प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

टिप्पू सुलतान (१७४९-१७९९) - म्हैसूरचा राजा. हा म्हैसूरच्या हैदरअल्लीचा वडील मुलगा. हा सन १७४९ त जन्मला आणि बापाच्या पश्चात सन १७८२ च्या डिसेंबरांत गादीवर बसला. गादीवर येण्यापूर्वींच तो लढायांत भाग घेत असे. मराठ्यांनीं हैदरवर केलेल्या सन १७७१ च्या मोहिमेंत यानें त्यांनां तोंड दिलें होतें. पुढें हैदरानें याला मराठ्यांनीं घेतलेला मुलूख परत मिळविण्यासाठीं पाठविलें होतें. (१७७३); त्याप्रमाणें त्यानें गुरमकोंडा व त्याच्या आसपासचा थोडासा प्रांत परत मिळविला (१७७४). स. १७८० त हैदरावर इंग्रज चालून आले, त्यावेळीं त्यांचा मुख्य सेनापति मनरो हा असून, त्याच्या हाताखालीं कर्नल बेली होता. बेली हा गंतूरहून मनरोस मिळण्यासाठीं सातहजार फौजेनिशीं जात असतां, त्यांची गांठ न पडूं देतां, कांची येथें टिप्पूनें त्याच्यावर एकाएकीं हल्ला करून बेलीचा पराभव केला व त्याला त्याच्या सार्‍या फौजेसह बंदिवान केलें (१० सप्टें०), तेव्हां मनरो हा मद्रासेस पळून गेला. इतक्यांत कर्नल ब्रेथवेट हा दुसरा इंग्रज सेनापति टिप्पूवर चालून आला; पण तंजावर येथें त्याचाहि पराभव करून, टिप्पूनें त्याला त्याच्या सैन्यासह कैद केलें. हैदर वारल्यावर (१७८२ डिसें०) टिप्पू गादीवर आला. त्याचें व फ्रेंचांचें सूत असल्यानें जेव्हां अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धांत फ्रेंच लोकांनीं अमेरिकेस मदत केली, तेव्हां टिप्पूनेंहि फ्रेंचांनां पाठिंबा दिला होता व फ्रेंचहि त्यास मदत करीत. इंग्रजांचा सेनापति आयरकूट हा टिपूवर आला असतां फ्रेंच सरदार बुसी हा त्याच्या मदतीस आला होता. पण यूरोपांत इंग्रज फ्रेंचांचा तह झाल्यानें बुसी परत गेला. सालबाईचा तह आपणांस मान्य आहे असें टिप्पू वरवर म्हणे, परंतु त्या तहांत हैदरानें इंग्रजांपासून घेतलेला मुलूख परत करावा ही जी अट होती ती मात्र तो मान्य करीना. त्यामुळें इंग्रजांनीं जलमार्गानें येऊन टिप्पूचा बेदनूर प्रांत घेतला. तेव्हां त्यानें त्यांच्यावर एकदम हल्ला करून त्यांचा पराभव करून व मंगळूर शहरास नऊ महिने वेढा घालून तें काबीज केलें व इंग्रज अधिकारी कैदेंत टाकिले. अखेर इंग्रजांनी तह करण्याकरितां आपले वकील टिप्पूकडे पाठविलें. त्यानें प्रथम वकिलांचा उपमर्द करून मग (१९ मार्च १७८४) त्यांच्याशीं मंगलोर येथें तह केला. या तहानें परस्परांनीं परस्परांचा घेतलेला प्रांत परस्परांस परत देण्याचें ठरलें.

या वेळीं (१७८४ जून) नाना फडणविसानें यादगीर येथें निजामअल्लीची भेट घेऊन, पेशवे व मोंगल या दोघांनीं मिळून टिप्पूवर स्वारी करून त्यानें घेतलेला आपला सर्व मुलूख परत मिळवावा असें ठरविलें. परंतु टिप्पूनें तिकडे एकदम नरगुंदकर व कित्तरकर देसाई यांवर सैन्य पाठविलें, तेव्हां पेशवे व मोंगल यांची उभयतांचीहि तयारी नसल्याकारणानें त्यांनीं त्यावेळीं त्याच्याशीं समेट करण्याचा प्रयत्‍न केला. व टिप्पूहि वरकरणीं या तडजोडीस कबूल झाला.

मलप्रभेच्या दक्षिणेस १२ मैलांवर नरगुंद नांवाचा एक किल्ला असून तेथील देसाई पूर्वीं पेशव्यांचा अंकित होता; परंतु कृष्णेच्या दक्षिणेकडील मुलूख हैदरास मिळाला तेव्हां (१७८८) नरगुंदकर हा त्याच्या छत्राखालीं गेला. या देसायापासून पेशव्यांनां पूर्वीं जितकी खंडणी मिळे तेवढीच हैदरहि त्याच्यापासून घेई. परंतु पुढें टिप्पूनें ती रक्कम वाढविली. देसायानें ती नाकारून पेशव्यांकडे मदत मागितली तेव्हां प्रथम नानाफडणविसानें टिप्पूस सामोपचारानें खंडणी न वाढविण्याबद्दल लिहिलें. परंतु टिप्पूनें तिकडे दुर्लक्ष करून उलट देसायाची खंडणी बळजबरीनें वसूल करण्याकरितां आपलें कांहीं सैन्य रवाना केलें. सैन्यानें नरगुंदला वेढा दिला (१७८५ मार्च) तेव्हां गणेशपंत बेहरे व परशुरामभाऊ पटर्वधन हे नरगुंदकरांच्या कुमकीस आले. इकडे टिप्पूचा वकील अद्यापीहि पुणें दरबारींच होता. तिकडे लढाई सुरू झाल्यामुळें नानांनीं तुकोजी होळकरास भाऊच्या मदतीस पाठविलें. तेव्हा टिप्पूनें केलेल्या भांडणाबद्दल दिलगिरी प्रदर्शित करून समेटाची इच्छा दर्शविली व नरगुंद संस्थानावरील आपलें प्रभुत्व पेशवे मान्य करीत असल्यास, आपली मागील दोन वर्षांची राहिलेली खंडणीहि देण्यास कबूल झाला. त्यानंतर नरगुंदकर यांनां टिप्पूकडून कांहीं अपाय होणार नाहीं अशी खात्री करून घेऊन मराठे परतले. परंतु टिप्पूनें मराठयांनां चांगलेंच फसविलें. पावसाळा सुरू झाल्यानें उतार नव्हता. त्यामुळें यावेळीं मराठ्यांनां नरगुंदकरांच्या मदतीस येणें शक्य नव्हतें, ही संधि साधून टिप्पूनें पुन्हां नरगुंदावर चढाई केली. तेव्हां नाइलाजानें देसायानें किल्ला त्याच्या स्वाधीन केला. त्यावेळीं टिप्पूनें त्यास दिलेलें वचन मोडून देसायाला त्याच्या सर्व मंडळीसह कैद केलें व त्याच्या मुलीस आपल्या जनान्यांत ठेवून बाकीच्या मंडळीस काबुल दुर्गच्या किल्ल्यांत कैदेंत टाकिलें. यानंतर कित्तारकर देसायाची देखील हीच स्थिति करून पावसाळा संपण्यापूर्वींच टिप्पूनें या दोन्ही किल्ल्यांचा चांगला बंदोबस्त केला (सन १७८५). याच वेळीं त्यानें जबरदस्तीनें अनेक हिंदू लोकांची सुंता करवून त्यांनां मुसुलमान केलें. त्यावेळीं ही विटंबना टाळण्याकरीतां पुष्कळ (दोन हजार) हिंदूंनीं आत्महत्या केली.

