचा रंग काळा किंवा पिंगट असतो. त्यांत थोडें असेटिक अॅसिड असतें. तो या अॅसिडमध्यें किंवा अल्कोहोलमध्यें विरघळतो. हिंदुस्थानांत ज्या झाडापासून डामर होतो त्याला नांवें आहेत तीं - पिने व्हार्निश, इंडियन कोपल अथवा मलबार टॅलो; देशी नांवें- कहरुबा, संद्रस, राळ, वेलै- कुत्रिकम, पैनिपिशिन, कुंगिलियस्, पिनेमरस्, गुगलि, दुपामरम्, धुपद, पयानि इ.\
हीं नेहमीं हिरवीं असणारी झाडें कर्नाटकपासून त्रावणकोरपर्यंत, पश्चिमघटाच्या पायथ्याशीं (४००० फुटांपर्यंत) वाढतात. कधीं कधीं हीं झाडें रस्त्याच्या बाजूलाहि लावतात. अंबोयना बेट व मलाया द्वीपकल्प यांतहि डामर निघणारीं झाडें आहेत. याचा रस झाडांच्या फांद्यावर व बुंद्यावर आपोआप वाहून येऊन त्याचे घट्ट गोळे होतात. हा पदार्थ राळेसारखा दिसतो; व त्याला हिंदी भाषेंत राळ म्हणतात. याला संस्कृतांत यक्षधूप असें नांव आहे. ह्या राळेलाच सफेत डामर म्हणतात. हा मद्यार्कांत फारच थोडा विद्रुत होतो पण टर्पेंनटाईनमध्यें व सुकणार्या तेलांत चांगला विद्राव्य आहे. कोपलप्रमाणें याचाहि उपयोग रोगण देण्याकरितां होतो. कांहीं ठिकाणी ह्या राळेंत खोबरेल मिसळून मेणबत्त्या तयार करतात.
कोळशापासून डामर होतो. पूर्वी याला गॅस-टार' म्हणत. कोल-गॅस तयार करतांना हा पैदा होत असे. हल्लींहि या प्रकारें डामर बराच निघतो. पण कोळशापासून दुसर्या कृतीनेंही डामर करतात. १८६० सालीं 'किंग्स्टन' नांवाच्या एंजिनियरनें कोळशापासून डामर वगैरे करण्याची कृति पूर्णत्वास नेली. 'अशुध्द नाफ्था,' हलकें तेल, 'कॅर्बालिक रोल' 'कृमिनाशक तेल', 'रंगाल (अंध्रासीन) तेल' या डामराच्या पंचांगांपासून अग्निशोधन क्रियेनें 'बेन्झीन', 'टूलीन', 'झायलीन', 'नाफ्थालीन' 'अंध्रासीन', 'फेनौल', 'क्रंसोल' इत्यादि बहुमोल दंव्यें निघूं लागलीं आणि याच द्रव्यांपासून पुढें क्रमाक्रमानें आणि योग्य रसक्रियेनें सर्व प्रकारचें, अत्यंत उपयोगी, सुंदर, कृत्रिम रंग, नाजुक कृत्रिम अत्तरें, खरी परिणामकारी कृत्रिम औषधें, खतें, कृत्रिम साखर, भयंकर ज्वालाग्राही उत्पातद्रव्यें, अग्निवारणद्रव्यें, वारिवारणद्रव्यें, मोटारीचें तेल (स्पिरिट), कृत्रिम रसायनद्रव्यें किंबहुना कृत्रिम अन्नसत्त्वहि रोजच्या रोज खंडोगणती उत्पन्न होऊं लागलें. जो 'डामर' लोकांनां, कारखानदारांना, म्युनिसिपालिट्यांनां आणि सरकारला अगदीं नको नकोसा झाला होता, तोच दगडी कोळशाचा डामर आतां पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांनां सोन्याची खाण होऊन बसला आहे. जर्मन रसायनशास्त्रज्ञांनीं आपल्या अतुल बुध्दिबलानें आणि प्रयोगकुशलतेनें या डामराचे काय वाटेल ते कृत्रिम पदार्थ तयार केले आहेत. हे कृत्रिम पदार्थ इतके गुणकारी, उपयोगी आणि बहुमोल झाले आहेत कीं, त्यांच्या अभावीं आतांच्या सुधारलेल्या जगांतील मनुष्यांचें सुसंस्कृत जीवन एक दिवस देखील सुखानें चालणार नाही. इंग्लंड आपला डामर घाण म्हणून आणि थोडा पैसाहि येतो, म्हणून आतांपर्यंत जर्मनीला पाठवीत होते; परंतु ही अकल्पित 'संपत्संभवता' पाहून 'इंग्लंडचा उत्पन्न होईल तितका डामर इंग्लंडमध्येंच राहिला आणि उपयोगिला पाहिजे' अशा प्रकारची न्याय्य मागणी इंग्लिश लोकांनीं आणि कारखानदारांनीं नुकतीच एकमतानें केली आहे.
