प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

झांशीची राणी, लक्ष्मीबाई - नेवाळकरांचे मूळ पुरुष रघुनाथराव हे कोंकणांत कोट (राजापुर तालुका) या गांवचे राहणारे, अष्टाधिकारी वृत्तिवंत होते. पेशवाईच्या आरंभास ते खानदेशांत बहादुरपूर (साक्री तालुका) येथें येऊन राहिले. त्यांस खंडेराव व दामोदर अशीं दोन मुलें होती. दामोदरास रघुनाथ, सदाशिव आणि इरि अशीं तीन मुलें झालीं. ह्यांनीं पेशवे व मल्हारराव होळकर यांच्या पदरीं राहून, खानदेशांतील चोरवड (चोपडे तालुका) परगणा व गुजराथेंतील अहमदाबाद प्रांतांतील कांहीं परगण्यांच्या मामलती करून लौकिक मिळविला; व होळकरांच्या फौजेंत सरदारीहि केली. यावेळीं त्यांस पारोळे (पूर्व खानदेशांतील) गांवची जहागीर मिळाली. रघुनाथपंत लढाईं मारला गेला. हरिपंताचा वडील मुलगा लक्ष्मण हा पारोळ्यास असे व खुद्द हरिपंत पेशव्यांच्या फौजेंत आपला दुसरा मुलगा रघुनाथ यासह सरदारी करीत. रधुनाथावर पेशव्यांची मर्जी असून, त्यांनीं त्याला झांशीकडील बंडाळी मोडण्यासाठीं वर सांगितल्याप्रमाणें तिकडील सुभेदारी दिली (१७७०). रघुनाथरावांनीं गोसाव्यांची फौज पदरीं बाळगून बुंदेलखंडांतील सर्व (३०-३२) संस्थानिकांस कह्यांत आणलें. बुंदेलखंडांतून सहा लक्ष रुपये खंडणी दरसाल रघुनाथराव वसूल करी. या सर्व कामांत त्याचे भाऊ लक्ष्मण राव व शिवराव यांचेहि मधून मधून साहाय्य मिळें. रघुनाथरावानें जलसमाधि घेतल्यावर शिवराव हा झांशीचा सुभेदार झाला (१७९५). याच्या वेळेस पुण्यास रावबाजीची कारकीर्द सुरू होती. इंग्रजांनीं या सुमारास बुंदेलखंडावर चाल केली असतां, सर्व बुंदेल्या राजांनीं शिवरावाच्या पाठिंब्यामुळें त्याचा पराभव केला (शिवरावहि यावेळीं पेशव्यांचा नोकर न राहतां साधारपणें स्वतंत्रच बनला होता), त्यामुळें इंग्रजांनीं (१८ नोव्हेंबर १८०३त) त्याच्याशीं बजीबउल् अर्ज नांवाचा दोस्तीचा तह केला. व शिवरावाच्या साहाय्यानें इंग्रजांनीं बुंदेलखंडांत आपलें वर्चस्व स्थापिलें. पुढें (६ फेब्रुवारी १८०४) इंग्रजांनीं शिवरावभाऊशीं ९ कलमांचा पुन्हां मित्रत्वाचा तह केला. भाऊनें इंग्रजांस अनेकवार मदत केल्याबद्दलचे अनेक उल्लेख गव्हर्नर जनरल वेलस्ली याच्या डिस्पॅचेसमध्यें आहेत. याप्रमाणें १८ वर्षें कारभार करून, आपले नातु रामचंद्रराव यांजकडे कारभार सोंपवून भाऊनें रघुनाथरावाप्रमाणें ब्रह्मावर्त येथें जलसमाधि घेतली (१८१४). भाऊंना कृष्णाजी हा भाऊंच्या हयातींतच वारला (१८११). त्यामुळें त्याचा मुलगा रामचंद्रराव हा भाऊंच्या पश्चात गादीवर बसला. याच सुमारास (ता. १३ जून सन १८१७) पेशवे व इंग्रज यांच्यातींल तहान्वयें बुंदेलखंडावरचें स्वामित्व इंग्रजांनां मिळालें. त्यामुळें (१७ नोव्हेंबर १८१७) रामचंद्रराव व इंग्रज यांच्यांत पिप्री येथें तह झाला; त्यांत दुसर्‍या कलमांत इंग्रजांनीं झांशी संस्थान रामचंद्ररावाकडे पुढें वंशपरंपरा चालिवण्याचें कबूल केलें. पुढें (१८२५) रामचंद्ररावानें पेंढार्‍यांच्या बंडांत व काल्पी येथें नानापंडिताच्या दंग्यांत, इंग्रजांच्या विनंतीवरून त्यांनां साहाय्य केलें; त्यामुळें (डिसेंबर १८३२) लार्ड बेटिंकनें झांशीस दरबार भरवून कृतज्ञतेनें रामचंद्ररावानां महाराजधिराज व फिदवी बादशहा जानुजा इंग्लिस्तान ही पदवी व छत्रचामरें आणि नगारा इत्यादि चिन्हें अर्पण केलीं. रामचंद्ररावानीं २५ वर्षें कारभार केला. तो निपुत्रिक वारल्यामुळें (१८३५) इंग्रजांनीं रामचंद्ररावाचा चुलता रघुनाथराव यास गादीवर बसविलें. हा फार दुर्व्यसनी निघाला. त्यामुळें संस्थानास कर्ज झालें व उत्पन्न- वर येऊन सर्वत्र अंदाधुंदी माजली. त्यामुळें इंग्रजांनीं सन १८३० मध्यें संस्थानचा कारभार आपल्या हातीं घेतला. रघुनाथरराव सन १८३८ त वारल्यावर त्याचा भाऊ गंगाधरराव गादीवर बसला. मात्र (१८४२पर्यंत) संस्थानास झालेलें कर्ज फिटेतोंपर्यंत संस्थानचा कारभार इंग्रजांकडेच होता. पुढें २७ डिसेंबर स. १८४२ रोजी (इंग्रजांनीं) गंगाधररावाशीं तैनाती फौजेच्या खर्चाकरितां २२७४५८ रुपयांचा मुलुख स्वतःकडे घेऊन तह केला व झांशी संस्थानची मुखत्यारी त्यास दिली. हेच गंगाधरराव झांशीच्या राणीचे पति होत.

वांई येथें कृष्णराव तांबे नांवाचा एक कर्‍हाडा ब्राह्मण राहत असे, त्याचा मुलगा बळवंतराव. त्यास पेशव्याच्या हुजुरातींत सरदारी होती. त्याला मोरोपंत व सदाशिव अशीं दोन मुलें होतीं; मोरोपंतावर धाकटे चिमाजीअप्पा यांची मर्जी असे. पेशवाई नष्ट झाल्यावर चिमाजी अप्पा हे काशीस गेले असतां त्यांच्याबरोबरच मोरोपंत तांबे हेहि गेले. तेथें ते त्यांचे दिवाण होते. त्यांच्या स्त्रीचें नांव भागीरथी. त्यांनां कार्तिक वद्य १४ संवत १८९१ (१९ नोव्हेंबर १८३५) रोजी काशी येथें एक मुलगी झाली; तिचें नांव मनुबाई असें ठेविलें. ती फार चपल व तेजस्वी असल्यामुळें तिला छबेली असें कौतुकानें म्हणत. तीन चार वर्षांनीं तिची आई वारली, व त्याच सुमारास चिमाजीअप्पाहि वारल्यामुळें मोरपंत हे ब्रह्मावर्तास श्री. बाजीरावांच्या पदरीं जाऊन राहिले. तेथें नानासाहेब, रावसाहेब व बाळासाहेब पेशवे व मनुबाई यांचा बंधुभगिनीचा स्नेह जमला. या मुलांबोरबर मनुबाईनेंहि लेखनवाचन व भालाबोथाटी, दांडपट्टा वगैरे मुर्दमकीचें शिक्षण मिळविलें; घोड्यावर बसण्यांतहि ती पटाईत होती. मुलींच्या खेळामध्यें ती राणी होई. भाऊबीजेच्या दिवशीं नानासाहेबादि त्रिवर्ग पेशवे मनुबाईस ओवाळणी घालीत.

