विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
टोपल्या - झाडांच्या डाहाळ्या, बांबू, वेत वगैरे पदार्थ, तसेंच तांबें, पितळ किंवा लोखंडाच्या तारा या पदार्थांच्या गुंफून तयार केलेल्या निरनिराळ्या आकाराच्या व विविध कामीं लागणार्या पात्रांस टोपल्या म्हणतात. त्यांचा उपयोग संसारोपयोगी जिन्नस सांठविण्याकरितां किंवा जिन्नस एका जागेवरून दुसरीकडे नेण्याकरितां केला जातो. जगांतील अगदी जंगली व अशिक्षित अशा जातीपासून तों सुधारणेच्या शिखरास पोंचलेल्या लोकांपर्यंत सर्वांस टोपल्यांची जरूरी लागते. यामुळें जगांतील अतिप्राचीन कलांपैकी ही एक कला आहे. कारण या कलेपासूनच कपडे विणण्याची कल्पना मनुष्यास सुचली असावी असें कांहीं लोकांचें म्हणणें आहे. चिनी मातीची भांडी करण्याकरितां लागणारे सांचे सुध्दां टोपल्यांप्रमाणें झाडांच्या डाहाळ्यांचेच तयार करीत असत असा पुरावा आढळतो. उत्तर अमेरिकेंतील मूळचें इंडियन लोक एक जातीच्या मजबूत व पाणीहि गळून जाणार नाहीं अशा तर्हेच्या टोपल्या तयार करतात; व त्यांवर रंगी बेरंगी नाना प्रकारचें नक्षीकाम करतात; रेडइंडियन लोकांपैकीं पिढीजात श्रीमंत घराण्यांतील मंडळींजवळून अमेरिकेंतील कांहीं लक्षाधीश लोकांनीं जुने टोपल्यांचे नमुने नगापाटीमागें ३०० पौंडांपर्यंत किंमत देऊन विकत घेतले आहेत. लाखों रुपये किंमतीचा हा माल अमेरिकेंत दरवर्षी खपला जातो. ग्रीसमध्यें पुरातनकाळीं झाडांच्या डाहाळ्यांच्या ढाली करून त्या कातडयानें मढवीत असत; व तीच तर्हा अद्याप कांहीं जंगली जातींत प्रचलीत आहे. घराच्या आंतील भिंती किंवा कूड अद्याप कित्येक ठिकाणीं झाडांच्या फांद्या विणून तयार करतात. टोपल्या विणण्यास हस्तकौशल्याशिवाय दुसरी यंत्रसामुग्री लागत नाहीं. थोडी हत्यारें पुरी हातात. तीक्ष्ण धारेच्या कांहीं सुर्या, कोयते वगैरे साधें सामान लागतें.
टोपल्या वगैरेंचें विणकाम करण्यास लागणारे जिन्नस.- (१) बाभळीच्या डहाळ्यांपासून उपयोगासाठीं लागणार्या टोपल्या होतात. (२) बांबूच्या पट्टया यांपासून सर्व कामास लागणार्या टोपल्या तयार होतात. हिमालयाच्या पायथ्याशीं पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, बांबूंच्या टोपल्या करण्याचा मुख्य धंदा आहे. आसाम आणि ब्रह्मदेशांतील शेतकर्याच्या छत्रीसारख्या टोप्या व तसेंच शान लोकांच्या अतिशय कसबानें तयार केलेल्या टोप्या बांबूच्या असतात. बंगाल प्रांतांत मासे धरण्याचीं जाळीं आणि पक्ष्यांचे पिंजरे बांबूचेच करितात. (३) ताडाच्या झावळ्या, (४) तुरीचे फोंक (५) वेताच्या फार मजबूत टोपल्या बहुतेक बंगालप्रांतांत तयार होतात. पुणें, रत्नागिरी, कर्नाटक, म्हैसुरांतील शिमोगा आणि कूर्गमध्यें निरनिराळ्या ठिकाणीं वेताचें सुबक काम होतें. (६) पिशोर, किल्लर किंवा स्पिलेच झुडुप:- हें वायव्यहिमालयांत होतें. हें झुडुप फार उपयोगी असतें. याच्या फांद्या गठ्ठे बांधणें, मजबूत टोपल्या करणें आणि झुले करण्यासाठीं उपयोगी पडतात. (७) शिंदीचे झाड:- या झाडाच्या पानांच्या पट्टया तयार करून मद्रासमध्यें चुट्टयांच्या पेटयांवर लावतात. या पानांनां भुत्र किंवा खुशब म्हणतात व त्यांच्या टोपल्या, पंखें, दोर्या वगैरे जिनसा करितात. देठांच्या उत्तम छडया, करंडया व पाट्या होतात. पंजाब, रोहटक, कर्नूल आणि दिल्ली याठिकाणीं पानांचे पंखे बनवितात. मद्रास आणि मुंबई इलाख्यांत, पंजाबांत, तसेंच सिंध, बलुचिस्तान व अफगाणिस्तान याठिकाणीं पानांच्या मधमाशांच्या पोळ्याच्या आकाराच्या टोपल्या करतात. बंगालच्या पूर्वभागांत पानांच्या चट्या विणतात. (८) मुंजगवत:- याच्या अनेक जाती आहेत. याची बेद किंवा बेत हीं सामान्य नांवें आहेत. याशिवाय याचीं दुसरीं नांवें म्हणजे बिन, बीस, वैश, भेंस, वगैरे होत. वजनदार जिनसा वाहून नेण्यासाठीं याच्या एक विशिष्ट प्रकारच्या टोपल्या करितात. तुरुंगात व अनाथगृहांत याच्या टोपल्या व खुर्च्या बनवितात. याच्या फोकांच्या कुडाच्या भिंती, बांध व कुपणें करितात. फोंक सोलून, सालीचा दोर्याप्रमाणें उपयोग करितात व सोललेले फोंक जाळून त्याचा कोळसा करितात. या कोळशांत कांहीं विशेष औषधी गुण असतो असा समज आहे. (९) कपाशीच्या पराटीच्याहि टोपल्या कूड वगैरे करतात.