या सालचा पावसाळा बराच लांबल्यानें डिसेंबरच्या पहिल्या तारखेपर्यंत मराठे पुण्यांतून बाहेर पडले नाहींत या वेळीं त्यांच्या सैन्याचें अधिपत्य हरिपंत फडके याजकडे होतें. तो पुण्याहून निघून मुघोजी भोंसल्याला मिळण्यासाठीं पंढरपुरास गेला. येथेंच पुण्याहून नानाफडणवीसहि निजामाशीं खलबत करण्याकरितां आला (१७८६ जानेवारी). यानंतर हें सर्व सैन्य यादगीर येथें निजामाच्या लष्करास येऊन मिळालें (मार्च). येथें असें ठरलें कीं या संयुक्त सैन्यानें टिप्पूचा सर्व मुलूख काबीज केल्यावर त्याचे सहा भाग करून त्यांपैकीं दोन दोन भाग प्रत्येकीं पेशवे व मोंगल यांस व एक एक भाग होळकर व शिंदे यांस, याप्रमाणें वांटून द्यावेत.

त्यानंतर प्रथम कृष्णा व तुंगभद्रा या नद्यांमधील मराठ्यांचा मुलूख सोडवावा असें ठरवून, टिप्पूचा बर्‍हाणउद्दीन नांवाचा सरदार कित्तरजवळ होता त्यास हांकून लावण्याकरितां तुकोजी होळकर व गणेशपंत बेहरे यांनां पन्नास हजार फौजेसह तिकडे रवाना करण्यांत आलें व बाकीचें सर्व सैन्य बदामी काबीज करण्याकरितां निघालें. दोस्तांचें लष्कर बदामी नजीक आलें असतां त्यांनां टिप्पू सर्व सैन्यासह आपल्याकडे चालून येत आहे असें कळलें. तेव्हां असें ठरलें कीं, तूर्त बदामीस वेढा न देतां तिच्याजवळ छावणी देऊन रहावें व पावसाळा सुरू होऊन तुंगभद्रेस पूर आला कीं बदामीस वेढा द्यावा. असें ठरल्यावर स्वत: मोहिमींत न राहतां पंचवीस हजार सैन्यासह तहवारजंग नांवाच्या आपल्या सरदारास हरिपंत फडक्याच्या स्वाधीन करून निजाम हैदराबादेस निघून गेला.