या सुमारास गंगाधरराव यांचे पहिलें कुटुंब रमाबाई ह्या वारल्या. तेव्हां मुलींचा शोध करून मनुबाईची माहिती मिळाल्यावर, गंगाधररावांनी तिला मागणी घातली, व शके १७६४ च्या वैशाखांत झांशी येथें या उभयतांचें लग्न झालें. लग्नांत श्री बाजीरावांनी वधूपक्ष स्वीकारून बरीच मदत केली. मनुबाईच्या सासरचें नांव लक्ष्मीबाई असें ठेवण्यांत आलें व मोरोपंतास झांशी दरबारांत सालीना तीनशें रुपयांची सरदारी देण्यांत आली.

गंगाधररावांनीं सर्व लहानमोठ्या कामांवर योग्य माणसें नेमून राज्यव्यवस्था उत्तम ठेविली आणि (ठाकूर व बुंदेले) बंडखोरांचा चांगला बंदोबस्त करून रयतेस सुख दिलें. यांच्या कारकीर्दींत संस्थानांत शिल्लकहि पुष्कळ पडली त्यांच्या जवळ ५ हजार घोडदळ व २ हजार गोल पोलीस (पायदळ) असून चार तोफखाने होते. गंगाधरराव दयाळु पण अतिशय कडक स्वभावाचे व शिस्तीचे होते. बुंदेले राजांवर त्यांचें फार वजन असे व ते यानां काका म्हणत. एकदां दसरा रविवारीं पडला, तेव्हां शिलंगणास झांशीचा इंग्रज रेसिडेंट येईना; त्यावर गंगाधररावानीं त्यास सणसणीत निरोप पाठविला कीं, “माझे मुलाजमकी तनखेबद्दल मुलूख दिला, तेव्हां ठरावाप्रमाणें फौजेसह यावें, नाहीं पेक्षां आजचे मुहुर्तावर मुलुखावर जप्ती पाठवितों,” तेव्हां रेसिडेंट गुपचुप येऊन स्वरींत सामील झाला. गंगाधरराव हे काशीयात्रेस गेले होते (१८५०). त्यावेळीं येथील इंग्रज अधिकारी त्यांस सामोरा आला नाहीं, त्यावरून त्यांनीं कलकत्त्यास लिहून त्याला माफी मागावयास व नौकरीचा राजीनामा द्यावयास लाविलें. या यात्रेंत बरोबर लक्ष्मीबाई होत्या. थोड्या दिवसांनीं (१८५१) राणीला पुत्र झाला; परंतु तो तीन महिन्यांनीं मृत्यु पावला. त्यामुळें गंगाधररावास धक्का बसून त्यांची प्रकृति खालावली. अनेक औषधोपचार केले, राणीनें उपोषणेंहि केलीं; परंतु उपयोग होईना. अखेर प्रकृति फार ढांसळल्यानें गंगाधररावांनीं व राणीनें नेवाळकरांच्या घराण्यांतील एक मुलगा (आनंदराव) दत्तक घेण्याचें ठरविलें व बुंदेलखंडाचा नायब पोलिटिकल एजंट एलीस व लष्करी अधिकारी मार्टिन यांच्या देखत यथाशास्त्र दत्तविधान करून मुलाचें नांव दामोदरराव ठेविलें (१८५३ नोव्हेंबर). या प्रसंगीं गंगाधररावांनीं इंग्रजास एक खलिता लिहिला, व त्यांत इंग्रजांशीं झालेल्या (१८१७) सालच्या) तहांतील दुसर्‍या कलमाप्राणें आपण घेतलेल्या दत्तकास कबुली देण्यास कळविलें. या प्रसंगी एलीस व मार्टिन हे हजर होते व त्यांनीं आपण या कामीं खटपट करूं असें कबूल केलें. वरीलप्रमाणेंच दुसरा एक खलिता बुंदेलखंडाचा पो. एंजट मालकम याच्याकडे पाठविला; एलीस यानेंहि मालकम यांस एकंदर हकीकतीचें पत्र लिहिलें. त्यानंतर गंगाधरराव हे २१ नोव्हेंबर रोजी वारले.

हें समजल्यावर मालकमनें गव्हर्नर जनरलास दत्तक बाबतींत एक पत्र लिहिलें (२५ नोव्हेंबर); त्यांत त्यानें ‘इंग्रज सरकारनें दत्तक कबूल करूं नये’ असा स्पष्ट मजकूर लिहिला. मात्र राणीच्या शानशौकतीकरितां दरमहा पांच हजारांची नेमणूक करून सर्व संस्थान लवकर खालसा करावें असा सल्ला दिला. याप्रमाणें पत्र लिहून मलकमनें झांशीस ८।१० पलटणी बंदोबस्तासाठीं आणून ठेवल्याहि. यावेळीं सातारा, नागपूर, तंजावर हीं संस्थानें बिनवारशीं म्हणून खालसा करणारा डलहौसी हा गर्व्हनरजनरल होता. त्यानें ही संधि वाया जाऊं दिली नाहीं व वंशपरंपरागत राज्य चालवूं हें तहांतील कलम फेंटाळून लाविलें. हें कलम पुढीलप्रमाणें होतें. “इंग्रजसरकारचा अंमल बुंदेलखंडांत सुरू झाला त्यावेळीं कै. शिवरावभाऊ यांच्या ताब्यांत असलेल्या व सध्यां झांशीसरकारच्या ताब्यांत असेलल्या... सर्व प्रांतांचे राव रामचंद्र यांस, त्यांच्या वारसदारांस व त्या वारसदारांच्या जागीं संस्थापित होणारांस, इंग्रजसरकार वंश परंपरागत मालक नेमून, ते त्या प्रांतांचे संस्थानिक आहेत असें कबू करीत आहे.” यावेळीं राणीनेंहि शिवरावभाऊंनीं इंग्रजांवर केलेल्या उपकाराची आठवण देऊन त्यांनीं दत्तक मंजूर करावा म्हणून (व त्याच वेळीं दतियाचा राजा, ओरछाचा राजा व जालवणाचा जहागीरदार या तिघांनीं घेतलेले दत्तक इंग्रजांनीं मान्य केल्याची आठवण देऊन) एक खलिता डलहौसी यास पाठविला. परंतु त्याच्याहि कांहीं उपयोग झाला नाहीं. एलिस यानें सुद्धां दत्तक कबूल करावा म्हणून डलहौसीस पत्र लिहिलें होतें; परंतु मालकमनें तें आपल्यापाशींच दडपून ठेविलें. शेवटीं डलहौसीनें पुढील ठराव केला- “इंग्रजसरकारच्या संमतीशिवाय ज्यांनां दत्तक घेतां येत नाहीं, असल्या मांडलिक संस्थानिकांनां दत्तकाची परवानगी देण्यास अथवा दत्तकास मान्यता देण्यास साक्षात्  आम्हीं कोणत्याहि वचनानें बांधलेलों नाहीं आणि त्यांच्या जहागिरी औरस संततीच्या अभावीं परत घेण्याचा आम्हांस हक्क आहे. झांशी संस्थान स्वतंत्र नसून आमच मांडलिक आहे व त्या संस्थानास आमच्या परवानगीशिवाय दत्तक घेतां येत नसल्यामुळें आणि हल्लीं तेथें औरस संतति नसल्यानें सार्वभौम या नात्यानें आम्ही तें परत घेतो.” याप्रमाणें झांशी संस्थान डलहौसीनें पूर्वींच्या वचनास हरताळ फांसून कुटिल नीतीनें गिळंकृत केलें (२७ फेब्रुवारी १८५४).

