विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
टुलुझ - फ्रान्सच्या नैऋत्य भागांतील हॉटगरोन विभागाचें मुख्य शहर. लोकसंख्या (१९११) १४९५७६. टुलुझ गरोन नक्षीच्या उजव्या कांठावर वसलें असून ईशान्येकडे वाहणार्या नदीचा ओघ येथूनच वायव्येकडे वळतो. पूर्वेस व उत्तरेस मिडीचा कालवा असून एकेबाजूनें येणार्या गरोन कालव्यांत मिळतो. शहराच्या मध्य भागांतील कॅपिटोल भागांत शहरांतील सर्व भागांचे रस्ते येऊन मिळतात. येथून जवळच रहदारीचें दोन रुंद रस्ते परस्परास मिळतात.
टुलुझच्या इमारतींत सर्वांत चिताकर्षक असें सेंट सेरनिन किंवा सॅटर्निनचें ख्रिस्ती देवालय होय. टुलुझमध्यें प्रथम ह्या सॅटर्निननें ख्रिस्तीधर्माचा उपदेश केला असें म्हणतात. येथें आर्चबिशपचें राहण्याचें ठिकाण असून दिवाणी कचेरी, अपील कचेरी व प्रीफ्रेक्टचें राहण्याचें स्थान आहे. येथें उच्च शिक्षणाच्या बहुतेक सर्व शाखा आहेत.
टुलुझ हें व्यापारी व उद्योगाचें लाँग्युडॉकमधील केंद्रस्थान असून येथें घोडे, दारू, धान्य, फुलें, कातडी, तेल व शेतीच्या उत्पन्नाचा बाजार भरतो. येथें तंबाखूचें कारखाने, धान्य दळण्याच्या चक्क्या, व लांकूड कापण्याचे कारखाने, इंजिनियरचें कारखाने, शेतकीस लागणारी अवजांरे तयार करण्याचे कारखानें, खत तयार करणें वगैरे उद्योग चालतात.
रोमन अमलाखालीं गॉल देश असतांना टुलुझला फारसें महत्त्व नव्हतें. एक अर्धवर्तुळाकृती नाटकगृह होतें. परंतु जुनें टुलुझ हें नव्या टुलुझपासून ५-६ मैल पूर्वेस असून मातीच्या भिंतीचा मोडकळीस आलेला कांहीं भाग अद्याप सांपडतो. ह्याच ठिकाणीं इ. स पूर्वीच्या २ र्या शतकाच्या नंतरचीं नाणीं सापडलीं आहेत. औझोनिअस आपल्या पुस्तकांत ह्या ठिकाणच्या मोठ्या लोकसंख्येचा उल्लेख करतो. हें ४१९ मध्यें व्हिसिगॉथच्या राज्याचें मुख्य शहर झालें. ५०७ सालीं क्लाविसच्या हातीं हें शहर पडलें तेव्हां तेथील खजीना तो घेऊन गेला. ग्रेगरीच्या काळांत ह्या शहराचा बराच उल्लेख होतो. टुलुझच्या खर्या इतिहासास ७८० किंवा ७८१ सालीं प्रारंभ होतो. ह्यावेळीं शार्लमेन ह्यानें आपल्या लहान मुलास आक्विटेनचा राजा नेमून टुलुझ ही राजधानी केली. राजाच्या लहापनणी त्याच शिक्षक चारसन ह्यानें ड्यूक किंवा काउंट ही पदवी घेऊन राज्याचें काम आपल्या हातीं घेतलें, पण ७९१ सालीं वर्म्सच्या सभेनें त्याच्या ठिकाणीं विल्यम कर्टनेझ या दक्षिण फ्रान्सच्या प्रसिध्द वीराची नेमणूक केली. हा स. ८१२त निवर्तला. ८४४ सालीं चार्ल्स दि बोल्डनें वेढा घातला. पुढें ४ वर्षांनीं नार्मन लोकांकडे हें शहर आलें. ८५२ सालीं पहिला रेमंड येथील काउंट झाला. ह्याच्या वंशांतील पुरुषच पुढें येथील काउंट झाले. १२७१ सालीं जोन व आल्फॉन्सो यांच्या मरणानंतर येथील अधिकार राजाकडे आला. १४४३ सालीं येथें एक प्रतिनिधिसभा स्थापण्यांत आली. या सभेनें १६१९ सालीं व्हॉनिनि नांवाच्या तत्त्ववेत्तयास जाळलें. येथें १२२९ सालीं एक विश्वविद्यालय स्थापन झालें. येथें प्रसिध्द 'फ्लोरल गेम्स' नांवाची कवींची सभा १३२३-२४ सालीं स्थापण्यांत आली.