ब दा मी चा वे ढा.- यावेळीं टिप्पूनें कांहीं सैन्य बदामीकडे रवाना करून तो स्वत: श्रीरंगपट्टणाकडे गेला. ही बातमी कळतांच बदामीस लागलीच वेढा देण्याचें ठरवून शहराच्या तटबंदीस मोर्चेबंदी केली (१ मे). परंतु तीन आठवडे झाले तरी तटबंदीस भगदाड पडत नाहीं असें पाहून शेवटीं शिड्या लावून शहर हस्तगत करण्याचा प्रयत्‍न करण्यांत आला. शहराच्या संरक्षणार्थ पुष्कळ लोक होते. दोस्तांचा हल्ला येतांच या लोकांनीं अगोदरच खंदकांत तयार केलेल्या सुरुंगास बत्ती दिली. त्यांचा एकदम भडका होऊन दोस्तांचे कित्येक लोक जायबंदी झाले. तरीहि हल्ला तसाच पुढें नेटानें चालविण्यांत येऊन शहर हस्तगत करण्यांत आलें (२० मे). तेव्हां तेथील सैन्य किल्ल्यांत निघून गेलें व तेथून दोस्तांशीं लढूं लागलें. तथापि मराठ्यांनीं तो मार सहन करून शेवटीं बदामीचा किल्ला काबीज केलाच. बदामी फत्ते झाल्यावर नाना पुण्यास परत गेले. यानंतर हरिपंतानें वाटेंतील सिसींचा किल्ला हस्तगत करून, गजेंद्रगडास येऊन वेढा दिला. परंतु तो किल्ला फत्ते होण्यापूर्वींच टिप्पू हा आपल्या सैन्यासह अदवानीकडे त्वरेनें गेला असल्याचें वर्तमान दोस्तांनां कळलें. अदवानीच्या किल्ल्यांत निजामअल्लीचा पुतण्या मोहतबंजग होता. त्याची तितकी तयारी नसल्यामुळें लवकर मदतीस येण्याबद्दल त्यानें निजामास व हरिपंत यांस निरोप पाठविला. तिकडे निजामानें होती नव्हती तेवढी फौज हैदराबादेहून रवाना केली. इकडे हरिपंतानें आपल्याबरोबर असलेलें निजामाचें सर्व सैन्य व आप्पा बळवंत याच्या हाताखालीं आपली आणखी २०००० फौज, याप्रमाणें एकंदर ४५,००० लोक अदवानीकडे रवाना केले (९ जून). या सैन्याची व निजामानें हैदराबादेहून पाठविलेल्या सुमारें १५००० सैन्याची बन्नूर येथें गांठ पडली. ही कुमक येऊन पोंचण्यापूर्वींच अदवानी सर करण्याचा टिप्पूनें आटोकाट प्रयत्‍न केला; परंतु तोंपर्यंत मोहबतजंगानें शौर्यानें किल्ला झुंजवून टिकाव धरला. आप्पाबळवंत अदवानीनजीक येतांच टिप्पू मोर्चे उठवून मागें सरला. ता. २२ जून रोजीं मराळ्यांच्या फौजेनें टिप्पूच्या सैन्याशीं लढाई दिली; तींत मोंगलांच्या ४०,००० फौजेनें मराठ्यांस काडीमात्रहि कुमक न करतां ती गोटांतच स्वस्थ बसून राहिली. यावेळीं पर्जन्यकाळ नजीक आल्यामुळें, तुंगभद्रेस पूर येऊन आपला देशीं जाण्याचा मार्ग केव्हां बंद होईल याचा नेम नाहीं व दोआबांतील मुलूख अजून पूर्णपणें आपल्या कबजांत आला नसल्यानें आपल्याला तुंगभद्रेपलीकडून रसद मिळण्याचा मुळींच संभव नाहीं, उलट टिप्पू स्वत:च्याच मुलखांत असल्यामुळें तो दाणावैरणीसंबंधानें अगदीं निर्धास्त आहे, वगैरे गोष्टींचा विचार करून मराठ्यांनीं अदवानीचें रक्षण करण्याच्या भानगडींत फारसें न पडतां, तेथील सर्व माणसांस घेऊन तुंगभद्रेपार होण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणें किल्ला मोकळा करून त्यांनीं मोठ्या शिताफीनें आपले सर्व लोक मागें घेतले, आणि रिकामा किल्ला टिप्पूच्या हातीं लागला (जुलै). तिकडे गजेंद्रगडचा किल्ला हरिपंतानें लढून घेतला (११ जून) व तो हस्तगत झाल्यावर हरिपंत अदवानीकडे निघाला. पण आप्पाबळवंत त्याला मार्गांतच येऊन मिळाल्यामुळें निजामाच्या सैन्यास परत पाठवून व वाटेंतील बहादुरवेंडा काबीज करून हरिपंत कोपळकडे वळला. इतक्यांत टिप्पू गलगनाथाजवळ अचानक तुंगभद्रा उतरून मराठ्यांच्या पुढें आला. मराठ्यांचे घोडदळ आपल्याहून अधिक असल्यामुळें मैदानांत आपला त्यांच्यापुढें क्षणभरहि टिकाव लागणार नाहीं हें जाणून तुंगभद्रा व वर्धा या नद्यांच्या संगमावर इटगें येथें अडचणीची जागा पाहून त्यानें आपली छावणी दिली. तुंगभद्रेपलीकडचा मुलूख टिप्पूच्याच ताब्यांत असल्यामुळें, त्याला तिकडून धान्यवैरण लागेल तेवढें आणवितां येई. उलटपक्षीं मराठ्यांचें घोडदळ पुष्कळ असल्यानें त्यांनां वैरण फार लागे व ती त्यांनां एकाच ठिकाणीं छावणी करून मिळवितां येणें शक्य नसे. मराठ्यांची छावणी टिप्पूपासून सुमारें सहा मैलांवर होती; तिच्यावर टिप्पूनें एकाएकीं रात्रीं छापा घातला (२८ ऑगस्ट), परंतु त्यापासून मराठ्यांचें कांहींच नुकसान झालें नाहीं. मात्र मराठ्यांनीं आपली छावणी हालवून लक्ष्मेश्वराजवळ नेली. तेव्हां टिप्पूनें पुन्हां त्याच रात्रीं त्यांच्यावर दुसरा छापा घातला; पण यांतहि मराठ्यांचें विशेष नुकसान झालें नाहीं (१२ सप्टेंबर). यानंतर टिप्पूनेंहि आपली छावणी हालवून सावनूरपाशीं आणली. इकडे होळकर व बेहरे यानीं कित्तूरचा किल्ला खेरीजकरून त्या प्रांतांतील बाकीचीं टिप्पूचीं ठाणीं हस्तगत करून घेतलीं. तिकडे टिप्पूनें राघवेंद्र नाईक याजबरोबर फौज देऊन त्यास सावनूरकर नबाबापासून खंडणी वसूल करण्याकरितां पाठविलें. ही बातमी समजतांच होळकर व बेहेरे हे एका दिवसांत ४० कोसांची दौड करून एकदम सावनुरास गेले. परंतु मराठ्यांच्या आगमनाची बातमी लागून राघवेंद्र तुंगभद्रावर पळून गेला. यानंतर तुकोजीनें बेहर्‍यांच्या पथकास सावनुरासच नबाबाच्या रक्षणाकरितां ठेविलें व आपण स्वत: लक्ष्मेश्वर जिल्ह्यांतील सावशी, मुळगुंद, गदम, तडस, बेहट्टी व नवलगुंद येथें आपलीं ठाणीं घालून, टिप्पूचा सरदार बुर्‍हाणउद्दीन हुबळीजवळ आला होता, तेथें पुन्हां त्याच्या तोंडावर येऊन राहिला. शेवटीं हताश होऊन बुर्‍हाणउद्दीन टिप्पूकडे निघून गेला व मग तुकोजीहि हरिपंतानां येऊन मिळाला (सप्टेंबर).

सावनूराच्या दोन्ही बाजूस समोरासमोर टिप्पू व हरिपंत हे सुमारें एक पंधरवडाभर स्वस्थ बसले होते. शेवटीं प्रथम टिप्पूनें मराठ्यांच्यावर अचानक छापा घातला (१ आक्टोबर). या हल्ल्यांत सूर्योदयापासून दोनप्रहरपर्यंत दोन्ही पक्षांकडील तोफांची मारगिरी चालली होती. या लढाईंत मराठ्यांकडील लोक बरेच पडले व सावनूरच्या नबाबास टिप्पूची दहशत बसून तो सावनूर सोडून मराठ्यांच्या गोटांत आला. टिप्पू आतांपर्यंत नेहमीं नदीकांठची अडचणीची जागा धरून राहत असल्यामुळें मराठ्यांचा त्यावर कांहीं लाग चालत नसे, म्हणून त्याला आतां मैदानांत खेंचण्याकरितां हरिपंतानें खटपट केली. परंतु त्याचा हेतु साध्य झाला नाहीं. तेव्हां त्यानें शिरहट्टीवर तोफा डागून ती सर केली (१४ नोव्हेंबर), तरीहि टिप्पू आपली जागा सोडून पुढें आला नाहीं. मात्र मराठे सावनुरापासून दूर जातांच, त्यानें तें शहर हस्तगत केलें व मोहरमपर्यंत तेथेंच राहून नंतर तो बंकापुरास गेला. तेथें त्यानें आपलें सर्व अवजड सामान ठेवलें व इटगें येथें येऊन एकाएकीं मराठ्यांच्यासमोर उतरला (३० नोव्हेंबर), परंतु त्याच्या आगमनाची बातमी लागल्यानें दोस्तांचें लष्कर मागें हटत असतां टिप्पूनें छापा घालून मोंगलांकडील बरेंच सामान लुटून नेलें. परंतु हरिपंत मात्र व्यवस्तिपणें मागें सरकला. टिप्पूनें मराठ्यांच्या लष्करावर घातलेला हा शेवटचाच छापा होय. यानंतर दोन्ही पक्षांतील टोळ्यांत किरकोळ चकमकी होत असत.

डिसेंबर महिन्यापासून टिप्पू मराठ्यांशीं तह करण्यास विशेष उत्सुक दिसूं लागला. टिप्पू तहास इतका उतावीळ होण्याचें कारण. इंग्रज आपणाविरुद्ध मराठ्यांनां मदत करतील अशी त्यास शंका आली व मराठ्यांनींहि ती कायम राहण्यासाठीं, इंग्रजांचा वकील मॅलेट यास आपल्या लष्करांत बरेच दिवस ठेवून घेतलें होतें.