वरील डलहौसीचा जाहीरनामा ज्यावेळीं एलिसनें राणीला सांगितला, त्यावेळीं त्यानां अत्यंत दुःख होऊन त्या म्हणाल्या कीं, ‘मेरा झांशी देएंगा नहीं’. त्यांच्या ताब्यांत राजवाडा त्यांना ५ हजारांचें पेनशन दिलें. परंतु त्यांनीं शेवटपर्यंत पेनशन घेतलें नाहीं. खाजगी शिल्लक आणि जडजवाहीर यांच्यावर त्यांचा हक्क मुळींच नसून तें सर्व दामोदररावांचें आहे असें डलहौसीनें ठरविलें ! डलहौसी म्हणें कीं कायद्याप्रमाणें दामोदररावाचें दत्तविधान जरी संस्थान चालविण्यास योग्य होत नाहीं तरी खाजगी मिळकतीवर त्यांचा हक्क चालण्यास तें मान्य आहे. एका बाबतींत दत्तक मान्य व दुसरींत मात्र अमान्य असा हा आपमतलबी न्याय होता अखेर एलिसनें खजिन्यांतील शिल्लक व किल्ला ताब्यांत घेऊन राणीला शहरांतील राजवाड्यांत राहण्यास सांगितलें. इंग्रजानें किल्ल्यांत आपल्या पलटणी आणून ठेविल्या व झांशीकरांच्या सैन्याला कामावरून कमी केलें. राणीनें विलायतेंत कोर्ट ऑफ डायरेक्टर्सकडे अपील केलें व त्यांत डलहौसीचें सर्व म्हणणें सप्रमाण खोडून काढलें, परंतु त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. उलट कोर्ट ऑफ डायरेक्टर्सनें डलहौसीच्या निकालास पाठिंबा दिला व झांशीस इंग्रजी अंमल सुरू झाला. इंग्रजांच्या अंमलांत झांशी संस्थानची स्थिति स्पंजानें पाणी शोषून घेतल्यानंतर राहिलेल्या कोरड्या भांड्याप्रमाणें झाली होती, असें जॉन सलिव्हन म्हणतो. यानंतर राणीनें आपलें लक्ष्य धार्मिक कृत्यांत घातलें. ती दररोज पार्थिवपूजा करीत असे. राणीचें वर्तन अत्यंत पूज्य व सच्छील असल्याचें खुद्द मालकम यांनेंहि म्हटलें आहे. सन. १८५५ त तिनें दामोदररावाची मुंज करण्याचें ठरविलें व त्याबद्दल खर्चासाठीं म्हणून इंग्रजांनीं आपल्या ताब्यांत घेतलेल्या खाजगी सहा लक्षांतून एक लाखाची मागणी केली. तेव्हां त्या रकमेवर दामोदररावाचा हक्क आहे व तो वयांत आल्यावर त्यानें ती रक्कम मागितली तर तुम्हीं ती परत द्याल अशाबद्दल जामीन ह्या असें डलहौसीनें बाईला कळविलें ! याप्रमाणें स्वतःच्या पैशाला जामीन लागूं लागला. अखेरीस जामीन देऊन रावाची मुंज केली.

डलहौसीच्या अनेक कृत्यांमुळें १८५७ साल उजाडलें. प्रथम बर्‍हामपूरच्या १९ व्या काळ्या पलटणीनें युद्धाचा झेंडा उभारला. नंतर शिपायांनीं मिरत, बरेली, कानपूर, लखनौ, दिल्ली वगैरे ठिकाणीं युद्धास सुरुवात करून तीं तीं ठिकाणें तांब्यांत घेतलीं. या लोकांस अयोध्येचा नबाब, दिल्लीचा बादशहा व दुसरे नानासाहेब पेशवे ही मंडळी (इंग्रजांनीं त्यांच्यावर केलेल्या अन्यायांमुळें) मिलाली व त्यांनीं त्यांचा पुढारीपणा घेतला.

झांशी येथील सैन्यानें ता. १ जून रोजीं दंगलीस प्रारंभ केला. स्टारफोर्ट व तेथील दारूगोळा वगैरे सर्व सामुग्री शिपायांनीं ताब्यांत घेतली व तेथील पलटणीचा मुख्य अधिकारी डनलॉप याला ठार केलें. तेव्हां शिल्लक राहिलेली यूरोपियन मंडळी किल्ल्यांत पळून जाऊन लपून बसली, परंतु शिपायांनीं किल्ल्यावर हल्ले चढवून तो काबीज केला (७ जून) व आंतील लोकांची कत्तल केली.

या गोष्टींत राणीचा कांहीहि हात नव्हता. उलट तिनें इंग्रजांनां मदतच केली होती. सैन्यांत गडबड झालीं, तेव्हां गार्डन वगैरे इंग्रज अधिकारी राणीकडे गेले आणि आपलें रक्षण करणयाबद्दल त्यांनीं तिची प्रार्थना केली, व पु्न्हां इंग्रजी अंमल होईपर्यंत सर्व झांशी संस्थान आपल्या ताब्यांत घ्यावें असें सांगितलें. तेव्हां राणींनें सांगितलें कीं, तुम्हांस आश्रय दिल्यास पलटणवाले आम्हांस लुटतील व ठारहि करतील. तसेंच पूर्वीं स्वस्थता असतां व मी राज्य मागत असतां दिलें नाहीं व आतां बंडांत मला देता काय? तरी पण मी तुमचें रक्षण करतें असें म्हणून गोर्‍या बायकामुलांनां राणीनें खास आपल्या राजवाड्यांत आणून ठेवलें होतें. परंतु पुढे गोर्‍या पुरुषांनींच त्यांनां किल्ल्यांत नेऊन ठेविलें. राणीनें किल्ल्यांतील या गोर्‍यांनां तीनचार दिवस चोरून गव्हाच्या रोट्या पाठवून त्यांची सर्व प्रकारची काळजी सुद्धां घेतली व इंग्रजांवर उपकार केले. एवढेंच नव्हें तर पुढें कत्तर झालेल्या गोर्‍यांनां मूठमाती देववून, वांचलेल्यांचा योग्य परामर्श घेतला. या वांचलेल्यापैकीं मार्टिन नांवाच्या एका गोर्‍यांनें स्पष्ट म्हटलें आहे कीं, राणीचा वरील कत्तलींत मुळींच संबंध नसून, उलट तिनें आमच्या रक्षणास १०० बरकंदाज पाठविले व दोन दिवस रसद पुरविली; तिनें आम्हांस दतियाकडे पळून जाण्याची सूचना करून मदत करण्याचेंहि ठरविलें, परंतु आम्हीच हट्टानें किल्ल्यांत राहिलों व शेंवटीं आमच्याच सैन्यानें (राणीच्या नव्हें) आमची कत्तल केली. काये हा इतिहासकारहि असेंच म्हणतो.

कत्तलीनंतर पलटणवाले राणीकडे आले व त्यांनीं तीन लाख रुपये खर्चाकरितां मागितले. निरुपायानें राणीनें एक लक्ष रक्कम दिली (नाहींतर राजवाडा तोफेंनें उडवून देण्याचें पलटणवाल्यांनी ठरविलें होतें) व मग ते लोक राणीची द्वाही शहरांत फिरवून दिल्लीकडे गेले. तरीहि राणीनें इंग्रजांनं मदत केली; तिनें सागरच्या छावणीवाल्यांस निरोप कळवून सावध केलें. त्यामुळें तेथील पलटणीस बिथरण्यास सवड मिळाली नाहीं. याप्रमाणेंच ठिकठिकाणच्या इंग्रजांनां राणीनें पत्रानीं सावध केल्याचें काये हाच कबूल करतो. यावेळीं मात्र वर सांगितल्याप्रमाणें इंग्रजांनीं झांशीच्या राज्यकारभार राणीकडे पुन्हां सोंपविला. परंतु राणीच्या दरबारीं या सुमारास जुने व अनुभविक मुत्सद्दी कोणी नव्हतें; बहुतेक अधिकारी कमी दर्जाचे होते. तरी पण सर्व कारभाराची माहिती राणी नियमितपणें इंग्रज अधिकार्‍यांकडे पाठवीत होती, असें पिकने व मार्टिन सांगतात.