सृष्टीमध्यें असणारे आणि नसणारेहि हजारों प्रकारचें सुंदर रंग डामरापासून तयार होतात. त्यांमध्यें हिंदुस्थानच्या दृष्टीनें विचार करतां, 'कृत्रिम नीळ' आणि 'कृत्रिम मंजिष्ठ' या दोनच रंगांचा उल्लेख केला असतां पुरे होणार आहे. 'कृत्रिम नीळ' कॅर्बालिक तेलापासून-नाफ्थालीनपासून, त्याप्रमाणेंच इतर अनेक पध्दतींनीं तयार करितात. 'कृत्रिम नीळ' बनविण्याच्या एकंदर ३१६ निरनिराळ्या पध्दतींचे 'सर्वाधिकारत्त्व' रसायनसंशोधकांनीं जर्मनीमध्यें घेतलेलें आहे. 'डामर' किंवा डामरजन्य पदार्थ हें या सर्व पध्दतीचें मूल आहे. 'कृत्रिम मंजिष्ठ' रंगाल (अंध्रसीन) तेलापासून तयार करितात. या दोन सुंदर, बहुमोल, नैसर्गिक रंगांचा केवढा मोठा व्यापार हिंदुस्थानांत चालत होता? आणि त्या व्यापारावर किती लोक आपल्या पोटापाण्याला सुखासमाधानानें मिळवीत होते? थोड्याच वर्षांपूर्वी १५ लक्ष एकर जमीन व्यापणारी 'नीळ' आतां जेमतेम ३ लक्ष एकर जमिनींत पिकविली जाते. नैसर्गिक मंजिष्ठ तर पार ठार झाला ! दुसरेहि अनेक बहुमोल रंग स्मरणातूनहि नाहीसें झाले ! हिंदी रंगाचा व्यापार पार बुडाल्यानें लक्षावधि लोकांच्या नशिबी दारिद्र्य आलें आहे.
डामरापासून उत्पन्न होणार्या कृत्रिम अत्तरांमध्यें, गुलाब, जाई, कस्तुरी आणि विशेषत: 'कुमारीन्', 'व्हानिलिन्' आणि 'हेलिओट्रापीन्' या फारच नाजुक, मोहक आणि किंमतवान अत्तरांचा अवश्य उल्लेख केला पाहिजे. सृष्टींमध्यें उत्पन्न होणार्या सर्व फुलांची अत्तरें कृत्रिम रीतीनें तयार करूं लागले आहेत. नैसर्गिक 'कुमारीन्' 'व्हानिलिन्' आणि नैसर्गिक 'हेलिओट्रापीन' या अत्तरांची किंमत दर शेरी अनुक्रमें २७५, ७५०, आणि २१५० रुपये होती. हीं सारीं मधुर वासांचीं आणि अंत:करणाला गुंगविणारी अत्तरें आतां डामरजन्य 'बंझिन' आणि कॅर्बालिक तेल' या द्रव्यांपासून तयार करतात. यांत मधुरता बहुतेक नैसर्गिक अत्तरांचीच; पण किंमत मात्र दरशेरीं अनुक्रमें १९, २३, आणि ८ रुपये पडते. कोठे २१५० रुपये आणि कोठें ८ रुपये !