या पुढें मराठ्यांनीं पूर्वेकडे सरकण्याचा क्रम ठेविला. परंतु टिप्पू नदीकांठची खडकाळ जागा सोडून मैदानांत केव्हांहि आला नाहीं. टिप्पूचे वकील तुकोजी होळकरामार्फत तह घडवून आणण्याची खटपट करीत असतांच टिप्पूनें बहादुरवेड्यांचा किल्ला पुन्हां परत घेतला (१३ जानेवारी १७८७). त्यामुळें टिप्पूच्या वकिलांच्या भाषणावर हरिपंतास विश्वास बसेना. याचा परिणाम असा झाला कीं उभयपक्षीं लढाई बंद व्हावी असा ठराव (१० फेब्रु०) झाला होता तरी देखील पुढें कित्येक दिवसपर्यंत तह घडून आला नाहीं. टिप्पू तहाच्या कलमांत अतिशय घासाघीस लावीत असे, हें तहाला विलंब लावण्याचें दुसरें एक कारण होतें. सरतेशेवटीं नाइलाजानें टिप्पूनें एप्रिल महिन्यांत पुढीलप्रमाणें तह केला. टिप्पूनें तुंबून राहिलेल्या खंडणीदाखल मराठ्यांस ४८ लक्ष रुपये द्यावे. यांपैकीं ३२ लक्ष तूर्त रोख द्यावे व बाकीचे हप्त्यानें द्यावे. गजेंद्रगड, बदामी, नरगुंद व कित्तूर हीं संस्थानें व किल्ले मराठ्यांस देऊन अदवानीचें संस्थान निजामच्या हवालीं करावें; आणि सावनूरकर नबाबाचा मुलुख व राजधानी सावनूरकरास परत द्यावी.

यानंतर मराठे कृष्णा ओलांडून पलीकडे गेले. तेव्हां तहाचीं कलमें विसरून टिप्पूनें त्यांनां परत केलेला कित्तूरचा किल्ला पुन्हां काबीज केला व बेदनूर येथें मराठ्यांच्या कोंकणांत स्वारी करण्यासाठीं सैन्य जमा केलें. याचवेळीं चेरिकाच्या राजास इंग्रजांच्या तेळिचेरीवर हल्ला करण्यास चिथावून देऊन इंग्रजांचा स्नेही जो त्रावणकोरचा राजा त्याचें राज्य काबीज करण्याचीहि तयारी चालविली. टिप्पू हा मुसुलमान असल्यामुळें मनांतून निजामअल्लीचा ओढा त्याच्याकडे असे व त्यामुळें त्यानें एकदां टिप्पूशीं दृढ स्नेहसंबंध जोडण्याचा गुप्त प्रयत्‍नहि केला होता, परंतु टिप्पूनें त्याकरितां दोन्ही घराण्यांत शरीरसंबंध घडवून आणण्याची अट घातल्याकारणानें निजामास राग येऊन त्यानें तो नाद सोडून दिला. इकडे टिप्पूच्या एकंदर धोरणावरून कॉर्नवालीसचें मन त्याच्या हेतूविषयीं बरेंच साशंक होऊन तो निजाम व मराठे यांच्याशीं शक्य तितका दृढ स्नेह ठेवूं लागला. त्यानें निजामास तो टिप्पूवर स्वारी करील तर त्यास दोन पलटणी व तोफांची मदत देण्याचें गुप्तपणें कबूल केलें. हें समजतांच टिप्पूनें त्रावणकोरचें राज्य काबीज करण्याचा आपला उद्देश लपवून न ठेवतां उघडपणें (२९ डिसेंबर) त्रावणकोरच्या तटबंदीवर जातीनें हल्ला चढविला. मात्र त्यांत त्याला यश आलें नाहीं.

वरील कारणांमुळें इंग्रजांनीं नानाफडणवीस व निजाम यांची टिप्पूवर स्वारी करण्यास मदत मागितली व इंग्रजांचा पुणें दरबारचा वकील मॅलेट याच्या तर्फे (ता. २९ मार्च) या तिघांनीं टिप्पूचा मुलूख आपसांत वांटून घ्यावा असें ठरविलें. तथापि तहाचा खर्डा नक्की ठरून त्यावर पेशव्यांच्या सह्या होण्यास आणखी दोन महिने लागले (जून १). तिकडे निजामअल्लीच्या मनांत यावेळीं निराळेच डावपेंच असल्यामुळें जुलैच्या ४ थ्या तारखेपावेतों त्यानें तहावर सहीच केली नाहीं.

या मोहिमीस मे (१७९०) महिन्यांतच आरंभ झाला. या स्वारींत इंग्रज सेनापति मेडोज होता. त्यानें मद्रासहून निघून दक्षिणेकडून टिप्पूच्या मुलूखावर स्वारी करून कडूर, दिंदिगल, कोइंबतूर वगैरे स्थळें काबीज केलीं. कर्नल हार्टले हा मुंबईचें सैन्य घेऊन जलमार्गानें पश्चिमेकडून आला व कालीकतजवळ टिपूचें कांहीं सैन्य होतें त्याची त्यानें दाणादाण केली. पुढें जनरल आबरक्रोंबी हा मुंबईहून आणखी सैन्य घेऊन हार्टले यास मिळाला व त्यानें लवकरच टिप्पूचा बहुतेक मलबार प्रांत काबीज केला मेडोज हा आपल्या मोहिमीचें काम संपवून जानेवारींत (१७९१) मद्रासेस आला व त्या नंतर लॉर्ड कॉर्नवालीस हा स्वत: सेनापति बनला.

मराठ्यांच्या तर्फे आरंभीं परशुरामभाऊ पटवर्धन हे सेनापति होते. ते (मे १७९०) पुण्याहून निघून तासगांवास आले. इकडे टिप्पूकडे थकलेल्या खंडणीपैकीं कांहीं वसूल झाल्यास पहावें म्हणून नाना फडणविसानीं टिपूच्या वकिलास आगस्टपावेतों निरोप दिला नव्हता. मराठ्यांच्या मदतीस मुंबईहून कॅप्टन लिटल हा मे महिन्यांत निघून जलमार्गें संगमेश्वरास आला व तेथून अंबाघाट चढून (जून १८) तासगांवानजीक कुमठे गांवीं येऊन परशुरामभाऊ यानां मिळाला. नंतर या सर्व सैन्यासह परशुरामभाऊ कृष्णापार होऊन (११ ऑगस्ट) त्यानीं कर्नाटकांतील टिप्पूचीं निरनिराळीं ठाणीं काबीज केलीं. याप्रमाणें ठाणीं घेत घेत भाऊ धारवाडानजीक (नरेंद्र गांवीं) पाहोंचले (१४ सप्टेंबर).

यावेळीं भाऊंचें (इंग्रज पलटणीशिवाय) लष्कर १०००० स्वार व ३००० प्यादे इतकें होतें. तुंगभद्रेच्या दक्षिणेस टिप्पूचे सरदार बद्रुलजमानखान व कुतुबुद्दीन हे सुमारें ५००० सैन्यासह होते, यावेळीं निजामाचें सैन्यहि हैद्राबादेहून निघून कृष्णा उतरून कोपळच्या व बहादुरवेंड्याच्या गिल्लास वेढा द्यावयास आलें. तेव्हां कुतुबुद्दीन हा मोंगलांच्या तोंडावर राहिला व बद्रुलजमान हा धारवाडच्या किल्ल्यांत राहिला. किल्ल्यांतील शिबंदी दहा हजार होती.

