विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
डाका, जिल्हा.- बंगाल प्रांतांतील एक जिल्हा. क्षे. फ. २७८१ चौ. मै. याच्या नेऋत्येस पद्मावतीच्या पलीकडे फरीदपूर; पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदीचें जुनें पात्र व तिच्या पलीकडे टिप्पेरा; उत्तरेस मैमेनसिंग; व वायव्य कोंपर्याला ब्रह्मपुत्रा (किंवा यमुना जमुना) व तिच्या पलीकडे पाटण जिल्हा.
स्वाभाविक वर्णन:- पद्मा किंवा हल्लींचें गंगेचे पात्र व मेघना यांच्यामध्यें असलेल्या या जिल्ह्याचा आकार निमुळता असून, नद्यांची खळमळ व पूर यांच्या योगानें येथील भुसभुशीत जमिनींत वारंवार फरक होत असतो. एक शतकापूर्वी ब्रह्मपुत्रेचें पात्र या जिल्ह्याच्या पूर्व सरहद्दीवरून गेलेलें असून तिचा पद्येशीं संगम दक्षिण टोंकास झाला होता. परंतु हा प्रवाह सध्यां पश्चिमेकडे गेलेला असून, जिल्ह्याच्या वायव्य टोंकाला गोवलुंदोजवळ तो वद्येस मिळतो; व पुढें हे एकच झालेले प्रवाह मेघना या नदीमुखानें उपसागरास मिळतात. हा जिल्हा एक सपाट मैदान असून त्यांत मधुपूर हे एकच वन आहे; ह्या वनांतून वहाणार्या बन्ती व लख्या नद्यांच्या पात्रामुळें झालेल्या खोल दर्यातील शोभा सुंदर आहे. या जिल्ह्यांत तीन नद्यांची पात्रें असल्यामुळें, पावसाच्या व हिमालयावरील बर्फ वितळून आलेल्या पाण्याच्या योगानें नद्यांनां पूर येऊन प्रदेश जलमय होऊन जातो. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत उष्णमान ८४० व हिंवाळ्यानंतर ६७० असतें. वार्षिक पाऊस सरासरी ७२ इं पडतो.
इतिहास:- धलेश्वरी नदी ही कामरूपच्या राज्याची दक्षिण सीमा होती व करतोया नदी ही पश्चिम सीमा होती. यशपालाच्या स्मरणार्थ ढाकरी येथें, हरिश्चंद्रपालाच्या स्मरणार्थ साभार येथें टेंकड्या आहेत; महून येथें शिशुपाल रहात होता असें म्हणतात. ९ व्या शतकाच्या प्रथमार्धात बंगालमध्यें सत्ताधीश असलेल्या बुद्भधर्मी पाल घराण्याशीं या पाल राजांचा कांहीं संबंध असावा. धलेश्वरीच्या दक्षिणेस विक्रमादित्याच्या नांवावरून बनलेला विक्रमपर नांवाचा परगणा आहे. त्यांतील रामपाल या ठिकाणीं विक्रमादित्याच्या वेळेपासून मुसुलमानांच्या वेळेपर्यंत हिंदू राजांची राजधानी होती. बंगालचा अति प्रसिद्भ बल्लाळसेन याचा दरबार येथें भरत असे.
