विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
टिफ्लिस, प्रांत.- रशियन ट्रान्सकाकेशियांतील संस्थान. ह्या संस्थानांत खनिज द्रव्यें फार आहेत. परंतु फक्त तांबें काढलें जातें. पेट्रोलियम व दुसरे खनिज तेलांचे झरे येथें पुष्कळ आहेत या संस्थानांतून कुरा व तिला मिळणार्या नद्या वाहतात. या संस्थानचें क्षेत्रफळ १५७७६ चौरस मैल आहे. १९१५ सालीं लोकसंख्या १३९४८०० होती. यांत नऊ जिल्हे आहेत. शेती हा येथील मुख्य धंदा आहे. येथें उत्तम रेशीम तयार करितात. १/४ क्षेत्रावर जंगल आहे. येथील रहिवाशांत कातड्याचा, धातूचा व लोंकरीचा माल तयार करण्यात बरीच कर्तबगारी दिसते.
शहर.-रशियन काकेशिया प्रांतांतील टिफ्लिस हें एक शहर असून याच नांवाच्या प्रांताची ही राजधानी आहे. उंच पर्वताच्या पायथ्याशीं कुरा नदीच्या दोन्ही कांठांवर हें वसलेलें आहे. येथून रेल्वेरस्ता निघून तो यूरोपियन रशियांत गेलेला आहे. शहरांत उत्तम ख्रिस्ती चर्चे व मशीदी, बागा, रस्ते व इमारती आहेत. येथें बंदुका व तरवारी चांगल्या होतात. सुती व रेशमी कापडाचे कारखाने आहेत. लोकसंख्या (१९१३) ३२७८०० आहे. इ. सन. ३८० च्या सुमारास जॉर्जिअन लोकांनीं हें शहर वसविलें. ५७० सालीं इराणनें हें घेतलें पण त्याच्या ताब्यांत ते फार वर्षे टिकलें नाहीं. ग्रीक, खजार, अरब या लोकांनीं हें शहर अनेक वेळां लुटलें. तैमुरलंगानें या शहरावर स्वारी केली होती. या स्वारीनंतर तें इराणच्या हातीं मधून मधून जाई. स. १७९५त इराणच्या शहानें हें शहर लुटलें. त्यावेळीं रशियानें आपलें सैन्य शहराच्या रक्षणाकरितां पाठविलें. स. १७९९ पासून तें रशियाच्या ताब्यांत आहे.