धा र वा ड चा वे ढा.- परशुरामभाऊ व इंग्रज धारवाडास आले तरी त्यांच्याजवळ मोर्चेबंदी करण्यालायक तोफा नसल्यामुळें, कित्येक दिवसपर्यंत त्यांनीं किल्ल्यावर नुसती गोळागोळी चालविली, मात्र त्यावेळीं निरनिराळ्या मराठे सरदारांबरोबर फौजा पाठवून टिप्पूचा पुष्कळ मुलूख काबीज केला (१७११ फेब्रुवारी). नंतर भाऊनीं (आक्टो. ३१) नरेंद्राहून कूच करून धारवाडच्या पूर्वेस एक कोसावर नवळूर येथें मुक्काम केला. दुसर्‍या भाऊ टेंकडीवर मोर्चे बांधण्यास गेले असतां किल्ल्यांतील लोकांनीं त्यांच्यावर हल्ला केला. परंतु त्यांत त्यांचाच पराभव होऊन भाऊनीं त्यांनां हांकून लाविलें व कांहीं तोफा काबीज केल्या. मराठ्यांनीं किल्ल्यांत रसद मुळींच जाऊं न दिल्यानें किल्ल्यांतील लोक हळूहळू पळून जाऊं लागले. अशा स्थितींत धारवाडच्या पेठेवर हल्ला चढवून भाऊनीं ती काबीज केली (१३ डिसेंबर)

तोफांचा व दारूगोळ्यांचा चांगला पुरवठा केल्यास धारवाडचा किल्ला लवकर पडेल असें लिटलनें मुंबई सरकारास वेळोवेळीं लिहिलें होतें. परंतु त्यांनीं तोफा व दारूगोळा नं पाठवितां कॅ. फ्रेड्रिक यास यूरोपियन शिपायांची एक पलटण व कांहीं हिंदी शिपाई बरोबर देऊन रवाना केलें. दारूगोळ्याच्या कमतरतेमुळें मराठ्यांनां किल्ल्यावर तोफांचा मारा अव्याहत चालूं ठेवतां येईना त्यामुळें त्यांच्या तोफा बंद पडल्या कीं किल्ल्यांतील लोक पडलेली तटबंदी दुरुस्त करून घेत. या चेंगटपणास कंटाळून फ्रेड्रिक हा मोठ्या आढ्यतेनें म्हणला कीं, 'हल्ल्याखेरीज किल्ला हातीं येत नाहीं; तुम्ही तरी हल्ला करा नाहीं तरी आम्ही तरी करितों; हल्ल्यांत तुम्ही आमची कुमक करूं नये आम्ही तुमची करणार नाहीं.'' भाऊंनीं हल्ल्यानें किल्ला पडणार नाहीं वगेरे त्याची समजूत घालण्याचा प्रयत्‍न केला परंतु त्याचा फारच आग्रह पाहून शेवटीं त्यास परवानगी दिली. तेव्हां फ्रेड्रिक यानें शेराच्या भार्‍यांनीं खंदक भरून त्यांवरून पलीकडे जाऊन तटबंदीवर हल्ला चढविला (७ फेब्रु.). परंतु किल्ल्यांतील लोकांनीं या वाळलेल्या भार्‍यांनां आग लाविल्यामुळें फ्रेड्रिक यास मोठ्या धांदलीनें आपले शिपाई परत आणावे लागले; त्यावेळीं त्याचे बरेच लोक ठार झाले. या अपयशामुळें फ्रेड्रीक झुरणीस लागून मेला (१३ मार्च). धारवाडचा हा वेढा सात महिने टिकला. शेवटीं रसदेच्या अभावीं बद्रुलजमानानें टेकीस येऊन किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला व ता. ६ एप्रिलला पेशव्यांचें निशाण किल्ल्यावर चढलें. तिकडे लॉर्ड कॉर्नवालीस हा मद्रासेहून (५ फेब्रु.) नेलोरास आला व तेथून एक महिन्यानें बंगलोरास दाखल होऊन लगेच तेथील किल्ल्यास वेढा देऊन पंधरा दिवसांनीं त्यानें किल्ला सर केला (२१ मार्च). याच सुमारास कोपळ व बहादुरवेंडा हे किल्लेहि निजामानें घेतले. याच सुमारास नाना फडणविसानें परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या मदतीस हरिपंत फडक्यानां पाठविलें. ते कृष्णा ओलांडून पानगल येथें निजामच्या मुलाखतीस आले. तिथें दोघांत असें ठरलें कीं सर्वांनीं मिळून टिप्पूला नंरम करावें पण त्याच्या सत्तेचा समूळ नाश मात्र करूं नये. नंतर पानगलहून हरिपंत कर्नोळ येथें आले.

बंगलोर पडल्यानंतर निजामानें आपली दहा हजार फौज कॉर्नवालीस याच्या मदतीस रवाना केली, मार्गांत टिपूचा सरदार कुतुबुद्दीन याचा पराभव करून ही फौज इंग्रजांस येऊन मिळाली. मराठ्यांनां देखील इंग्रजांनीं श्रीरंगपट्टण सर करण्यापूर्वीं आपल्या फौजेनें त्यांनां जाऊन मिळावें असें वाटत होतें. म्हणून बंगलोर पडल्याचें समजल्यावर हरिपंतानें कर्नोळ येथून आपली छावणी हलवली व शिरें घेऊन व मदगिरी काबीज करण्यास सैन्य रवाना करून तो श्रीरंगपट्टणच्या रोखें निघाला आणि वाटेंत माकलीदुर्ग, भूसमाग व रतनागिरी हीं ठाणीं त्यानें काबीज केलीं.