मुसुलमान लोक बंगाल प्रांतांत प्रथम ११९९ सालीं आले. स. १२९६ त दिल्लीचा बादशहा झाल्यावर अल्लाउद्दीनानें बंगालची विभागणी करून बहादुरशहाला आग्नेय भागाचा सुभेदार नेमिलें; त्याची राजधानी हल्लींच्या डाका शहराच्या पूर्वेस १५ मैलांवर मेघना नदीच्या कांठीं सोनारगाव येथें होती. स. १३३० त महंमद तघलखानें तीन प्रांत स्थापून बहरामखानाला सोनारगांवचा सुभेदार नेमिलें. स. १३५१ त शमसुद्दीनानें बंगाल प्रांत एक केल्यापासून सोनारगांव हीं बंगालच्या सुभेदारांची राजधानी होती. स. १६०८ त शेख इस्लामखानानें आपली राजधानी राजमहालातून डाका येथें आणलीं. याचें कारण त्यावेळीं सरहद्दीवर परक्यांच्या स्वार्या होत होत्या; उत्तरेकडे आसामचे होम व दक्षिणेकडून मघ किंवा आर्कनी, पोर्तुगीज चांचे लोकांच्या मदतीनें स्वार्या करीत होते. मोंगल सुभेदारानें पोर्तुगीज लोकांच्या हाताखालीं जहाजांवर पुष्कळ सैन्य ठेवून आपल्या सरहद्दांचें संरक्षण केलें. १६६० सालीं मीरजुमला बंगालचा सुभेदार असतां डाका जिल्ह्याची फार भरभराट झाली. मधांच्या स्वार्यापासून बचाव करण्याकरितां, लख्या व धलेश्वरी यांच्या संगमावर त्यानें बांधिलेल्या किल्ल्यांचे अवशेष अद्यापहि दिसतात. मीर जुमल्याच्या पाठीमागून नूरजहानचा पुतण्या षाइस्तेखान हा सुभेदार झाला. त्यानें चित्तगांव साम्राज्यास जोडून अवरंगझेबाच्या हुकुमानें इंग्रजांच्या वखारी जप्त करून डाका येथील व्यापारी गुमास्त्यांस तुरुंगांत टाकिलें. या दोन्ही सुभेदारांनी इमारती व सार्वजनिक कामें करण्याला पुष्कळ उत्तोजन दिलें. १७०४ सालीं मुर्शिद कुलीखानानें मुर्शिदाबाद येथें राजधानी नेल्यापासून डाकाच्या उतरत्या कळेस प्रारंभ झाला. १७५७ सालीं येथें ब्रिटिश सत्ता स्थापन झाली.
लोकसंख्या'- १९०१ सालीं या जिल्ह्यांतील लोकसंख्या २६४९५२२ होती. माणिकगजचा पश्चिम भाग सोडून इतर ठिकाणची हवा निरोगी असल्यामुळें लोकांची भरभराट होत आहे. बहुतेक भागांत वस्ती फार दाट झाल्यामुळें लोकसंख्या पूर्वीप्रमाणें झपाट्यानें वाढणें शक्य नाहीं. ह्या जिल्ह्यांतून कांहीं लोक बकरगंजकडे शेतीच्या कामांत मदत करण्याकरितां जातात; परंतु संयुक्त प्रांत व बहारमधून तागाच्या कामाकरितां लोक आल्यामुळें लोकसख्येंत फारसा फरक पडत नाहीं. येथील मुख्य भाषा बंगाली आहे. लो. सं. पैकीं शे. ६० च्यावर मुसुलमान आहेत व शेंकडा ३७ हिंदू आहेत.
शेतकी:- जमीन, हवा व नद्या हीं सर्वच शेतकीला अनुकूल असून पाऊसहि भरपूर पडल्यामुळें कृत्रिम रीतीनें पाणी देण्याची फारच थोडी गरज लागते. वार्षिक पुरानें जिल्ह्यांचा बराच भाग जलमय होत असल्यामुळें येथील मुख्य पीक जें भात तें थोडेबहुत वाढल्यानंतर पावसावर अवलंबून नसतें. शिवाय नदीच्या पाण्यानें गाळ सांचत जाऊन जमीन जास्त सुपीक होत जात आहे. भाताच्या खालोखाल महत्त्वाचें पीक ताग होय. यांशिवाय कडधान्यें, मोहरी, गळिताचीं धान्यें, तीळ ऊंस वगैरे जिन्नसहि होतात.
व्यापार:- सूत काढणें व धुणें आणि मलमल तयार करणें हे धंदे येथें प्राचीन काळापासून चालत आहेत; कशिद्यांचे काम मुसुलमानी अंमलानंतर होऊं लागलें आहे. सुंदर मलमल व निरनिराळ्या प्रकारचा कशिदा काढलेलीं रेशमी वस्त्रें युरोप व पश्चिम आशियामध्यें मोठ्या प्रमाणावर पाठविलीं जात असत. पण विलायतेंत यंत्रसाहाय्यानें तयार होणार्या मालाशी चढाओढींत न टिकल्यामुळें हा धंदा खालवत चालला.