या संधीचा फायदा घेऊन राणीचा एक दूरचा नातलग सदाशिव नारायण यानें करेराचा किल्ला बळकावून आपल्यास झांशीचा महाराज म्हणून जाहीर केलें. परंतु राणीनें त्याच्यावर सैन्य पाठवून त्याला पिटाळून लाविलें. पुन्हां त्यानें उचल केल्यावरून त्याचा पराभव करून त्याला झांशीच्या किल्ल्यांत कैदेंत ठेविलें. इतक्यांत ओरच्छाचा दिवाण नथेखां हा झांशीवर वीस हजार सैन्यास चालून आला. त्यानें राणीला ओरर्च्छाचे मांडलिक होण्यास सांगितलें. परंतु तें तिनें नाकारून युद्धाची तयारी केली. सर्व जुन्या सरदारांनां जमवून किल्ल्यांत दारूगोळ्याचे कारखाने काढून किल्ला सर्व तर्‍हेनें जय्यत तयार केली. नथेखानें किल्ल्यावर हल्ले केले. प्रथम त्याच्या जयाचा रंग दिसत होता; परंतु राणीनें जातीनें युद्धव्यवस्था हातीं घेऊन आपल्या थोड्या लोकांनिशींच अखेर त्याचा पराभव केला व नथेखांकडून युद्धखर्च घेऊन त्याला सोडून दिलें. याप्रमाणें इंग्रजांसाठी म्हणून बाईनें या दोन बंडाळ्या मोडल्या असतां उलट त्या लोकांनींच आमची बाजू घेऊन राणीशीं लढाई दिली असें इंग्रज लोक म्हणतात !

राणीसाहेब तेजस्वी, सुशील, गुणिजनांच्या पारखी, दयाशील, परोपकारी, उदार व शूर होत्या. सुमारें नऊ दहा महिने झांशी त्यांच्या ताब्यांत असतां त्यानीं जो राज्य कारभार केला त्यांत त्यांचें प्रजावात्सल्य, दातृत्व, न्यायचातुर्य व कार्यदक्षता दिसून आली. त्यांची स्मरणशक्ति इतकी होती कीं, दीडशें मुजरेकर्‍यांपैकीं एखादा एखाद्या दिवशीं गैरहजर असल्यास त्याला त्याचें कारण दुसरे दिवशीं विचारण्यांत येई. ग्रंथसंग्रहाचाहि त्यांनां नाद होता. त्यांचा रोजचा कार्यक्रम त्यांनां प्रत्यक्ष पाहिलेल्या एका (वरसईकर गोडशे नांवाच्या) माणसानें दिला आहे. त्यावरून त्यांची योग्यतां दिसून येते. त्या न्यायनिष्ठुर असल्याने कधीं कधीं अपराध्यास छडीनें स्वतः शिक्षा करीत. कचेरींत जाण्याच्या वेळीं त्यांचा पोषाख, पायांत पायजमा, अंगांत जांभळ्या रंगाचा आंगरखा, डोकीस टोपी व तिच्यावरून बांधलेली बत्ती, कमरेस जरी दुपेटा व त्यास लटकवेलली रत्‍नखचित तरवार व दोन उत्तम दमास्कसचीं पिस्तुलें असा मर्दानी असे. कधीं जनानीहि पोषाख असे. पतिनिधनानंतर अंगठी वगैरे किरकोळ वस्तूंशिवाय त्यांनीं अंगावर अलंकार घातले नाहींत. त्यांचा पोषाख बहुतेक पांढरा असे. दरबारांत त्यांची बसावयाची खोली दिवाणखान्यालगत असून दारावर चिकाचा पडदा असे. त्यानां स्वतः लिहितां येत असल्यानें त्या आपले हुकूम एखाद्या वेळीं स्वतःच लिहीत. त्या वर्णानें फार गौर असून उंच, सुंदर, रुबाबदार, करारी, नाजूक पण निग्रही, तोंडवळा किंचित् लांबट, सरळ नाक, उंच कपाळ पाणीदार डोळे व सडपातळ अशा होत्या, असें टेलर वगैरे लेखकांनीं लिहून ठेविलें आहे. रयतेबद्दल त्यानां फार काळजी वाटे. एकदां राज्यांत चोरांचा फार उपद्रव झाल्यानें त्यानीं स्वतः त्यांच्यावर जाऊन त्यांचें पारिपत्य करून रयत निर्भय केली. थंडीमध्यें गरीब लोकंस त्या उबदाब कपडे देत असत. प्रत्येक मंगळवारीं व शुक्रवारीं ह्या झांशीच्या महालक्ष्मीच्या दर्शनास मोठ्या इतमामानं जात. त्या अश्वपरीक्षेंत अग्रेसर होत्या. हिंदुस्थानांत त्याकाळीं श्री. नानासाहेब पेशवे, त्यांचे मेव्हणें बाबासाहेब आपटे (ग्वाल्हेरकर) व लक्ष्मीबाई हे तिघे अश्वपरीक्षक म्हणून प्रख्यात होते. लढाईंत जखमी झालेल्या लोकांची हर एक प्रकारची काळजी त्या स्वतःच्या देखरेखीखालीं घेत; त्यामुळे शिपायांची त्यांच्यावर भक्ति होती. व्यायामाचा शोक असल्यानें त्या रोज पहाटे कसरत व घोड्यावरील फेरफटका करीत.

झांशी ताब्यांत आल्यावर तेथील व्यवस्था आपण इंग्रज सरकारातर्फें पाहत आहों व ओर्च्छा आणि दतिया येथील राजांनीं इंग्रजांविरुद्ध आपल्या प्रांतांवर स्वार्‍या केल्या असतां आपण त्यांचा पराभव केला वगैरे माहितीचीं पत्रें त्यांनीं इंग्रज अधिकार्‍यांस अनेक पाठविलीं, परंतु त्यांचा परिणाम उलट झाला. राणीनें बंड उभारलें असें इंग्रज म्हणूं लागले. या आक्षेपाच्या निरसनार्थ राणीनें आपला एक वकील त्याच्याकडे पाठविला; परंतु त्यानें इंग्रजांकडे न जातां मध्येंच दडी मारिली व राणीला खोटीं पत्रें लिहिलीं. त्यामुळें इंग्रजांनीं आपलेंच म्हणणें खरें धरून व प्रत्यक्ष चौकशी न करितां सर ह्यू रोज यास झांशी काबीज करण्यास पाठविलें. यामुळें शेवटीं बाईचेंहि मन इंग्रजांविरुद्ध उलटलें. इंग्रजांनीं आपल्याशीं कृतघ्नता केली असें त्यानीं जाणलें. पति वारल्यावर काशीस जाऊन केशवपनविधि करण्यास त्यांना इंग्रजांनीं परवानगी दिली नाहीं. त्यांच्या खाजगी उत्पन्नांतून बरीच रक्कम गंगाधररावांनीं केलेल्या अर्जाकरितां इंग्रज जप्त करूं लागले. झांशीस गोवध होऊं लागला व महालामीच्या पूजेकडील उत्पन्नहि इंग्रजांनं जप्त केलें. या कारणांनीं राणीचें मन त्यांच्याविरुद्ध गेलें व त्यांचा आणि श्री. नानासाहेब पेशव्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला असें म्हणतात. यानंतर किल्ल्यांत त्यांनीं युद्धोपयोगी सामान तयार करण्याचें काम जारीनें सुरू केलें.

प्रथम रोजनें बुंदेलखंडांतील पलटणवाल्यांनीं काबीज केलेलीं सर्व ठिकाणें सोडवून साठ हजार सैन्यासह २० मार्च (१८५८) रोजीं झांशीस वेढा दिला. आपल्या सर्व कृत्यांचा परिणाम उलटा झाला व आपण नीतीनें वागलों असतांहि इंग्रज आपल्यावर उलटून आपल्यास धरण्यास तयार होऊन आला, असें पाहिल्यावर राणीचा मानी स्वभाव प्रगट झाला. रोजनें त्यानां शरण येण्यास सांगितलें असतां त्यानीं तिकडे दुर्लक्ष करून लढाईची तयारी त्वरेनें व जोरानें केली. त्यावेळीं गांवांतील पुरुषांप्रमाणें बायकांनींहि त्या तयारीस मदत केली, एवढेंच नव्हें तर तोफखान्यांत त्या स्वतः खपत, असें रोज म्हणतो. युद्धकलेंतील नियमाप्रमाणें राणीनें किल्ला सर्वतोपरी जय्यत तयार केला. त्यांच्या चातुर्याबद्दल रोज, लो वगैरे तज्ज्ञांनींहि राणीची तारीफ केली आहे. झांशी लढवावयाची हा सर्वांचा निश्चय कायम होता. त्यानीं लालु बक्षी यास सेनापति करून काल्पीस रावसाहेब पेशवें व तात्या टोपी यांस मदतीस येण्याबद्दल पत्रें लिहिलीं तेव्हां पेशव्यांनींहि मदतीस येण्याचें कबूल केलें.