धारवाड घेतल्यावर भाऊहि पुढें निघाले. बंगलोर घेतल्यावर कार्नवालीसनें आबरक्रांबी यास पश्चिमेकडून येऊन मिळण्याविषयीं पत्रें पाठविलीं परंतु आपण दक्षिणेकडे गेल्यावर मागें शत्रूनें आपलीं रसद व मार्ग बंद करूं नये म्हणून मार्गांत ठिकठिकाणीं आपलीं ठाणीं बसवीत भाऊ पुढें येत होते. मात्र यावेळीं इंग्रजी लष्कराच्या हालचालीं कळेनात. कारण टिप्पूच्या बेराडांनीं इंग्रजी जासुदांनां मध्येंच कापून काढण्याचा सपाटा चालविला. निजाम येऊन मिळाल्यावर कार्नवालीस यानें पट्टणाकडे कूच केलें, परंतु टिप्पूनें इंग्रजांच्या वाटेंतील आपला मुलुख बेचिराख केल्यामुळें त्यांच्या गुरांस वैरण मिळेना. तसेंच त्यांची बाहेरची रसदहि टिप्पूनें लुटली. नंतर टिप्पूनें अरीकेरा येथें इंग्रजांवर हल्ला केला व त्यांत त्याचाच पराजय झाला (१५ मे). पुढें चार दिवसांनीं कार्नवालीसनें श्रीरंगपट्टणच्या पश्चिमेकडील कनियामबाडी गांवीं आपली छावणी केली. तो पट्टणाच्या इतक्या समीप आला, तरी धान्यवैरणाच्या अभावामुळें त्याच्या छावणींतील शिपायांची व गुरांची फार हलाखी झाली व त्यामुळें त्याला वेढ्याचें काम हातीं घेंणें अशक्य झालें. म्हणून त्यानें आबरक्रांबी यास परत पाठवून व बरोबरच्या तोफा फोडून आणि दारूगोळ्याचा नाश करून तो सर्व सैन्यासह मेलकोट्याकडे जावयास निघाला (२६ मे). इतक्यांत भाऊ व फडके हे मेलकोट्यास आले. इंग्रज व मराठे परस्परांपासून जवळ असतांहि त्यांनां एकमेकाविषयीं कांहींच वार्ता नव्हती कारण जासुदांस टिप्पूचे बेरड रस्त्यांतच मारूर टाकीत. ज्या दिवशीं कार्नवालीस मेलकोट्याकडे यावयास निघाला त्याच दिवशीं मराठेहि मेलकोट्याहून निघाले होते. वाटेंतच मराठ्यांची व इंग्रजांची गांठ पडली; तेव्हां इंग्रजांच्या सैन्यास व अंमलदारास अतिशय आनंद झाला. मराठ्यांच्या बरोबर धान्य वगैरे सामान भरपूर होतें. स्वत:च्या छावणींत महर्गता होईल याची पर्वा न करितां केवल भूतदयेनें प्रेरित होऊन भाऊ व हरिपंतानीं आपल्या दोस्तांच्या उपाशीं लोकांचें दु:ख निवारण करण्याची स्वत:कडून शक्य तेवढी खटपट केली.

दोस्तांचें हें प्रचंड लष्कर दहा दिवसपर्यंत श्रीरंगपट्टण जवळ मुक्काम करून होतें. या अवधींत मराठ्यांची रसद यावयाची होती; ती दोस्तांच्या छावणींत येऊन दाखल झाली व मग सर्व लष्कर कूच करून नागमंगलम् येथें आलें. नंतर हरिपंतानें लिटलच्या पलटणीसह परशुरामभाऊस उत्तरेकडे शिरें वगैरे प्रांत ताब्यांत घेण्यासाठीं पाठविलें. भाऊनें प्रथम निजगलचा किल्ला घेऊन व निजगलची पेठ जाळून आणि शिरें घेऊन अचानक चित्रदुर्गास जाऊन वेढा घातला परंतु चित्रदुर्ग किल्ला हस्तगत होईना. तेव्हां त्यानें आसमंतांतील दुसरीं कित्येक तटबंदीचीं ठिकाणें घेतलीं.

इकडे कार्नवालीस यानें कृष्णगिरी खेरीज बाकीचा सर्व बारामहाल प्रांत जिंकून घेतला; व मग बंगलोर व गुरमकोंडा यांच्या दरम्यानचे किल्ले सर करण्याचें ठरवून तो त्या उद्योगास लागला. उत्तरेकडें मोंगलांनींहि पेन्नार नदीकांठचा गंडीकोट्टा किल्ला काबीज करून गुरमकोंड्यास वेढा घातला. परंतु पुष्कळ दिवस वेढा घातला तरी तो पडेना म्हणून नंदिदुर्ग घेतल्यावर कार्नवालीसनें त्याच्या मदतीस कांहीं मोठ्या तोफा व फौज आपण बंगलोरास राहिला.

यापुढें परशुरामभाऊनें फार दिवसांपासून मनांत असलेलें बेदनूर काबीज करण्याचें काम हातीं घेतलें. प्रथम होळीहोनूर हस्तगत करून, शिमोग्याच्या रोखें तो निघाला. शिवमोघ्याचा किल्ल्यांत टिप्पूचा रेझासाहेब नांवाचा सेनापति ७००० प्यादे, ८०० स्वार व १० तोफा एवढ्या सरंजामासह होता. भाऊ वेढा देण्याकरितां येत आहे असें पाहून रेझा आपल्या लोकांसह किल्ल्याच्या नैऋत्येस झाडींत जाऊन राहिला. तेव्हां भाऊनेंहि प्रथम किल्ला न घेतां रेझा जेथें दडून बसला होता तेथें येऊन छावणी केली. येथें आल्यावर भाऊनें आपला मुलगा आप्पासाहेब यास रेझावर पाठविलें. रेझाची जागा झाडींत असून फार अडचणीची असल्यामुळें तेथें घोडदळाचा कांहीं उपाय चालण्यासारखा नव्हता. म्हणून आप्पानें प्रथम पायदळाचा हल्ला करून शत्रुस तळावरून हुसकून लाविलें, व मग त्यावर घोडेस्वार घालून पराभव केला. रेझाचा मोड झाल्यावर थोड्याच दिवसांत शिवमोघ्याच्या किल्लाहि भाऊच्या हातीं पडला (२ जानेवा ७९२). नंतर शिवमोघ्याच्या आसमंतात आपलीं ठाणीं घालून भाऊ बिदनूरकडे वळले. याच वेळी कार्नवालीसनें बंगलोरहून निघून सावनदुर्ग, रामगिरी वगैरे किल्ले घेतले.