आब्राबान किंवा शब्रम नांवाच्या सुंदर कापडाचे जुने तुकडे १० चौ यार्डास ३०० ते ५०० रुपयांस अद्यापहि विकले जातात. येथील राजधानी नाहींशीं झाल्यावर या मौल्यवान वस्तूंचा खप बंद झाला, तरी विणकामाचा धंदा अद्याप महत्त्वाचा असून डाका शहरचे कोष्टी आपल्या कामांत अत्यंत कुशल आहेत. १२१ पासून विलायती सूत येऊं लागल्यामुळें येथील सुताचा धंदा बसला. कशिदा व झाप्पण नांवाचें कापड अफगाणिस्तान, इराण, अरबस्तान, तुर्कस्थान वगैरे देशांत रवाना होतें. डाका शहरांत व त्याच्या आसपास होणारें कशिद्यांचे काम फार मौल्यवान असतें. कशिदा काढलेल्या ५ यार्ड लांब व ४५ इंच रुंद मलमलीच्या तुकड्याला ५०० रुपयेपर्यंत किंमत पडते. डाका येथील कोरी वस्त्रें ओपविण्याच्या कृतींतील नैपुण्य कांहीं विशेषच आहे. बंगालच्या इतर भागांपेक्षां जडावाचें काम करणारे लोक येथें पुष्कळ आहेत. कटकच्या खालोखाल डाकाची जर उत्तम असते. जहाजें बांधण्याचा धंदा येथें प्राचीन काळापासून चालू आहे. तागाचे कारखाने वाढले असून, १९०३ सालीं त्यांची संख्या ३३ व गठ्ठे दाबणार्या कारखान्यांची संख्या ७३ होती.
या जिल्ह्याचा आयात व निर्गत व्यापार नारायणगंजवरून होतो. कापड, मीठ, रॉकेल, दारू, जोडे आणि छत्र्या हे जिन्नस कलकत्याहून व चुना आणि दगडी कोळसा आसामांतून येतो. याशिवाय बकरगंज येथून तांदूळ, मसाला, गूळ व सुपार्या येतात; ताग हा येथील मुख्य निर्गत माल होय इतर निर्गत माल फारसा महत्त्वाचा नाहीं. नारायणगंज व डाका यांशिवाय जिल्ह्यांतील सर्व भागांत जलमार्गावर व्यापाराचीं ठाणीं आहत. त्यांपैकी धलेश्वरीच्या कांठीं जागीरहाट, वैद्यबाजार, नरसिंगडी; मेघनाच्या कांठी मुनशीरहाट; पाद्याच्याकाठी लोहगंज हीं मुख्य आहेत. सोनारगांवाजवळ नांगलबंद, धाम्रई व लोहगंज येथें धार्मिक उत्सव होत असतात.
दळणवळण:- (१) आगगाड्या- नारायणगंजपासून मैमनसिंगपर्यंत आगगाडीच्या फांटा गेलेला आहे; हा कलकत्त्याशी आगगाडीनें व गोवलुंदोकडून जलमार्गानें जोडला गेला आहे. (२) रस्ते:-मुख्य रस्ते आहेत ते येणेंप्रमाणें: तुंगीपासून कालीगंज व पुढें नरसिंगडीजवळ मेघनानदीपर्यंत जाणारा रस्ता; श्रीपूर व राजेंद्रपूर हीं गांवें अनुक्रमें गोसिंग व कापासिया यांशीं जोडणारे रस्ते; राजेंद्रपूर ते मिरझापूर व जयदेवपूर ते कद्दपर्यंत जाणारे रस्ते. डाका शहर ते वैद्यबाजारपर्यंत जाणार्या रस्त्याची एक शाखा नारायणगंजपर्यंत जाते (३) जलमार्ग:-मोठ्या नद्यांमध्यें कालव्यांचें जाळें करून जलमार्गानें दळणवळण करण्याची सोय झालेली आहे. मुख्य कालवे पद्या व धलेश्वरी यांच्यामध्यें, हिलसामारी, इच्छामती, ताल्तोल व श्रीनगर हे खोल आहेत; मेघना व जुनी ब्रह्मपुत्रा यांनां जोडणारे अरियालस्वान व मेंडिस्कली. पावसाळ्यांत जलमार्गानें जेथें जातां येत नाही अशीं ठिकाणें फारच थोडी आहेत. मोठ्या नद्यांतून सर्व काळीं जहाजें जाऊं शकतात. नारायणगंज, काचर, सिलहट, गोवलुंदी, चांदपूर, वारिसाल आणि खुल्ना यांच्या दरम्यान रोज बोटी जातात; व डाका, नारायणगंज आणि कलकत्ता (सुंदरबनावरून) यांच्या दरम्यान आठवड्यास माल नेणारी गलबतें चालू असतात. कलकत्त्याशीं बहुतेक व्यापार याच मार्गानें होतो.
