विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

डलास - अमेरिकेतील संयुक्त संस्थानांपैकी टेक्सस संस्थानांमधील डलास कौटीचें मुख्य ठिकाण. हें ट्रिनिटी नदीच्या पूर्वतीरावर आहे. लो. सं. (१९१७) १२९७३८. याचें क्षेत्रफळ सुमारें १५ चौरस मैल आहे. हें सुमारें ८ रेलवेंचें केंद्रस्थान आहे. नदीचें पात्र खोल करून जाहजें जाण्याची व्यवस्था केली आहे. सार्वजनिक इमारतींत कार्नेजी वाचनालय, कोर्ट, सिटीहॉल, सेंट मॅथ्यूचें देवालय वगैरे इमारती येतात. येथें एक वैद्यकशाळा आहे. येथून आजूबाजूच्या ठिकाणचा गहूं, कापूस व फळफळावळ ही पाठविण्यांत येतात. येथील राज्यकारभार मेयर व चार कमिशनर मिळून पाहतात.