निजाम गुरमकोंड्यास वेढा देऊन बसला होता परंतु त्याला तो किल्ला अखेर पावेतों सर करितां आला नाहीं. त्यानें बर्‍याच प्रयत्‍नाअंतीं खालचा किल्ला मात्र काबीज केला. कार्नवालीस श्रीरंगपट्टणाच्या रोखें जात आहे असें समजल्या. वर वरील किल्ला हस्तगत करण्याची आशा सोडून मोंगल तेथून निघाला व कार्नवालीसला येऊन मिळाला (२५ जाने.). मात्र त्यानें गुरमकोंड्याच्या खालच्या किल्ल्यांत भरपूर शिबंदी विली. भाऊ शिमोघ्याहून निघाला तो बिदनुरास दाखल झाला व त्यानें किल्ल्यास घेरा घालण्याची तयारी चालविली परंतु बिदनूरच्या वेढ्याचें काम तसेंच टाकून एकदम श्रीरंगपट्टणास निघून जावें अशीं नाना फडणविसाचीं त्यास दररोज पत्रें येऊं लागलीं, म्हणून बिदनूर घेण्याचा बेत रहित करून भाऊ श्रीरंगणपट्टणाकडे तडकाफडकीं वळले. याप्रमाणें कार्नवा लीस, हरिपंत फडके व निजाम अल्लीचा पुत्र शिकंदर जहा यांचें संयुक्त सैन्य श्रीरंगपट्टणासमोर आलें (५ फेब्रु.). दुसर्‍यांच दिवशीं दोस्तांनीं किल्ल्याच्या बाहेरील टिप्पूच्या सेनेवर हल्ला करून तटबंदीबाहेरचा सर्व भाग आपल्या ताब्यांत घेतला. आतां टिप्पू दोस्तांशीं तह करण्याकरितां खटपट करूं लागला, परंतु दोस्तांनीं तिकडे दुर्लक्ष केलें. सरतेशेवटीं टिप्पूकडून अधिक नरमाईचीं बोलणीं आल्यानें त्यांनीं तिकडे त्याच्या वकिलाची भेट घेतली. मात्र दोस्तांनीं आपल्या वेढ्याच्या कामांत बिलकुल व्यत्यय येऊं दिला नाहीं. इतक्यांत पश्चिमेकडून आबरक्रांबीची तुकडी येऊन पोंचली तेव्हां तिच्यावर टिप्पूनें हल्ला केला पण तो परतवून लावण्यांत आला. मात्र इकडे तहाची वाटाघाट चालूच होती. शेवटीं बरीच भवति न भवति होऊन टिप्पूनें दोस्तांच्या अटीस आपली संमति दिली व लागलींच युद्ध तहकूब करण्यांत आलें (२३ फेब्रुवारी). या तहान्वयें असें ठरलें कीं, युद्धाच्या सुरवातीपूर्वीं टिप्पूकडे जेवढा मुलूख होता त्याचा अर्धा त्यानें दोस्तांच्या हवाली करावा, आणि शिवाय तीन कोटी तीस हजार रुपये खंडणी भरावी; या खंडणीपैकीं अर्धी रक्कम ताबडतोब द्यावी व बाकीच्या रकमेची फेड एका वर्षांत करावी; हैदरच्या वेळेपासून दोस्तांकडील जेवढे लोक कैदेंत होते त्या सर्वांची मुक्तता करावी; आणि या सर्वांच्या हमीदाखल आपले दोन पुत्र दोस्तांजवळ ओलीस ठेवावे. त्याप्रमाणें टिप्पूचे दोन मुलगे इंग्रजांच्या छावणींत येऊन दाखल झाले व खंडणीची अर्ध्याहून अधिक रक्कमहि दोस्तांच्या पदरांत पडली. परंतु इतक्यांत दोस्तांच्या स्वाधीन जो मुलुख करावयाचा, त्यांत कूर्ग संस्थान जातें ही गोष्ट टिप्पूच्या ध्यानांत येऊन तो गडबड करूं लागला. कूर्ग हें श्रीरंगपट्टणाचें दारच असल्यामुळें तें मला तुमच्या स्वाधीन करितां येत नाहीं अशी त्यानें हरकत घेतली. तेव्हां दोस्तांनीं वेढ्याची लागलींच तयारी केली व तहाच्या अटीमध्यें आपण अणुमात्रहि सवलत देण्यास तयार नाही असें जाहीर केलें. त्यामुळें टिप्पूनें आपला आग्रह सोडला. या युद्धांत जो कांहीं एकंदर फायदा झाला त्याचे तीन सारखे विभाग करून ते दोस्तांनीं आपसांत वांटून घ्यावेत असें ठरून मार्च महिन्याच्या अखेरीस दोस्तांचीं लष्करें आपापल्या मुलखाकडे निघालीं.

नेपोलियननें ईजिप्तवर स्वारी केली असतां त्याच्या मनांत हिंदुस्थानावर स्वारी करण्याचें आलें होतें; पण त्याला इकडची माहिती चांगली नव्हती. टिप्पूनें या बाबतींत त्याला पत्रें पाठविलीं होतीं व मदत देण्याचेंहि कबूल केलें होतें; परंतु, टिप्पूलाहि यूरोपियन राजकारण, त्यांचें बलाबल व भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती अगदींच त्रोटक असल्यानें या मसलतीचा कांहीं उपयोग झाला नाही व दोघांचा हेतु अखेरपर्यंत तडीस गेला नाहीं (सन १७९८). मात्र फ्रेंचांशीं टिप्पूनें दोस्तीचा तह करून व त्यांचीं पलटणें चाकरी ठेवून इंग्रजांनां हाकलून लावण्याचा उद्योग आरंभला (जून १७९८). तेव्हां वेलस्लीनें याबद्दल खुलासा मागितला असतां टिप्पूनें त्याला धुडकावून लाविलें. त्यामुळें वेलस्लीनें टिप्पूशीं युद्ध पुकारलें (२२ फेब्रुवारी १७९९). या लढाईच्या हालचाली फार सपाट्यानें वेलस्लीनें चालविल्या. मुंबईहून जलमार्गानें आलेल्या इंग्रज फौजेनें टिप्पूच्या कूर्ग प्रांतांतील सैन्याचा पराभव केला (६ मार्च). इंग्रजी मुख्य फौज (३७०००) जनरल हॅरिस याच्या हाताखालीं होती, तिनें टिप्पूच्या राज्यांत प्रवेश करून (५ मार्च), म्हैसूरच्या पूर्वेस असलेल्या (चौदा कोसांवरील) मळवेल्ली गांवीं टिप्पूचा पराभव केला (२७ मार्च) व श्रीरंगपट्टणावर दौड करून त्यास वेढा घातला. वेढा उठविण्यासाठीं टिप्पू शेवटपर्यंत मोठ्या शौर्यानें लढला; अखेर पट्टणच्या वेशींत इंग्रजांनां अडवीत असतां डोकींत गोळी लागून तो ठार झाला (४ मे). तेथील प्रेतांच्या खचांतून त्याचें प्रेत ओळखून काढून, तें हैदरअल्लींच्या कबरस्थानाजवळच लालबागेंत दुसर्‍या दिवशीं पुरण्यात आलें; त्यावेळी इंग्रजांनीं त्याला योग्य तो राजकीय मान दिला. त्यानंतर इंग्रजांनी पट्टण लुटलें, त्यांत त्यांनीं ताळतंत्र सोडून भयंकर लूट केली. वेलस्ली म्हणतो, कीं ''लूट थांबविण्यासाठीं मला अतिशय त्रास पडला; सैनिकांनां शिक्षा करावी लागली, फटके मारावे लागले, एवढेंच नव्हे तर पुष्कळांनां फांशींहि द्यावे लागलें.''