राज्यव्यवस्था:- ह्या जिल्ह्याचे चार पोटविभाग असून त्यांचीं मुख्य ठिकाणें डाका शहर, नारायणगंज, दसर (माणिकगंज) व मुनशीगंज येथें आहेत. जिल्ह्याचा म्याजिस्ट्रेट कलेक्टर डाका येथें राहतो. नारायणगंजवर इंडियन सिव्हिलसर्व्हिसचा मनुष्य व इतर विभागांवर डेप्युटि-मॅजिस्ट्रेट कलेक्टर आहेत. डाका व नारायणगंज येथील म्युनिसिपालिट्या खेरीज इतर ठिकाणचा स्थानिक कारभार जिल्हा बोर्डाकडे आहे.
शिक्षण:- १९०१सालीं लो. संख्येपैकीं शें. ६.५(पु. पैकी शे. १२.१ व स्त्रियांपैकीं शे. १) लोकांनां लिहितांवाचतां येत होतें. अलीकडे शिक्षणाचा प्रसार बराच झालेला आहे. १९०३-४ सालीं येथे दोन कॉलेजें, १७१ दुय्यम शाळा व १६३२ प्राथमिक शाळा होत्या; व याच सालीं जिल्ह्यांतील छापखान्यांची संख्या २४ असून त्यांपैकीं ६ मध्यें वर्तमानपत्रें (पैकीं ३ इंग्रजीत) निघत होतीं.
शहर.-बंगालमधील डाका जिल्ह्याचें मुख्य ठिकाण, हें शहर बुर्ही गंगानदीच्या उत्तर तीराला असून, कलकत्त्यापासून आगगाडीनें व जलमार्गानें (राणीगंज व गोवलुंदोकडून) २५४ मैल लांब आहे. डाक झाडांच्या नांवावरून या शहराचें नांव पडलें असावें असा साधारण समज आहे; तर येथें असलेल्या ढाकेश्वरीच्या नांवावरून तें पडलें असावें असें कांहीचें मत आहे. हें शहर बरेंच मोठें असून याची लां. सं. (१९०१) ९०५४२ होती; ब्रिटिश अंमलापूर्वी हें शहर फार भरभराटींत असून येथील मलमल यूरोपांत रवाना होत असे. स. १८०१ त या शहराची लोकसंख्या २००००० होती; परंतु फ्रेंच युद्भांत, या शहराच्या भरभराटीला जबरदस्त धक्का पोहोंचून १८३० त येथील लो. सं. केवळ ६७००० झाली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत झाप्पण, कशिदा, यांचे कारखाने व ताग आणि कातडी यांचा व्यापार यामुळें या शहराला थोडीबहुत बरी स्थिति येऊं लागली आहे.
हें शहर बुर्ही गंगेच्या कांठीं ६ मैलपर्यंत परसलेलें असून उत्तरेकडील बाजूस याचा विस्तार १। मैलपर्यंत गेला आहे. शहरांतून दोलई नदीची शाखा (खाडी?) गेलेली आहे. येथील दोन रस्ते एकमेकांस काटकोनांत छेदितात. एक रस्ता लालबाग राजवाड्यापासून दोलई खाडी (नदी;) पर्यंत नदीशीं समांतर जातो; दुसरा रस्ता सुंदर व रुंद असून नदीपासून उत्तरेस जुन्या लष्करी छावणीकडे गेलेला आहे. बाजारचौक शहराच्या बहुतेक मध्यावर आहे. येथील घरें लहान व गल्ल्या अरुंद आणि वाकड्यातिकड्या आहेत.
