विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

टिटवी - हा पक्षी इंग्लंड वगैरे देशांत विपुल असून आयर्लंडपासून जपानपर्यंतच्या भागांतहि टिटवी पक्ष्यांची वाढती संख्या असल्याचें आढळून येतें. त्यांपैकीं बरेच पक्षी हिंवाळ्यांत पंजाब, ईजिप्त व बार्बरी वगैरे दक्षिणेकडील प्रांतांत देशांतर करितात. तथापि ब्रिटन येथेंहि त्यासमयीं बरेच पक्षी असतात. आइस्लंड, ग्रीनलंड व आर्टिक प्रदेश येथें सुद्धा भटकणार्‍या टिटव्या आढळतात. टिटवीच्या पंखाचा रंग व तिचे उड्डाण यामुळें हा पक्षी प्रसिद्ध असून टिटवीसारखे इतर प्राणी लुप्तप्राय झाले असले तरी टिटवी अजूनहि सर्वत्र आढळते. टिटवींच्या सोनेरी अंड्यास बाजारांत चांगला भाव येतो व पारध केलेल्या टिटव्याहि चांगल्या किंमतीस विकल्या जातात. टिटवी सर्वत्र टिकाव धरून राहिली याचें एक कारण असें आहे कीं तिच्यांत कोणत्याहि स्थळाशीं व परिस्थितीशीं जुळतें घेण्याचा एक गुण असतो. खडकाळ जमीन असो किंवा वनश्रीनें नटलेलीं कुरणें असोत, नांगरलेलें रान असो किंवा दलदलीची जागा असो, सर्वच स्थळें टिटवीला समसमान वाटतात. 'पिट्टी टू डू इट' अथवा ''पीव्हिट'' असा कर्कश आवाज ज्या ठिकाणाहून येईल तेथेंच जवळपास तिचे घरटे आहे असे समजावे. परंतु टिटवीचें घरटें व अंडीं सांपडणें बरेंच कठिण असतें. पूर्ण वाढ झालेल्या टिटवीचा रंग दुरून पांढरा व काळा दिसतो. परंतु जवळ जाऊन पाहणारांस त्यांत हिरव्या व करड्या रंगांचें मिश्रण दिसून येतें. टिटवीच्या तुर्‍यांत सहा पंख असतात. अनेक देशांतील खुल्या मैदानांत असणारी आणि संचार, उड्डाण व आवाज यामुळें आपलें अस्तित्व तेव्हांच दुसर्‍यास कळविणारी ही पक्ष्याची जात महशूर आहे. टिटवीच्या हवेंतील संचाराचा वेग फार जलद असतो. टिटवीचें निवासस्थान नदीं-नाल्याशेजारीं, शेतांत किंवा अरण्यांत असतें. उत्तरअमेरिकेंत हा पक्षी आढळत नाहीं; परंतु आफ्रिकेंत टिटव्यांची मोठी संख्या आहे. यूरोपांत टिटवीच्या तीन जाती आहेत परंतु त्यांपैकीं, दोन जाती आफ्रिका व आशिया येथूनच तिकडे गेलेल्या आहेत असें म्हणतात. टिटवी घरांवर बसून ओरडल्यास किंवा तिचा शब्द ऐकूं आल्यास हिंदु लोक अभुभ समजतात.