राणीच्या जवळ ह्यू रोजच्या सैन्यापेक्षां सैन्य फार थोडे होतें. शिवाय रोजला चंदेरीहून आणखी इंग्रजी सैन्याची बरीचशी कुमक आली होती. तारीख २३ रोजी खरी लढाई सुरू होऊन राणीकडील घनगर्ज नांवाच्या तोफेनें इंग्रजांच्या सैन्याची दाणादाण उडविली. या तोफेचा धूर प्रथम दिसतच नसे; त्यामुळें शत्रु बेसावध राही, तोंच गोळे येऊन आदळत. शहरावर नेम लागू होण्यासाठीं मोर्चे बांधण्याची खटपट ३।४ दिवस इंग्रजांनीं केली. परंतु त्यांचें कांहीं चालेना. अखेर फितुरानें जागा समजल्यावरून त्यांनीं पश्चिम बाजूस मोर्चे बांधून शहरावर तोफा चालू होत्या. ज्यामुळें राणीची प्रथम निराशा झाली. पण त्यानीं लागलीच जास्त जोरानें तयारी करून गांवाच्या तटास झालेली इजा भरून काढलीं, शहरांत पाण्याचे बंब ठेविले व लोकांसाठीं अन्नछत्र खुलें केलें. तारीख २६ ला राणीकडील गुलाम गोषखान या प्रख्यात गोलंदाजानें इंग्रजांचा बराच नाश करून त्यांच्या सर्व तोफा बंद पाडल्या. त्याबद्दल त्यास राणीनें बक्षीस दिलें. तारीख ३१ पर्यंत राणीनें इंग्रजांचें कांहीं चालू दिले नाहीं. तारीक १ एप्रिल रोजी दुर्बिणींच्या सहाय्यानें इंग्रजांनीं किल्ल्यांतील  पाण्याची जागा शोधून काढून तेथें तोफांचा मार चालविला. दुर्बिणी, तारायंत्र, शिस्तीचें व कवायती सैन्य, उत्तम व लांब पल्ल्याच्या तोफा वगैरे सामान इंग्रजांकडे होतें. इंग्रजांकडील किल्लेफोडाचे तोफगोळे ६० । ६५ शेरी होते. किल्ल्यांतील सरकारी वाड्यावर ते पडत व नुकसान होई, परंतु जुनें काम असल्यानें गोळा पडेल तेवढीच जागा जायबंदी होऊन बाकीची सुरक्षित राही. उलट या सर्व सामानाचा अभाव राणीकडे होता. असें असतांहि त्यानीं दाखविलेलें शौर्य व रणकुशलता पाहून आश्चर्य वाटतें व तसें शत्रुपक्षांतील अनेक लोकांनां (खुद्द रोजलाहि) वाटून त्यांनीं त्यांची स्तुति केली आहे. वरील दिवशींच राणीच्या दुदैंवानें किल्ल्यांतील दारूखाना इंग्रजांकडील गोळ्यानें पेटून जळून खाक झाला व ४०।५० माणसें मेलीं. वेढा पडल्यानंतर दहाव्या दिवशीं १५ हजार फौजेनिशीं तात्या टोपी काल्पीहून येऊन त्यांनीं इंग्रजांस बाहेरून वेढा देऊन लढाई सुरू केली. प्रथम तात्यांची सरशी होती, परंतु अखेरीस त्यांची फौज फुटली व तात्या काल्पीकडे निघून गेले. ज्यावेळीं तात्यांच्या फौजेनें इंग्रजांवर हल्ले चढविले त्याचवेळीं किल्ल्यांतून जर इंग्रजांवर तोफा सुरू झाल्या असत्या व लढाई चालू झाली असती तर खात्रीनें रोजचा पराभव झाला असता. परंतु किल्ल्याचा हवालदार हाच आंतून इंग्रजांस फितूर होऊन त्यानें यावेळीं किल्ल्यांतून एकहि गोळी वाजविली नाहीं व त्यामुळें अखेर तात्यांचा मोड झाला. या फितुरीमुळेंच पुढें शहर व किल्ला इंग्रजांच्या हातीं गेला असें म्हणतात. अकराव्या दिवशीं स्वत: राणीनें सक्त मेहनत करून इंग्रजांवर हल्ले चढविले; सर्व दिवसभर त्यानीं खपून शत्रूचें कांहीं चालूं दिलें नाहीं. बाराव्या दिवशीं पहाटें किल्ल्यांतील लोक गैरसावध असतां इंग्रजानें गवताचे भारे तटाजवळ रचून दक्षिण बाजूनें तट ओलांडून शहर घेतलें. एका फितुर्‍यानें इंग्रज लोक वेढा उठवून काल्पीकडे जात आहेत अशी खोटीच गोष्ट राणीला सांगितल्यानें त्या यावेळीं विश्रांति घेत होत्या. तेवढ्या वेळांत वरील गोष्ट घडली. तेव्हां किल्ल्यांतून उतरून दीड हजार लोकांनिशीं राणीनें गोर्‍यांवर चढाई करून त्यांनां घरादारांचा आश्रय घेण्यास लाविलें. राणी स्वत: यावेळी लढत होती; तिच्या समोर गोरे येईनात. तरवारीची लढाई संपवून त्यांनीं बंदुकी सुरू केल्या. तेव्हां नाइलाजानें राणी किल्ल्यांत परतली. इंग्रजांनीं शहर घेऊन लोकांची कत्ताल करून शहरास आग लाविली व शहर लुटलें. ज्यानें गोर्‍यास पैका दिला नाहीं त्यास बेलाशक गोळी घालीत. अशा वेळीं बायको नवर्‍याचें रक्षण करण्यास आली तर त्या दोघांना एकदम गोळी घालीत. अब्रूच्या भयानें अनेक स्त्रियांनीं विहिरींत जीव दिले. शहरांतील हें वर्तमान ऐकून राणीस फार दु:ख झालें. त्या भरांत तिनें जोहार करण्याचा बेत केला, पण मन शांत झाल्यावर तिनें पेशव्यांकडे जाण्याचें ठरविलें. रात्रीं (४ एप्रिल) अत्यंत निवडक असे तीनशें लोक घेऊन राणी किल्ल्यांतून बाहेर पडली; अडीच हजार किंमतीच्या करड्या रंगाच्या खंद्या घोड्यावर त्या स्वार झाल्या होत्या; त्यावेळीं त्यांचा पोषाख मर्दानी होता; अंगांत चिलखत असून, पाठीशीं बारा वर्षांच्या दामोदररावानां बांधून घेतलें होतें. जयशंकर शब्द करून किल्ल्यांतून निघून शहरांतून उत्तारदरवाज्यानें मंडळी बाहेर आली. यावेळीं शहरांतील प्रजेनें राणीला शेवटचें अभिवादन केलें. ही बातमी इंग्रजांस समजतांच त्यांनीं या लोकांवर तोफा सुरू करून पाठलाग चालविला. राणीजवळ बंदूक होती; तिचा उपयोग करून त्यानीं घोडा भरधांव सोडला. अंधारामुळें सर्वत्र गडबड झाली. राणीनें इंग्रजांची फळी फोडून (खुद्द रोजच्या छावणींतून) काल्पीचा रस्ता गांठला. तें पाहून रोज याला फार आश्चर्य वाटलें राणीबरोबर एक दासी व एक बारगीर येवढेच टिकले. त्यांचा कांहीं गोर्‍यांनीं पाठलाग केला, भांडेर गांवीं ले. बौकर यानें आपल्या एका पलटणीनिशीं राणीला वेढा दिला. वेळ अत्यंत आणीबाणीची होती. परंतु न डगमगतां राणीनें बौकरवर हल्ला करून त्याला जखमी करून, सर्व पलटणीच्या देखत घोडा बाणाप्रमाणें सोडला व काल्पीकडे प्रयाण केलें यावेळच्या त्यांच्या शौर्याचें वर्णन इंग्रजांनींहि मोठ्या आदरानें केलें आहे. दुसरे दिवशीं रात्रीं राणी काल्पीस पोहोंचली, अन्नपाण्याशिवाय सारखे चोवीस तास (१०२ मैल) ही दौड होती. काल्पीस रावसाहेब पेशव्यांनीं त्यांची उत्तम व्यवस्था लावून दिली.