टिप्पूच्या मृत्यूसमयीं त्याचे राज्य ३०,४०,००० होनांचे (१ कोटी ६ लक्ष रुपये) होतें. तें इंग्रज, मराठे व निजाम यांनीं आपसांत वाटून घेतलें व थोडेसें म्हैसूरच्या पूर्वीच्या राजाच्या चामराज नांवाच्या वंशजाच्या स्वाधीन केलें. पट्टण घेतल्यावर इंग्रजांनीं टिप्पूच्या कुटुंबास आपल्या ताब्यांत घेऊन त्याच्या खर्चास २,४०,००० होनांचा मुलुख लावून दिला व त्यांनां वेलोर येथें ठेवण्यात आलें. पुढें वेलोर येथील शिपायांनीं इंग्रजांविरुद्ध बंड केलें (१० जुलै १८०६). त्यांत टिप्पूच्या मुलांचा हात असावा असें ठरवून इंग्रजांनीं त्यांची जहागीर जप्त करून त्यांनां तेथून काढून कलकत्ता येथें नेऊन ठेविलें. विल्सन म्हणतो कीं, मुलें दंग्यात सामील असल्याबद्दलचा पुरावा मुळीच मिळाला नव्हता.

टिप्पूनें १७ वर्षे राज्यकारभार केला. त्याचा स्वभाव चंचल, लोभी, अविश्वासी, क्रूर व धर्मवेडा असा होता. बापानें तर त्याला वेडा ठरविलें होतें. त्याची हिंदु प्रजाहि त्यास कंटाळली होती. कारण त्यानें पुष्कळ हिंदूंस हालहाल करून बाटविलें व जे बाटेनांत त्यांनां ठार केलें. एक नवीन धर्म स्थापन करून आपण त्याचे पैगंबर व्हावें अशी त्याची मनीषा होती. तत्रापि तो शूर व महत्त्वाकांक्षी होता. त्यानें नवीन कालगणना (वर्षाच्या महिन्यांचीं नांवें व आठवडा वगैरे) सुरू केली; त्याचप्रमाणें मापें, वजनें व नाणींहि नवीनच पाडली. तो स्वत:स फार शहाणा समजे. मात्र त्यानें आपला राज्यकारभार शिस्तबार चालविला व लष्करी व मुलकी सुधारणाहि केल्या. तो आपले हुकूम स्वत: लिहून काढी. फारशी, कानडी व उर्दू या भाषा त्याला चांगल्याच अवगत होत्या. तो धर्मवेडा होता तरी पण संकटसमयीं ब्राह्मणांनां अनुष्ठानें बसविण्यास व देवांची प्रार्थना करण्यास सांगे. तो आपल्या कैद्यांना फार क्रूरपणें वागवी. कलाकौशल्याचा व वाड:मयाचा तो शौकी होता. त्यानें आपल्या राजवाडयात फार मोठा ग्रंथसंग्रह जमविला होता; त्यांत १० व्या शतकापासूनचे बरेचसे संस्कृत हस्तलिखित ग्रंथ होते. तसेंच कुराणाची भाषांतरें, मोंगल इतिहासाच्या बखरी, हिंदुस्थानच्या तबारिखा वगैरे ग्रंथहि होते. हा सर्व संग्रह कलकत्ता येथें नेऊन ठेवला असून त्याची एक यादी कॅप्टन स्टुअर्ट यानें केलेली छापिली आहे. टिप्पूनें स्वत: दोन ग्रंथ तयार केले होते त्यांत पत्रांचाच भरणा विशेष आहे; एकाचें नांव फर्मान-बनाम-अलीराज असून दुसर्‍यास फसह्-उल-मजाहिदीन म्हणतात; पैकीं दुसर्‍या ग्रंथांचा कांही भाग भाषांतरित करून मि. स्क्रिस्प यानें छापिला आहे. टिप्पूचें खरें नांव फत्तेअल्लीखान असून त्याला बारा मुलें झालीं होती. त्यापैकी महम्मद सुलतान (गुलाम महंमुद) हा स. १८७७ त मरण पावला व मुहम्मद यासीन सुलतान हा सन १८४९ मध्यें मेला. बाकीचीं लहानपणींच वारलीं.

टिप्पूचें सिंहासन फार मौल्यवान व शोभिवंत होतें. तें अष्टकोनाकृति असून आठहि बाजूस वाघांचीं तोंडें बसविलेलें व वाघाप्रमाणें पाय असलेलें होतें. तें सर्व सोन्याचें असून वाघाचे दांत व डोळे रत्नांचे होते. टिप्पूस वाघ हें जनावर फार आवडे व तेंच त्याचें राजचिन्ह असे. ''विजयी पुरुष हा ईश्वराचा वाघ आहे'' असें वाक्य त्याच्या सर्व वस्तूंवर (वाघाच्या तोंडसह) कोरलेलें असें, समारंभपूर्वक तो या सिंहासनावर अखेरपर्यंत बसला नाहीं असें म्हणतात. लढाईनंतर हें सिंहासन व पुढें दिलेल्या वस्तू विलायतेस ई. इ. कंपनीच्या अजबखान्यांत ठेविल्या. पुढें (१८३१) त्या चौथ्या विल्यम राजास नजर केल्या. तेव्हापासून त्या अद्यापि विंडसर कॅसल या राजवाड्यात ठेवलेल्या आहेत. या सिंहासनावर मोत्यांची झालरी, छत व त्यांवर एक रत्नजडित हुम्मा पक्षी होता. तो खबुतराएवढा असून त्याच्या छातींत राजकीय शिक्का व कुराणांतील दोन वाक्यें कोरलेलीं आहेत. टिप्पूची रत्नजडित तलवारहि हल्लीं विंडसर कॅसलमध्येंच आहे. हिच्या मुठीवर वाघाचीं तोंडें असून तिच्या पात्यावर दोहोंकडे कुराणांतील वाक्यें कोरलेलीं आहेत; याशिवाय टिप्पूची बंदुक, शिरत्राण, निशाण वगैरें वस्तूहि वरील अजबखान्यांत आहेत. पट्टण येथील टिप्पूच्या कबरस्थानास पुढें डलहौसीनें हस्तिदंताची नकशी काढलेलें शिसवी दरवाजे नजर केले. लालबाग व किल्ला यांच्या दरम्यान कावेरीतीरी टिप्पूचा राजवाडा दर्यादौलतबाग नांवाचा आहे. येथें कांहीं दिवस बेल्स्ली राहिला होता. हा संगमरवरी महाल फार सुंदर असून त्याच्या भिंतीवर नक्षी कोरलेली आहे. पूर्वी या नक्षींत सोनें भरलेलें होतें. भिंतीवर रंगात चित्रें असून ती बहुधां टिप्पूनें केलेल्या इंग्रजांच्या पराभवाची निदर्शक आहेत; त्यातल्या त्यांत बेली हा टिप्पूला ससैन्य शरण आल्याचें चित्र उत्कृष्ट आहे. त्याची डागडुजी दोन वेळ झाली आहे.

 [संदर्भग्रंथ:-स्मिथ-ऑक्सफोर्ड हिस्टरी ऑफ इंडिया; खरे शास्त्री यांचे खंड, ७, ८, ९; डफ पु. २, ३; विल्क्स-म्हैसूर; बील; वेलस्ली-डिस्पॅचेस; इतिहास संग्रह; बौरिंग-टिप्पू सुलतान]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .