विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
ट्रटिश्के, हेंरिक व्हॉन (१८३४-१८९६) – हा जर्मन इतिहासकार व राजकीय लेखक ड्रेस्टेन येथे १५ सप्टेंबर १८३४ रोजी जन्मला. ह्याच्या बापाला सॅक्सनच्या सैन्यात मोठा हुद्दा होता. पुढे तो ड्रेस्डेनचा गव्हर्नर झाला. हेंरीक हा बहिरा असल्यामुळें त्याला सार्वजनिक कामांत लक्ष घालता आलें नाही. लिपझिग व बॉन येथील अभ्यासक्रम पुरा झाल्यानंतर तो लिप्झिग येथें इतिहास व राजनीति यांवर व्याख्यानें देत असें. विद्यार्थ्यांवर त्याची विलक्षण छाप असे. तो त्यावेळी उदारमतवादी असून, सर्व लहान मोठी संस्थानें एक होऊन, जर्मनीची घटना व्हावी, अशी त्याची उत्कट इच्छा होती. १८६६ सालच्या युद्धारंभी त्याची प्रशियाबद्दलची कळकळ इतकी बलवत्तर झाली कीं तो बर्लिनला जाऊन प्रशियाच्या प्रजेत स्वत:ची गणना करूं लागला. हॅनोव्हर व सॅक्सनी या डची खालसा व्हाव्या यासंबंधी एक कडक लेख त्यानें लिहिला, त्यामुळें बापलेकांचे बिनसलें. १८७४ साली तो बर्लिन येथे प्रोफेसर झाला. तरुण पिढीच्या मन:संस्कृतीचें बरेचसें श्रेय त्याच्याकडे आहे. सोशिआलिस्ट, पोललोक व रोमन कॅथॉलिक लोक, यांचा पाडाव करण्यास सरकारास त्यानें पुष्टि दिली. तो ब्रिटिश लोकांचा कट्टा दुष्मन होता व १९ व्या शतकाच्या अखेर ब्रिटिशांच्या विरुद्ध उत्पन्न झालेल्या वातावरणास हाच कारणीभूत आहे. अखेरीस तो नेमस्त रुढमतवादी झाला. २८ एप्रिल १८९६ रोजी तो बर्लिन येथें मरण पावला.
इतिहासकार या नात्याने त्याची योग्यता अत्यंत मोठी आहे, त्याचा इतिहासाचा अभ्यास मुत्सद्दी दृष्टीचा आहे. प्रशियाच्या पलीकडे त्याचें लक्ष बहुतेक जात नसे. ‘१९ व्या शतकांतील जर्मनीचा इतिहास’ हा त्याचा मुख्य ग्रंथ होय. हें पुस्तक नीट क्रमवार लाविले नाही. परंतु यांत त्याची भाषाशैली, व घडलेल्या गोष्टी लिहिण्याची पद्धत ही चांगली दिसून येतात. याशिवाय त्याचे आणखीहि बरेच लेख आहेत.