दुसरे दिवशीं (५ एप्रील रोजीं) झांशी शहरांत बीजन (कत्ताल) सुरू झालेत्र लोक वाड्यांतील बंड्यांत (भिंतींतील मोठमोठे चोरकोनाडे) व इतरत्र छपून राहिले. गांवांत लढाऊ लोक कोणीच राहिले नसल्यामुळें निरपराधी दीन प्रजेस इंग्रजांनीं ठार मारण्याचें काम चालविलें. जीवाच्या भीतीनें लोक गवताच्या गंजींत लपत, तों गोर्‍यांनीं ती गंजीच पेटवून द्यावी. विहीरींत डुबून असलेल्या लोकांचीं डोकीं वर दिसलीं कीं, गोळ्या घालाव्यात, या प्रमाणें तीन दिवस बीजन (पांच हजार लोकांचें) झालें व कोट्यावधी किंमतीची लूट गोर्‍यांनीं लुटली. राजवाड्यांत तर अपार लूट मिळाली. सर्व राजवाडा धुवून गेला. सोनें, रुपें, पितळ, तांबें, जवाहीर, वगैरे लुटलें. कांहीं एक वस्त्रपात्र, राहिलें नाहीं; पोथ्यांचीं वेष्टणें सुद्धां नेलीं. झांशीचा सरकारी हस्तलिखित ग्रंथांचा अमूल्य व प्रचंड संग्रह गोर्‍यांनीं नाहींसा केला. महालक्ष्मीचें देऊळ व तिचे अलंकारहि लुटले. यानंतर काळ्या पलटणींनीं लुटीस प्रारंभ केला. त्यांनीं लोकांच्या घरांत जें सांपडलें तें सर्व धातू, धान्य, कापड देवांच्या मूर्ती, आडाचे दोर, रहाट, झाडावरचीं फळें, मडकीं यांसह एकूण एक चीज लुटली. ही लुट चार दिवस झाली. शहरांमध्यें माणसांचीं आणि जनावरांचीं सर्वत्र प्रेतें पडलीं होतीं. पांचव्या दिवशीं इंग्रजांनीं तेथें आपली द्वाही फिरविली. नंतर मिळविलेल्या लुटीचा इंग्रजांनीं सरकारीरीतीनें जाहीर लिलांव केला व त्यांत पुष्कळ नफा मिलविला. शिंदे वगैरें राजेरजवाड्यांनीं सुद्धां हा माल विकत घेतला. नंतर या प्रकरणातील जे जे मुख्य लोक सांपडले त्यांनां वाड्यापुढें फांशीं दिलें. मोरोपंत तांबे (राणीचे वडील) हे त्या रात्रौं इंग्रजांची फळी फोडून दतियाकडे निसटून गेले होते. परंतु ते अतिशय जखमी झाल्यानें, तेथील राजाकडे गेले असतां, त्यानें त्यानां पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केलें व त्यानीं त्यानां वाड्यापुढें फाशीं दिलें; त्यांच्याच बरोबर सेनापति लालाभाऊ यासहि फांशीं दिलें (५ एप्रिल).

काल्पीस आल्यावर विषादानें राणीनें आपली तरवार जेव्हां श्री. रावसाहेबानां परत देऊं केली, तेव्हां त्यानीं त्यांची समजूत करून त्यानां एका सेनाविभागाचे सेनापति केलें. येथें बरेच पलटणवाले लोक जमा झालेले होते. रोजनें झांशीचा बंदोबस्त करून काल्पीकडे प्रयाण केलें (२५ एप्रिल). परंतु झांशी पुन्हां परत घेण्यासांठीं राणी व तात्या टोपी हे काल्पीहून निघाले असतां, वाटेंतच कुंच येथें दोघांची गांठ पडली. रोजनें अघाडी मारून मार्‍याच्या सर्व जागा काबीज करून पेशव्यांशीं लढाई दिली. ग्वाल्हेरच्या मदतीची वाट पेशवे पहात होते; परंतु ती वेळेवर आली नाहीं. पुष्कळ वेळपर्यंत त्यांच्या खास हुजरातीनें इंग्रजांस दाद दिली नाहीं. पण अखेरीस सैन्यांत शिस्त नसल्यानें गोंधळ होऊन पेशव्यानां मागें हटणें भाग पडलें. व ते परत काल्पीस गेले (६ मे). या प्रसंगीं राणीचें म्हणणें पेशव्यानीं न ऐकतां ते बांदेवाल्या नबाबाच्या तंत्रानें चालत होते, त्यामुळें त्यांचा पराभव झाला. याबद्दल राणीनें पेशव्यांची बरीच कानउघडणी केली.

काल्पीस पुन्हां युद्धाची तयारी झाली. राणीच्या हाताखालीं त्यांचे स्वत:चे लालवर्दीचे २०० घोडेस्वार असून यमुनेकडील उत्तारबाजू रक्षण करण्याचें काम त्यांच्याकडे होतें. रोज काल्पीस (१६ मे) दाखल झाला व लढाईस प्रारंभ झाला. येथेंहि त्यानें पेशव्यांच्या हलगर्जीपणाचा फायदा घेऊन प्रथम मार्‍याच्या जागा हस्तगत करून घेतल्या. पेशव्यांच्या लोकांनीं खोट्या उत्साहाच्या भरांत आपली सुरक्षित जागा सोडून, ते इंग्रजांच्या मार्‍याच्या टप्प्यांत गेले; त्यामुळें त्यांचा फार नाश झाला व ते मागें हटले. इतक्यांत राणीनें आपले २०० स्वार घेऊन अतिशय जोरानें इंग्रजांच्या उजव्या बगलेवर हल्ला चढविला. तो इतका असह्य होता कीं, तेथील इंग्रजी फौज पळून गेली. राणीनें तर इंग्रजांच्या तोफखान्यापर्यंत लढाई करून त्यांचा तोफखाना बंद पाडला. स्टुअर्ट हा एक सेनापति आपल्या लोकांनिशीं चालून आला असतां त्याचाहि पराभव राणीनें केला. अखेर स्वत: रोज हा शिलकी सैन्यासह आला. त्यावेळीं पेशव्यांचेंहि सैन्य राणीच्या मदतीस आलें, परंतु ते लोक भांग पिऊन बेशिस्त लढत असल्यानें रोजनें त्यांनां मागें हटविलें; तेव्हां राणीलाहि नाइलाजानें परतावें लागलें. परंतु यावेळीं तिनें दाखविलेल्या शौर्याचें इंग्रजांनींहि कौतुक केलें. याप्रमाणें काल्पी पडली (२४ मे) व पेशव्यांनीं वर्षभर सांठवून ठेविलेलें युद्धसाहित्य व पैका इंग्रजांनां मिळाला (तीस हजार शेर तर नुसती बंदुकीची दारूच होती). या सर्व जयांचें कारण, रोज म्हणे कीं, आमची शिस्त व पलटणवाल्यांची बशिस्त हें होय.

