विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

टिपगड डोंगर - मध्यप्रांत, जिल्हा चांदा. मुरमगांव जमीनदारींत हे डोंगर असून सर्वांत उंच डोंगर समुद्रसपाटीपासून २००० फूट आहे. येथेंच टिपगडचा प्राचीन किल्ला आहे. आजूबाजूस दाट जंगल असल्यामुळें जवळ जवळ हा किल्ला मनुष्यवस्तीला पारखाच आहे. या किल्ल्याची तटबंदी व जागोजागचे बुरूज यांचा परिघ सुमारें दोन मैल होईल. किल्ल्यांत एक मोठा तलाव असून आंत उतरण्याकरतां पायर्‍या केलेल्या आहेत. या तळ्याचें पाणी कधीं आटत नाहीं व त्याची खोली किती आहे हें सांगतां येत नाहीं असें म्हणतात. तळ्याच्या पश्चिम भागांतून टिपगडी नदीचा उगम आहे व पावसाळ्यामध्यें ही नदी डोंगरांतून वहात असतांना तिचें फार भयंकर स्वरूप असतें. तलावाच्या दक्षिणेस बालेकिल्ला असून त्याभोंवतीं देखील चांगली तटबंदी आहे. किल्ल्याच्या स्वरूपावरून येथें कोणी तरी सामर्थ्यवान राजे रहात असावेत असें वाटतें. दंतकथेप्रमाणें येथें कोणी पूरमराजा नांवाचा गोंड राजा असून त्याजवळ २००० लढाऊ लोक, ५ हत्ती, २५ घोडे असून वैरागडचा सर्व प्रदेश याच्या ताब्यांत आला होता.