विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
टॅसिटस कॉर्नेलिअस (५५ - १२०) - या रोमन इतिहासकाराचा सर्वकालीन ग्रंथकारांत वर नंबर लागतो. त्याचें पूर्ण चरित्र उपलब्ध नसून त्याच्या ग्रंथांवरून व लहान प्लीनीनें त्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रांवरून याची थोडीबहुत माहिती मिळते. क्लॉडिअसच्या कारकीर्दीच्या अखेरीस हा जन्मला असावा. प्रीटर व कॉन्सल अशा अधिकारावर तो असून रोमन वकीलहि होता. टॅसिटस हा जूलियस अॅग्रिकोलाचा जावई होता; या मोठ्या घराण्याशीं त्याचा संबंध आल्यामुळें तो लवकर प्रसिद्धीस आला. इ. स. ८९ च्या सुमारास त्यानें रोम सोडलें. तो वर्षें बाहेर होता. या कालांतच त्यानें जर्मनी देश व तेथील लोक यांसंबंधीं माहिती मिळविली असावी. नर्व्हा व इतर राजे यांच्याहि कारकीर्दींत त्याची बरीच प्रसिद्धि झाली.
इ. सनाच्या ३ र्या शतकांत टॅसिटस बादशहानें आपण टॅसिटस कॉर्नेलियस याचे वशंज आहों असें सांगितलें. यावरून आपणांस त्याची माहिती कळते. प्लीनीचें आपल्या मित्राच्या योग्यतेविषयीं फारच उच्च मत होतें. 'दि डायलॉग ऑन ओरेटर्स’ (वक्त्यांविषयीं संभाषण), ‘दि लाइफ ऑफ अॅग्रिकोला' (अॅग्रिकोलाचें चरित्र), 'दि जर्मनी', 'दि हिस्टरीज' व 'दि अॅनल्स' हीं त्यांचीं मुख्य पुस्तकें आहेत. टॅसिटसचीं हस्तलिखितें 'पहिलें' व 'दुसरें' मेडिसीन या नांवानें प्रसिद्ध आहेत.
इतिहास लिहिण्याकरितां अवश्य असलेलें साहित्य टॅसिटस जवळ पुष्कळ होतें आणि त्याचा त्यानें योग्य उपयोग करून घेतला. त्यानें पहिल्या शतकांतील राज्याचें खरेंखुरें उठावदार चित्र रेखाटलें आहे. त्या कालांत अलंकारिक भाषेचा बराच उपयोग होत असल्यामुळें राज्यकर्त्याचा वाईटपणा दाखविण्यांत थोडीशी अतिशयोक्ति झाली असावी. परंतु त्यानें आपला इतिहास उच्च हेतूंनीं लिहिला यांत संशय नाहीं. तत्कालीन सामाजिक अधोगति त्याला कळून चुकली होती व या अधोगतीचें कारण बादशाही सत्ता होय असें त्याचें मत होतें; तरी पण त्याच्या राजकीय ध्येयासंबंधीं निश्चित मत देणें कठिण आहे. त्याचा राजकारणापेक्षां नीतिधर्माच्या बाबतींत अधिक संबंध येतो. त्याच्या स्वातंत्र्याच्या अगर लोकसत्तेच्या कल्पना कितीहि उच्च असल्या तरी व्यावहारिकदृष्ट्या साम्राज्य आवश्यक आहे व त्यापासून प्रांताचा फायदा होतो असें त्याचें मत होतें. वास्तविक पहातां त्याला राजकारणपटु म्हणण्यापेक्षां नीतिशास्त्रज्ञ म्हणणें अधिक बरें.
आपल्या धार्मिक मतासंबंधीं तो काहींच निश्चित सांगत नसे. त्याचे ज्योतिष, शकुन यांसंबंधीं कांहीं दृढ समज होते. एकंदरींत प्रत्येक मनुष्याचें आयुष्य त्याच्या जन्मापासून निश्चित झालें असतें, असें त्याचें मत होतें. त्याची भाषा अभ्यासी वाचकावर छाप पाडणारी असून आटपशीर आहे. टॅसिटस हा लोकप्रिय लेखक नसून त्याचे ग्रंथ समजण्या करितां ते वारंवार वाचावे लागतात. कारण कित्येक महत्त्वाचे मुद्दे वरवर वाचणाराच्या लक्षांत लवकर येत नाहींत.