या प्रांतांतील मुसुलमानांची राजधानी प्रथम सोनारगांव येथें होती. परंतु आसामाचे अहोम व पोर्तुगीज चांचे लोकांविरुद्भ चाल करून जाण्याकरितां डाका हें सोयीचें ठिकाण आहे म्हणून, इ. स. १६०८ त इस्लामखान या सुभेदारानें या प्रांताची राजधानी राजमहालहून डाका येथें नेली. त्यानंतर या शहराची भरभराट होत गेली व येथें इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज लोकांच्या वखारी होत्या. स. १७०४ त नबाब मुर्शिद कुलीखान यानें येथून राजधानी हलवून मुर्शिदाबाद येथें नेल्यामुळें या शहरचें वैभव लवकरच कमी झालें; व सध्यांत तर या शहरांत पूर्वीचें महत्त्वनिदर्शक गोष्टी फारच थोड्या दृष्टीस पडतात. जहांगरीच्या कारकीर्दीत बांधलेला जुना किल्ला अजिबात नाहींसा झाला आहे; जुन्या इमारतींपैकी कत्रा नांवाच्या बाजारपेठा व लालबागचा राजवाडा अद्याप आहे; पण ह्या इमारती मोकळीस आलेल्या आहेत. १८५७ सालीं येथील शिपाई बंडांत सामील झाले होते. सं. १९०५ त पूर्वबंगाल व आसाम प्रांत निराळा झाला होता तेव्हां डाका ही स्थानिक सरकारची राजधानी होती.
डाकाची म्युनिसिपालिटी १८६४ सालीं स्थापन झाली. तिचें १९०१-०२ पूर्वीच्या १० वर्षांतील सरासरी उत्पन्न १७५००० रु. होतें. आसपासचा प्रदेश सुपीक व मोठ्या नद्यांवजळ असल्यामुळें डाका शहराची वाढ होत आहे; व नारायणगंज आणि मुदनगंज या नदीकांठच्या बंदरांचा व्यापार धरला असतां येथील व्यापार पूर्वबंगाल व आसामांत सर्वांत मोठा आहे. ताग, गळिताची धान्यें, कातडीं येथून रवाना होतात, व कापड, राकेल वगैरे येथें येतात. येथें तांदुळाचाहि बराच मोठा व्यापार चालतो.
येथें शिक्षणाची सोय चांगली आहे. डाका विद्यापीठ, जगन्नाथ विद्यापीठ, वैद्यकीय शाळा, अरबी व फारशी शाळा, मोजणी शाळा, व इंजिनियरिंग कॉलेज ह्या संस्थाशिवाय दुय्यम व प्राथमिक शाळा येथें आहेत. मिट्फोर्ड, हास्पिटल, लेडी डफरिन झनाना हॉस्पिटल व वेड्यांचें हॉस्पिटल ह्या येथील मुख्य वैद्यकीय संस्था होत.
डाकाची मलमल.- सतराव्या शतकांत 'डाका' ही पूर्व बंगालची राजधानी होती. सतराव्या शतकापासूनच नव्हे तर त्या पूर्वीहि मलमलीबद्दल पूर्वबंगाल फार प्रसिद्भ होतें. कौटिल्याचें अर्थशास्त्र या ग्रंथास २००० वर्षे झाली. त्यामध्यें देखील बंगदेशीय सुंदर तलम कापडाचा उल्लेख केलेला आढळतो. तेव्हांपासून ज्या ज्या एतद्देशीय आणि परदेशी ग्रंथकारांनां, इतिहासकारांनां आणि प्रावाशांनां हिंदुस्थानचें वर्णन करण्याचा प्रसंग आला. त्यांनीं पूर्वबंगालच्या मलमलीची स्तुतिच केली आहे. उदाहरणार्थ सुलेमान नांवाच्या नवव्या शतकांतील अरबी प्रवाशानें असें वर्णन केलें आहे कीं, ''पूर्वबंगालचें सुती कापड इतकें सुंदर आणि नाजुक असतें की त्याचा पोषाख केला असतां तो हाताच्या बोटांत घालावयाच्या अंगठीतून जाईल.'' त्यानंतर राफ फिच ह्या नांवाचा इंग्रज प्रवासी (१५८३) आणि अकबरचा सुप्रसिद्भ मंत्री अबुलफजल ह्यांनींहि डाकाच्या मलमलीसंबंधानें गौरवपर उद्भार काढले आहेत.
डाकाच्या मलमलीचा तलमपणा दाखविणारी आणखी एक गोष्ट प्रसिद्भ आहे ती अशी:-'' अबरंगझेबाची लाडकी कन्या झेबुन्निसा ही एकदां डाकाच्या मलमलांचें वस्त्र नेसली असतां त्यांतून तिचें अंग दिसत होतें म्हणून अबरंगझेब तिच्यावर फार रागावला. तेव्हां हें एक वस्त्र नाहीं अशी सात वस्त्रें मी नेसलें आहे असा तिनें त्याला उलट जबाब दिला. '' ही गोष्ट ईस्ट इंडिया कंपनीचा एक नोकर मि. विल्यम बोल्ट्स् ह्याने आपल्या 'कन्सिडरेशन्स ऑन इंडियन अफेअर्स' ह्या नांवाच्या एका ग्रंथांत लिहिली आहे.