काल्पीहून पेशवे ग्वाल्हेरीकडे वळले. ग्वाल्हेरचा बळकट किल्ला प्रथम ताब्यांत घेऊन नंतर इंग्रजास तोंड द्यावें हा राणीचा सल्ला सर्वांस पसंत पडला, म्यालेसननेंहि या युक्तीबद्दल राणीची प्रसंशा केली आहे. त्यानें रावसाहेब पेशवे, बांदेवाला नबाब, तात्या टोपी व राणी या चौघांची तुलना करून बुद्धिचातुर्यांत राणीलाच पहिलें स्थान दिलें आहे. पेशवे हे मुरारच्या छावणीस ता. ३० मे रोजीं आले; ग्वालेरीस त्यावेळीं जयाजीराव शिंदे हा गादीवर होता. या सुमारास त्याचें वय २३ वर्षाचें होतें. महाराजपूर, पन्यारच्या लढायांत जय झाल्यानें (१८४४) इंग्रजांची ग्वालेरीस चांगलीच पक्कड बसली होती. ग्वालेरीचा किल्ला इंग्रजांच्या हातीं होता. जयाजीस मुखत्यारी मिलाली (१८५३) तरी सर्व कारभार रेसिडेंटच्या हुकमतीखालीं चालत होता. दिवाण दिनकर रघुनाथ राजवाडे हा होता. हा प्रथम एक कारकून होता, रेसिडेंट बुश्बी यानें त्याचे (इंग्रजास उपयोगी पडणारे) गुण पाहून त्यास उच्च पदास चढविलें. जयाजीला युद्धकलेचा शोक असून तो तेजस्वीहि होता. परंतु त्याच्यावर दिरकररावाचें वनज फार होतें. स. १८५७ च्या प्रारंभीं जयाजी हा ग. जनरल क्यानिंग यास भेटला असतां त्यानें त्याचा फार मान करून, त्यास पुत्र न झाल्यास दत्ताक घेण्याची परवानगी देऊन संस्थान पश्चात चालू ठेवण्यांत येईल असें आश्वासन दिलें. ह्याचा परिणाम जयाजीवर बराच झाला व तो बंडवाल्यास मिळाला नाहीं. पलटणवाल्यांनीं जयाजीस पुढारीपण घेऊन आग्र्‍यावर चालून जाण्यास सांगितलें. परंतु त्यानें तें ऐकिलें नाहीं. यावेळीं जर जयाजी आग्र्‍यास गेला असतां व फलटणवाल्यानां मिळाला असतां तर इंग्रजांचें फार नुकसान झालें असतें. शिंदा विरूद्ध जाता तर इंग्रजास आपलें चंबूगवाळें उचलण्याचा प्रसंग आला असता. होळकर, भोपाळकर, बुंदेलखंडांतील संस्थानिक हे सारे जयाजीवर अवलंबून होते. क्यानिंगनें, जर शिंदे बंडांत सामील होईल तर मला उद्यां आपला गाशा गुंडाळावा लागेल अशी तार केली होती असें म्हणतात.

जयाजीनें ग्वालेरीच्या पलटणवाल्यांनां आपण मिळाल्याचें बाह्यत्कारीं आमिष लावून १५ ऑक्टोबर (१८५१) पर्यंत प्रसंग निभावला. परंतु त्यानंतर इंदूरचीं पलटणें बिघडलीं व तात्या टोपी यानीं येऊन ग्वालेरचीं पलटणेंहि अनुकूल करून घेतलीं. पुढें या पलटणांनीं एके दिवशीं जयाजीची, त्यानें पुढाकार घ्यावा म्हणून स्पष्टच विनंति केली असतां त्यानें ती नाकारली व त्यांच्या विरूद्ध आपलीं खासगी मराठी पलटणें तयार करून जास्त फौजहि जमविली. तेव्हां चिडलेल्या पलटणवाल्यांनीं राजवाड्यावर हल्ला करण्याचें ठरविलें, परंतु तात्या टोपी यानीं त्यांची समजूत करून त्यांनां कानपुरास नेलें (१ दिसेंबर १८५७). ग्वालेरीचे जुने सर्व सरदार इंग्रजांच्या विरूद्ध झाले होते; शिलकी सैन्यहि फितलें होतें, आसपास युद्धे सुरू होतीं, अशा स्थितींत केवळ दिनकरराव (व जयाजी) यानें इंग्रजांशींराजनिष्ठ राहून त्यांचा बचाव केला. पुढें (एप्रिल १८५८) तात्या टोपी हे पुन्हां ग्वालेरीस आले असतां दिनकररावानेंच प्रसंग सांवरला होता. अशा स्थितींत रावसाहेब पेशवे काल्पीहून निघून ग्वालेरकडे वळले व ३० मे रोजीं ग्वालेरीजवळ दाखल झाले,

तेथें आल्यावर रावसाहेबांनीं जयाजीस दोन तीन निरोप आपल्यास मिळण्याविषयीं पाठविले; परंतु त्यानें तिकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावरच उलट चाल केली (१ जून) एकाएकीं हल्ला झाल्यानें पेशव्यांचें सैन्य गोंधळून पळूं लागलें. तेव्हां राणीनें आपल्या दोनशें स्वारानिशीं शिंद्यांच्या तोफखान्यावर जोरानें चालून जाऊन व गोलंदाज कापून काढून तोफा बंद पाडल्या. या वेळीं जयाजी स्वत: पांच हजार फौजेनिशीं राणीवर तुटून पडला. तरीहि राणीनें न डगमगतां त्याचे हल्ले परतविले. इतक्यांत तात्या टोपीनींहि आपल्या पथकानिशीं जयाजीवर चाल केली. कडाक्याचें युद्ध होऊन जयाजीचा पराभव झाला व तो दिनकररावासह आग्र्र्‍यास इंग्रजांकडे पळून गेला. याप्रमाणें या प्रसंगाचें श्रेय मुख्यत: राणीकडे होतें. शहरांत प्रवेश केल्यावर तात्यानीं ग्वालेरीच्या किल्ल्याचा ताबा घेतला. तेथील किल्लेदार त्यास अनुकूल होता. गांवांत लूट न करण्याबद्दल रावसाहेबानीं सक्त ताकिदी दिल्या होत्या. नंतर ता. ३ जून १८५८ रोजीं ग्वालेरीस फुलबागेंत रावसाहेबानीं राज्यारोहणसमारंभ करून पेशवाईची स्थापना केली व श्रीमंत नानासाहेबांच्या नांवाची द्वाही फिरविली आणि ब्राह्मणभोजनें सुरू करून सर्वजण ऐषआरामांत दिवस घालवूं लागले. या वर्तनाचा राणीनें अनेकवार निषेध केला. लढाईची तयारी ठेवून इंग्रजांचा मोड करावा, त्यांनां सर्वत्र पायबंद लावावा व ते नामशेष झाल्यावर मग हे समारंभ करावे वगैरे सल्ला राणीनें श्रीमंतांस दिला. परंतु अदूरदर्शी पेशव्यानें तो मानला नाहीं.

रोजनें पेशव्यांच्या या चुकीचा फायदा घेऊन पावसाळा जवळ आला तरी ताबडतोब प्रतिकार करण्याची तयारी केली. त्यानें तसें केलें नसतें तर म्यालेसन म्हणतो कीं, तात्या टोपी यानीं आपल्या पाताळयंत्री राजकारणानें व अतर्क्य आणि अलौकिक युद्धकलेनें त्या तीन चार महिन्यांच्या आंतच, ग्वालेरीस स्थापलेल्या पेशवाईचा प्रचंड वृक्ष बनवून सार्‍या दख्खनमध्यें जागृति उत्पन्न करून मराठ्यांचें निशाण सर्व हिंदुस्थानांत नाचविलें असतें. रोज हा काल्पीहून निघून (६ जून) अनेक अडचणींच्या मार्गानें ग्वालेरीजवळ येऊन पोहोंचला (१६ जून). मार्गांत अनेक घाट व डोंगर होते; त्यांतून येतांना त्याच्या सैन्याचे फार हाल झाले. सिल्व्हेस्टर म्हणतो कीं, प्रत्येक १०० यार्डांवर आम्हांला विश्रांति घ्यावी लागे. वाटेंत पाण्याचा दुष्काळ होता. अशा वेळीं जर अडचणीच्या जागीं पेशव्यांच्या सैन्यानें त्यांच्यावर चढाई केली असती तर त्यांचा धुव्वा उडाला असता. पण पेशवे ब्राह्मणभोजनांत दंग होते, मुरारच्या छावणीचीहि त्यांनीं योग्य काळजी घेतली नव्हती. मार्‍याच्या जागा सोडून दिल्या होत्या. ही संधि ओळखून रोजनें ताबडतोब मुरारवर हल्ला चढविला. उशीरा बातमी मिळाल्यावर तात्या धांवून आले. परंतु ते येण्यापूर्वींच सर्व मार्‍याच्या जागा रोजनें काबीज करून मराठ्यांवर शिस्तीनें चढाई केली, पेशव्यांच्या सैन्यात अवसानघातकी व बेशिस्त लोक बरेच होते व त्यांच्यावर एकाची सत्ता नसून ते आपापल्या मनाप्रमाणें वागत. त्यामुळें अखेर रोजनें त्यांचा पराभव करून मुरार हें ठिकाण काबीज केलें. या सर्व गोष्टींत पेशव्यांनी राणीचें म्हणणें ऐकलें नाहीं. इतक्यांत रोजनें एक युक्ति योजली. त्यानें जयाजीस आग्र्‍याहून मुरारास आणिलें. व त्याच्या नांवानें माफीचा जाहीरनामा काढून आपण त्याच्यासाठीं लढत आहों असें प्रसिद्ध केलें. अर्थांत पेशव्यांच्या बाजूस जे शिंद्याचे सरदार मिळाले होते ते खुद्द जयाजीशीं युद्ध करण्यास तयार होईनात; त्यांनीं पेशव्यांची बाजू सोडून दिली, त्यामुळें पेशव्याचें पुष्कळच बळ कमी झालें.

