विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
डाग्वेरे, एल् जे. एम.- एल. जे. एस्. डाग्वेरे हा एक फ्रेंच चितारी आणि पदार्थविज्ञानशास्त्रवेत्ता होऊन गेला. याचा जन्म १७८९ सालीं फ्रान्स देशांत झाला आणि तारीख १२ जुलै १८६१ रोजीं हा मृत्यु पावला. प्रथमत: हा चितार्याचा धंदा करूं लागला परंतु पुढें हा फोटोग्राफींची कला शिकण्याच्या मागें लागला. जे. नैसफोर नैपिसे यानें १८१४ सालापासून प्रकाशाच्या सहाय्यानें चित्रें तयार करण्याचा प्रयत्न केला; सन १८२९ सालीं त्यानें डाग्वेरे याला यासंबंधानें माहिती करून दिली. यानंतर कांही काळपर्यंत या उभयतांनीं यासंबंधानें सहकार्य करून प्रयोग केले. हे प्रयोग सन १८२९ते सन १८३३ पर्यंत चालले होते. सन १८३३ मध्यें जे. नैसफोर नैपिसे याचा मृत्यु झाला; यानंतर एकट्या डाग्वेरे यानेंच पुढें प्रयोग चालू ठेविले. १८३९ सालीं अरागो यानें अक्याडेमी आफ् सायन्सेस नांवाच्या संस्थेत डाग्वेरेच्या प्रकाशलेखनपध्दतीचें महत्त्व शास्त्रज्ञांच्या नजरेस आणलें. डाग्वेरे याला लिजन ऑफ ऑनर नांवाच्या एका संस्थेला आधिकारी नेमून त्याचा सन्मान करण्यांत आला; व फ्रान्स देशाचा राज्यकारभार चालविणार्या चेम्बर नांवाच्या दोन्ही सभांनीं तारीख २२ ऑगष्ट रोजीं पुढें दिल्याप्रमाणें एक ठराव पास केला. ''नैपिसे याचे वारस आणि डाग्वेरे यांनीं प्रकाशलेखनाची कला अक्याडेमीला कळवावी व त्याबद्दल डाग्वेरे याला सालिना ६००० फ्रान्क आणि नैपिसे याच्या वारसास ४००० फ्रान्क याप्रमाणें सालीना मिळत जावे,'' याप्रमाणें हा ठराव होऊन नंतर २ आगष्ट रोजीं फ्रेंच सरकारनें प्रकाशलेखनाची प्रसिध्दि केलीं व ती युक्ति लवकरच सर्वश्रुत झाली.