अगदी अलीकडील ताजें उदाहरण द्यावयाचें म्हणजे डाकाच्या विश्वविद्यालयाच्या अर्थशास्त्राचे प्रोफेसर श्री. जगदांशचंद्रसिंह एम्. ए. ह्यांचें होय. ह्यांनी त्याच विश्वविद्यालयामध्यें डाकाच्या मलमलीसंबंधीं सांगोपांग विचार करणारें एक विचार परिप्लुत व्याख्यान दिलें आहे, त्यामध्येंहि त्यांनी पन्नास वर्षापूर्वींचा डाकाच्या मलमलीचा एक तुकडा पाहून हाच अभिप्राय व्यक्त केला आहे. त्यांनीं जो तुकडा पाहिला तो एकवार पन्ह्याचा असून दहा हात लांब होता तरी त्याचें वजन अवघे ७॥ तोळे झालें होतें.
वरील विवेचनावरून डाक्याची मलमल किती तलम असे याची स्पष्ट कल्पना होईलच. डाक्याच्या मलमलीचा हा तलमपणा त्या मलमलीचें जें काव्यमय वर्णन उर्दू भाषेंत केलें आहे, त्यावरूनहि व्यक्त होतो. ह्या मलमलीचें 'अबइखन' 'बफ्त हवा' व 'शबनाम' असें विविध कल्पनायुक्त वर्णन करण्यांत येतें. अब-इ-खन म्हणजे 'वाहतें पाणी'; असें म्हणण्याचें कारण ती इतकी तलम असते कीं पाण्याच्या प्रवाहामध्यें ठेवली असतां ती क्चचितच दिसून येते. 'बफ्त हवा' म्हणजे 'विणलेली हवा, ' ही मलमल म्हणजे जणू काय हवाच विणलेली आहे असें भासे, कारण त्या मलमलीला जर हवेंत सोडून दिलें तर ती स्वच्छ पांढर्या ढगाप्रमाणें हवेंत पसरत असे. 'शब नाम' म्हणजे 'संध्याकाळचें दंव'; डाक्याची मलमल जमिनीवर पसरली असतांना तिच्यांत आणि गवतावर पसरलेल्या दवामध्यें फरक करतां येत नाहीं इतकी ती तलम असे.
डाकाच्या मलमलीला लागणारा कापूस हा डाका जिल्ह्यांतच तयार होत असे. ह्या कापसाचा हंगाम वर्षांतून दोनदां एप्रिल-मे आणि सप्टेंबर-आक्टोबर असा येत असे. ह्यांपैकीं एप्रिल-मे महिन्यांत येणारा कापूस सर्वोत्कृष्ट असे. ह्या कापसाचा एक गुण असा असे कीं, तो सरकीला अगदीं चिकटून असे. देवकापसाप्रमाणें हा कापूस सरकीपासून निखालस अलग होत नसे.
ह्या कापसाच्या एकंदर वर्णनावरून असें वाटणें साहजिक आहे कीं, हा कापूस लांब धाग्याचा असावा आणि ह्याचे तंतूहि हिंदुस्थानांत होणार्या दुसर्या कोणत्याहि कापसापेक्षां अधिक सफाईदार आणि रेशमासारखे असावेत; परंतु ही कल्पना चुकीची आहे. तौलानिक दृष्टिनेंच पहावयाचें असल्यास हल्लीचा अमेरिकन कापूस हाच त्यांच्यापेक्षां अधिक लांब धाग्याचा असून अधिक सफाईदारहि आहे. डाकाच्या मलमलीचा कापूस हा आंखूड धाग्याचा आहे आणि म्हणूनच त्याचें हातानें अत्युत्कृष्ट सूत निंघू शकतें. त्याचें यंत्रावर इतकें सफाईदार सूत निघणें शक्य नाहीं. १८११ सालीं ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनीं त्या वेळच्या कातणार्या स्त्रियांनां लांब धाग्याचा अमेरिकन कापूस कांतायला दिला असतांना त्यांतून तितका बरीक धागा निघेना अशी त्या स्त्रियांनीं त्या अमेरिकन कापसाविरुध्द तक्रार केली होती. डाकाच्या कापसाचा दुसरा विशिष्ट गुण म्हटला म्हणजे त्या कापसाचा धागा धुतल्यानंतर फुगत नसे हा त्या पाण्याचा विशिष्ट गुण होता असें म्हणतात.
