विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
टिल्सिट - पूर्व प्रशिया या प्रशियन प्रांतांतील, मेमेल नदीच्या डाव्या किनार्यावर वसलेलें जर्मनीचें एक शहर. लोकसंख्या (१९०५) ३७१४८. हें शहर आगगाडीनें कोनिंग्जबर्गच्या ईशान्येस ७२ मैलांवर आहे. येथें पोष्टओंफिस, नगरभवन, दवाखाना, न्यायकचेर्या इत्यादि कित्येक सुंदर आधुनिक इमारती आहेत. या ठिकाणी यंत्रें, रासायनिक द्रव्यें, कमावलेलीं कांतडीं, जोडे, कांचेचें सामान वगैरे वस्तू तयार होतात, व लोखंडाच्या ओतीव कामाचें कारखाने, कलालाच्या भट्टया व वाफेनें चालणार्या पिठाच्या आणि लांकडाचे तक्ते पाडण्याच्या गिरण्या आहेत. इमारती लांकूड, धान्य, सण व कोळसा हे येथील व्यापाराचे जिन्नस आहेत. या शहराचा पूर्वी रशियाशीं मोठा व्यापार चालत असे. पण कोनिंग्जबर्ग व कोव्हनो हीं दोन शहरें आगगाडीनें जोडलीं गेल्यापासून तो मंदावला आहे. टिल्तिटचें मेमेल, कोव्हनो व कोनिंग्जबर्ग या शहरांशीं नदींतून आगबोटीनें दळणवळण आहे. १८०७ त येथे प्रशियानें नेपोलियनशीं जो नामुष्कीचा तह केला त्यामुळें हें प्रसिध्दीस आलें आहे.