डामरापासून ज्वरहारक, ग्लानिहारक, कफहारक, शुध्दिहारक आणि मृत्युंजय इत्यादि गुणांचीं सुमारे ५००० कृत्रिम औषधें सध्यां तयार करतात; हीं रोगहारक, आरोग्यसंबंर्धक आणि प्रसंगविशेषी मृत्यूलाहि जिंकणारी औषधें 'बेंझीन' 'टूलीन' 'झायलीन' इत्यादिं द्रव्यांपासून विशिष्ट रासायनिक क्रियांनीं तयार करतात. गेल्या २५ वर्षांतील इन्फ्लुएंझाच्या साथीमध्यें वर दिलेल्या कृत्रिम औषधांपासून जर्मनीला बरीच प्राप्ति झाली. या अकल्पित प्राप्तीमुळें जर्मन रसायनसंशोधकाचे, व्यापार्याचे आणि कारखानदारांचे प्रयोग, प्रयत्न आणि कारखाने दसपट अधिक धडाडीनें आणि शेकडोंपट अधिक फायद्यानें चालू लागले. प्रयोग चालूं असतांना रसायनशास्त्रज्ञांनां आणि डॉक्टरांनां ''अॅड्रेनॅलीन'' नांवाच्या औषधाचे फारच विलक्षण गुणधर्म दिसून येऊं लागले. 'अॅड्रेनॅलीन' अनेक प्रसंगी मृत्यूवरहि जय मिळवू लागलें. परंतु हें औषध फारच दुर्मिळ, केवळ राजे महाराजांनांच त्याचा उपयोग करतां येत असे. एक शेर 'अॅडेनॅलीन' तयार करण्यास ४०००० बैलांच्या मृत्रपिंडा (सुपर्या रीनल ग्ल्यांडस्) चें सत्व लागत असे. या मृत्युंजय परंतु दुर्मिळ 'अॅड्रेनॅलीन' कडे, अर्थातच जर्मन रसायनशास्त्रज्ञांचें आणि कारखानदारांचें लक्ष गेलें. 'एफ् स्टोल्झ' नांवाच्या रसायनशास्त्रज्ञानें 'अॅड्रेनॅलीन' चें रासायनिक स्वरूप प्रथम निश्चित केलें, आणि नंतर लागलीच 'कॅटचोल' नांवाच्या फोटोग्राफीमध्यें फारच उपयोगी पडणार्या व डामर द्रव्यांपासून तयार होणार्या पदार्थांपासून 'स्टोल्झ' यानें कृत्रिम 'अॅड्रेनॅलिन' तयार केलें. ४०००० बैलांच्या मूत्रपिंडांचें मोठ्या बिकट प्रयोगांतीं मिळणारें किंबहुना अत्यंत दुर्मिळ असें सत्व कोणीकडे, आणि सर्वत्र विपुलतेनें मिळणारा बिनखर्ची 'डामर' कोणीकडे ! 'स्टोल्झ' च्या या लोकोत्तर लोकसेवेनें 'अॅड्रेनॅलीन' हें मृत्युंजय औषध आतां गरीबांनांहि सुलभ झालें आहे. बर्मिगहॅमचा डॉ. वाकर यानें 'अॅड्रेनॅलीन' चें सत्व शरीरांत टोचून एक ११ महिन्यांचें मूल आणि ३० वर्षांची तरुण बाई मृत्यूच्या दाढेंतून परत आणून, शास्त्रज्ञ आणि सामान्य जगांमध्यें विलक्षण खळबळ उडवून दिली. रक्ताभावामुळें मृत्यूच्या करालदाढेंत सांपडलेल्या लोकांनां 'अॅड्रेनॅलीन' च्या मृत्युंजय गुणामुळें जगांमध्यें परत येऊन चांगल्या रीतीनें जगण्याची पुन: आशा वाटूं लागली !