ह्या वर्णनावरून उघडच होत आहे कीं, डाकाच्या मलमलीचा तलमपणा हा त्या कापसावर आणि त्यापेक्षांहि अधिक तो कापूस कांतण्याच्या आणि विणण्याच्या विशिष्ट प्रकारच्या कौशल्यावर अवलंबून होता. कपाशींतून सरकी काढण्यापासून तों त्याचें कापड विणीपर्यंतच्या सर्व क्रिया ह्यां कापसाच्या विशिष्ट पध्दतीनेंच होत. सामान्य कापूस वठण्याचा जो चरखा असतो तो ह्याला उपयोगी पडत नसे. एका सपाट लांकडी फळीवर एक लोखंडी रूळ बसवून तो गोल फिरवितां येईल अशी व्यवस्था केलेली असते. साध्या वठण्याच्या चरख्यापेक्षां ह्यांत त्या पध्दतीनें तंतूंनां धक्का कमी बसतो. हा कापूस पिंजण्याकरितां एक लहानशी मांजराच्या तातेची धनुकली असते. अतिशय बारीक धागा काढावयाचा असेल तर 'बोल' नांवाच्या एका प्रकारच्या मृत माशाला मध्येंच फाडून त्याच्या दातांनीं तो विंचरण्याचा प्रघात होता. नंतर हा कापूस 'चीतल' नांवाच्या माशच्या सुक्या कातड्याच्या मऊ पृष्टभागावर ठेवण्यांत येऊन त्याचे पिळू करण्यांत येत असत. शंभराच्या आंतल्या नंबरचें सूत हें साध्या चरख्यावर काढीत असत. परंतु त्यापेक्षां वरच्या नंबरचें सूत काढण्यास चातीचाच उपयोग करण्यांत येत असे. ही चाती म्हणजे एक मजबूज जाड सुई असून तिची लांबी दहापासून चौदा इंच असे. ही चाती फिरवितांना किंचित् वजनदार लागावी म्हणून त्या चातीच्या खालीं एक मातीची गोळी लावण्यांत येत असे. चातीवर कांतण्याची उत्तम वेळ म्हटली म्हणजे साधारणत: ८२ डिग्रीचें उष्णमान असून हवा किंचित् दमट पाहिजे. कांतणार्या स्त्रिया साधारणत: सकाळीं पहाटेस सुरवात करून ९-१० वाजेपर्यंत कांतीत असत आणि दुपारी ३-४ला सुरुवात करून सूर्यास्ताला बंद करीत असत. उत्कृष्ट प्रतीचें सूत हें सूर्योदयापूर्वीच कांतण्यांत येत असे. जेव्हां हवा अतिशय कोरडी असेल तेव्हां सूत कातण्यांत येत असे. डाक्याचा कापसाचा तंतु अधिक लवचीक असून सूत काढतानाच त्याला साहजिकपणें अधिक पीळ बसत असे. उत्कृष्ठ प्रकारचें सूत काढण्याचें काम बहुतकरून स्त्रियाच करीत असत. त्यांतहि ज्या स्त्रियांमध्यें हा धंदा वंशपरंपरा चालत आला होता त्या स्त्रिया ह्या कलेंत विशेष तरबेज होत्या. हें सूत काढणार्या स्त्रियांची दृष्टि फार शाबूत असावी लागते म्हणून साधारणत: मध्यम वयाच्याच स्त्रिया हें सूत कांतींत असत. हातसूत हें ५०० च्या वरच्या नंबरचेंहि निघत होतें (हल्लीं देखील ९२० नंबरचें सूत निघालेलें आपण प्रदर्शनांत पाहतो). पण हें सूत विणता येत नाही इतकें तें बारीक असतें. हातचें सूत धुतल्यानंतर अधिक मजबूत आणि सफाईदार होतें. डाकाच्या मलमलीचा मोठा गुण म्हणजे ती पारदर्शक होती. मलमलीस लागणारं उत्कृष्ट प्रतीचें सूत काढावयाचें असल्यास उत्तम कांतणारीनें जर आपला सकाळचा सबंध वेळ दिला तर तें फक्त १/२ तोळाच भरे. हें काम करण्याला लागणारी चिकाटी आणि कौशल्य हींच डाकाच्या सुताच्या उत्कृष्टपणाचीं कारणें होत. हें कौशल्य आणि त्यांची तीं प्राचीन अवजारें पाहिली म्हणजे त्यांचें कौतुक केल्याविना कोणाच्यानें राहवणार नाहीं. ज्या कच्च्या मालापासून ह्या स्त्रिया सूत काढीत असत त्या प्रकारच्या मालापासून यंत्राच्या सहाय्यानें मिळालेला धागा आज देखील त्या सुताची बरोबरी करूं शकत नाहीं इतकें तें सूत सफाईदार असे.
