विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
टांगानिका प्रदेश - महायुद्धांत जर्मन पूर्व-आफ्रिकेचा जो भाग ग्रेटब्रिटननें आपल्या ताब्यांत घेतला त्याचें नांव टांगानिका असें १९२० सालीं ठेवण्यांत आलें. याचें क्षेत्रफळ १९२१ मध्यें ३८५००० चौ. मै. व लोकसंख्या ५० लक्ष होती. या प्रदेशांत दरएस सालेम, टांगा व टबोरी हीं तीन मोठीं शहरें आहेत. इ. स. १९१६-१९१७ मध्यें जर्मन पूर्वआफ्रिका जर्मनीपासून जिंकून घेतला. नंतर ब्रिटिश व बेलजम सरकारांनीं आपापल्या जिंकलेल्या मुलुखांत, राज्यव्यवस्था ठेवण्यास सुरवात केली. १९१८ च्या मार्च महिन्यांत, बेल्जमच्या ताब्यांत असतां टबोरचा मुलूख ब्रिटिशांच्या ताब्यांत आला. १९१९ च्या मार्चमध्यें जें सुप्रसिद्ध कौन्सील भरलें त्यामध्यें जर्मन ईस्टआफ्रिका ग्रेटब्रिटनला देण्यांत आली. पण बेल्जम सरकारनें, उरुंडी, रुअंडा, व उजीजी प्रांतांतला कांहीं भाग आपल्याकडे ठेवण्याचें ठरविलें. १९१६ सालीं इंग्लड व बेल्जम यांमध्यें करार होऊन उजीजी प्रांत हा ग्रेटब्रिटनला मिळाला. १९२१ च्या तहानें, किगोमा ते दरएससालेममधील रेल्वेमधून माल मोफत नेण्याची सवलत बेल्जमला मिळाली.
१९२० साली टांगानिका प्रदेशावर सरकार स्थापन करण्यांत येऊन, सर होरेस बॅट हा सुभेदारा व सर विल्यम कार्टर हा मुख्य न्यायाधीश झाला. राष्ट्रसंघाच्या बैठकींत या विषयीसंबंधी चर्चा होऊन टांगानिका प्रदेशांत सर्व राष्ट्रांतील लोकांनां, वस्तीला व व्यापाराला मुभा असावी असें ठरलें. यामुळें या प्रदेशांतील ब्रिटिश इंडियन लोकांचा दर्जा काय असावा हा पश्न उपस्थित झाला. राष्ट्रसंघाच्या ठरावानें, ब्रिटिश इंडियन लोकानां इतर राष्ट्रांतील लोकांशीं समान असा दर्जा मिळाला पाहिजे होता. महायुद्ध चालूं असतांना हा प्रदेश खास ब्रिटिश इंडियन प्रजेकरितांच राखून ठेवावा अशी एक सूचना पुढें मांडण्यांत आलेलीहि होती; पण ती मान्य होणें शक्यच नव्हतें. पण १९१९ सालीं आगष्ट महिन्यांत ब्रिटिश वसाहतमंत्र्यांनीं, इंडियन लोकांनां स्वतंत्र प्रदेश राखून ठेवण्याची आवश्यकता आहे किंवा नाहीं यासंबंधीं चौकशी करण्याकरतां सर बेंजामिन रॉबर्टसन यास पाठविलें. हिंदुस्थान सरकारनें एक खलिता पाठवून टांगानिका प्रदेशाकडे हिंदी शेतकरी जाणें शक्य नाहीं असें उत्तर दिलें. पण टांगानिकामध्यें जे ब्रिटिश इंडियन प्रजाजन आहेत त्यांनां मात्र इतर राष्ट्रांतील लोकांच्या इतका समान दर्जा मिळणें जरूर आहे असें कळविलें. १९२१ सालीं या प्रदेशांत १५०० हिंदी लोक होते व त्यांनीं किरकोळ व्यापार आपल्या ताब्यांत ठेवला होता. १९२० सालीं टांगानिकामध्यें, जमीन व खनि यांच्या व्यवस्थेसाठीं एक खातें उघडण्यांत आलें. टांगानिकामध्यें अभ्रक (मायका) एवढीच धातु मुबलक असून ती उलगुरू पर्वतांत सांपडते. १९१७ ते १९२० च्या दरम्यान ४०००० पौंड किंमतीच्या अभ्रकाची निर्गत झाली. १९१९-२० च्या दरम्यान, या प्रदेशांत ११५८००० पौंडांच्या मालाची आयात व १३३०००० पौंडाच्या मालाची निर्गत झाली. कापड, तांदूळ व इतर धान्यें हे आयात मालांतील प्रमुख जिन्नस असून, सिसल, कापूस, कातडीं, काफी, तूप इत्यादि निर्गत मालांतील प्रमुख जिन्नस होत.
या प्रदेशाची नवीन शासनघटना करण्याच्या कामीं सरहोरेस बॅट याला फार परिश्रम करावे लागले. त्याने प्रथमत: गुलामगिरीची पद्धत मोडून टाकली. जर्मनीच्या सत्तोपूर्वींची जी जुनी जातवार संघटना अस्तित्वांत होती ती पुन्हां प्रस्थापित करण्यांत आली. इंडियन पीनल कोड येथें सुरू करण्यांत आलें. १९२१ सालीं या प्रदेशाचें उत्पन्न १५९६००० पौंड व खर्च १३६५००० पौंड झाला. येथें १९२१ सालीं किंग्स आफ्रिकन रायफलच्या तीन पलटणी होत्या, व त्याच्यावर २५०००० पौंड खर्च करण्यात आले. शहरांनीं जीं जर्मन नांवें देण्यांत आलीं होतीं त्यांच्या बदली देशी नांवें देण्यांत आलीं.
[संदर्भग्रंथ- रिपोर्ट ऑन टांगानिका टेरिटरी (१९२१); जी. जी. ब्राउन. दि साउथ अँड ईस्ट आफ्रिकन ईयर बुक अँड गाइड; जोएल्सन-दि टांगानिका टेरिटरी (१९२१)]