ही मलमल विणण्याचे जे माग असत ते माग आणि आज प्रचारांत असलेले माग ह्यांमध्यें कांहीं विशेष फरक नसे फक्त त्यावेळीं ते विणकर जो धोटा उपयोगांत आणीत तो पुष्कळ हलका असे. ह्यासंबंधीं एकच गोष्ट विशेष लक्षांत ठेवण्यासारखी आहे आणि ती म्हणजे उत्कृष्ट प्रतीची मलमल विणतांना हवेमध्ये ओलावा लागत असे जेव्हां पुष्कळ पाऊस पडत असे आणि हवा फार सर्द असे तेव्हां मागाखालीं मंद उष्णता देणारी शेगडी ठेवीत. जेव्हां फार उष्णता असेल तेव्हां ताण्याच्या खालीं उथळ पाण्याच्या पराती ठेवाव्या लागत असत. डाकाच्या मलमलीचे अठरा प्रकार होते. विशिष्ट प्रकारची मलमल काढण्याचें काम विशिष्ट माणसाकडेच असे त्यामुळें कौशल्य वंशपरंपरा दिसून येत असे. हें कापड विणण्यामध्यें इतकें कौशल्य आणि इतकी सहिष्णुता लागे कीं, उत्कृष्ट प्रतीने १ वार पन्ह्याचें १० वार कापड विणण्यास (ज्याचें वनज अवघें ४॥ औंस भरे) पांच महिन्यांपेक्षां काल कमी लागत नसे, आणि म्हणून ह्याची किंमतहि तितकी भारी असे. एक वार औरस चौरस कापड काढण्यास त्यावेळेला दहा रुपये लागत असत. परंतु त्यावेळचे दहा रुपये म्हणजे आतांचे तीस रुपये इतका फरक पडला आहे.
ज्या वेळेला विणण्याच्या कलेचा हिंदुस्थानांत परमोच्च विकास झाला होता, त्या वेळेला मौल्यवान कपडे धुण्याची कलाहि पूर्णत्त्वाला पोहोचलीं होती. त्यावेळीं यूरोप ह्या कलेमध्यें फार मागासलेलें होतें. ही कला पूर्णत्त्वास जाण्यास केवळ डाकाच्या आसपासच्या पाण्याचाच गुण कारणीभूत होता. असें नव्हे तर त्या वेळच्या साबूचे गुणधर्म आणि कापड विणण्याचें कौशल्य हींहि तितक्याच श्रेष्ठ दर्जाचीं होतीं.
थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे डाकाचें सूत आणि डाकाची मलमल इतकी उत्कृष्ट होती कीं इंग्लंडमध्येंहि आज यंत्राच्या साहाय्यानें तिच्या तोडीचें सूत आणि कापड निघू शकत नाहीं. अशा पूर्णत्वाला गेलेली कला आज कां नामशेष झाली याचें मुख्य कारण हेंच कीं त्या कलेला आज राजाश्रय नाहीं. डाकाच्या मलमलीसारखें उत्कृष्ट कापड पूर्वी मोठमोठे राजे महाराजे, आणि सरदार लोकच वापरीत असत. त्यांनीं विशिष्ट प्रकारचा नमुना द्यावयाचा आणि त्याप्रमाणें विणकर्यानीं तो विणून द्यावयाचा अशी पूर्वीची पध्दति असल्यामुळें दोघांचीहि सोय होत होती. राजाश्रयाचा अभाव हें तर मुख्य कारण खरेंच परंतु त्याशिवायहि अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांतील हिंदुस्थानच्या मालावर इंग्लंडनें लादलेली जकात, ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनीं हिंदी विणकर्यावर केलेला जुलूम हींहि कारणें होतीं हें विसरतां कामा नये.