यावेळीं तात्यानीं व पेशव्यानीं राणीची सल्ला घेऊन तिला ग्वालेरीच्या पूर्व बाजूचें संरक्षण करण्यास सांगितलें आणि तिनें सांगितल्याप्रमाणें तजविजी अंमलांत आणल्या. ही शेवटचीच लढाई असून पेशव्यानीं संधि गमावल्यामुळें आतां त्यांनां जय मिळणें अशक्य आहे हें राणीनें ओळखलें होतें. पण तिनें धीर सोडला नाहीं.

कोटाकीसराई या खेड्याच्या बाजूनें स्मिथ या इंग्रजी सरदारानें किल्ल्याकडे चाल करण्यास ता. १४ रोजीं प्रारंभ केला. किल्ल्याच्या या दिशेसच राणीचें पथक व मोर्चे होते, त्यांची व्यावस्था उत्कृष्ट असल्यानें स्मिथचा लाग चालला नाहीं. ता. १७ रोजीं स्मिथनें पुन्हां हल्ला केला. प्रथम राणीच्या लोकांनीं त्याला मागें हटविलें; परंतु तितक्यांत त्याला ताज्या दमाच्या तीन चार पलटणींची मदत मिळाल्यानें, व राणीचे लोक दमल्यानें ते मागें सरले तेव्हां राणी स्वत: पुढें सरसावली. तिचा आवेश पाहून तिची तुकडी इंग्रजांवर तुटून पडली. स्मिथनें फार खटपट केली, अनेक हल्ले केले, सर्व दिवसभर मारा चालविला, परंतु राणीचें पथक तिच्या शौर्यामुळें विस्कळित झालें नाहीं आणि इंग्रजांचा जो बेत कीं, त्या पथकाची फळी फोडून, कोटकीसराई पासून ग्वालेर शहराजवळील फुलबागेपर्यंतचा रस्ता काबीज करावयाचा, तो सिद्धीस गेला नाहीं व इंग्रज निराशेनें परत फिरला.

तारीख १८ जून (१८५८) उजाडली. राणीवर हल्ले चढविण्यास या दिवशीं आठव्या हुजर्स घोडदळाची योजना झाली होती व त्यांच्या मदतीस सर्व इंग्रजी सैन्य तयार झालें होतें. स्मिथनें प्रथम चाल केली त्याच वेळीं रोजनें दुसर्‍या बाजूनें राणीवर हल्ला केला. राणी आपल्या लष्करी पोषाखात (डोकीस भरजरी चंदेरी बत्ती, अंगांत तमामी अंगरखा, पायांत पायजमा, व गळ्यांत मोत्यांचा कंठा) घोड्यावर बसून, हातांत तरवार घेऊन आपल्या सैन्याच्या अग्रभागीं आली व लढाई जुंपली. इंग्रजांनीं पुन्हांपुन्हां हल्ले चढविले, परंतु राणीनें मोठ्या शौर्यानें ते सर्व परतविले. राणीबरोबर सुंदर व काशी नांवाच्या दोन सुंदर व शूर दासी (मर्दानी पोशाख केलेल्या) होत्या. त्याहि लढाईंत सामील झाल्या होत्या. इतक्यांत रोजनें राणीच्या पिछाडीस असलेल्या पेशव्यांच्या तोफखान्यावर चाल केली, व जोराची लढाई करून दोन मोर्चे काबीज केले. त्यावेळीं जयाजीचे सरदार त्या ठिकाणीं होते; ते फितूर होऊन मागें परतले. रोज हा राणीच्या जवळ जवळ येऊं लागला. इकडे स्मिथच्या तोफखान्यानें राणीच्या पथकांतील लोक कमी कमी होऊं लागले. राणीचे सबंध मोर्चे इंग्रजांच्या हातीं लागले यावेळीं राणीच्या भोंवती इंगजांचा गराडा पडला व पेशव्यांचें सैन्यहि वेढलें गेलें. परंतु त्या शूर स्त्रीचा धीर खचला नाहीं. त्यानीं धाडसानें उरलेल्या बरोबरच्या दहा वीस स्वारांनिशीं इंग्रजांची फळी फोडण्याचा शेवटचा प्रयत्‍न केला. शिवरावभाऊंची सून म्हणवून घेण्यांत त्यानां मोठा अभिमान वाटे.

इंग्रजांचीं फळी फोडून, पेशव्यांनां जाऊन मिळण्याचें राणीनें ठरविलें. हुजर्सांचा सारखा गोळीबार होत होता व प्रत्येक खेपेस राणीचे लोक पडत होते; असें असतांहि मोठ्या शौर्यानें राणीनें भरधांव घोडा फेंकून वाटेंत येणार्‍या प्रत्येक इंग्रज स्वारास कापून, हुजर्सची फळी फोडली व द्रुतगतीनें त्या दौडत निघाल्या. तें पाहून स्मिथनें एक घोडदळाची तुकडी त्यांच्या पाठलागास पाठविली. एकसारखे तीन दिवस युद्ध करून त्या थकल्या होत्या. त्यांच्या मागें सुंदरदासी व रामचंद्रराव देशमुख आणि रघुनाथसिंग हे विश्वासु सरदार दोन तीन स्वारांसह होते. दामोदरराव (राणीचे चिरंजीव) हे रामचंद्ररावाच्या घोड्यावर होते. इतक्यांत सुंदरला इंग्रज स्वारांनीं ठार मारल्यानें, राणीनें परत फिरून त्या स्वारांनां कापून काढलें व पुन्हां जोरानें घोडा सोडला. त्यांचा नेहमीचा घोडा जखमी झाल्यानें, या दिवशीं त्यानीं हा नवीनच घोडा घेतला होता. त्याला लढाईची संवय नव्हती. सपाट्यानें पुढें जात असतां व हुजर्स मागें पाठलाग करीत असतां वाटेंत बागेंतील पाण्याचा पाट लागला, त्याला पाहून दुर्दैंवानें राणीचा घोडा अडला. त्यांनीं त्याला पुढें नेण्याची फार खटपट केली, परंतु कांहीं उपयोग झाला नाहीं. तो तेथें निश्चल उभा राहिला. हुजर्स स्वारांनीं राणीला न ओळखतां (कोणी तरी मोठा सरदार असेल अशा समजुतीनें) व त्यांच्या गळ्यांतील कंठ्याच्या लोभानें, त्यांना चोहोंबाजूनें घेरून जोराचा हल्ला केला. परंतु राणीनें मोठ्या शौर्यानें तो निष्फल केला. त्यानीं बर्‍याच वेळां त्यांनां दाद दिली नाहीं. त्या अतिशय थकल्या होत्या व हे लोक ताज्या दमाचे होते तरीहि त्यानीं त्या सर्वांस पिटाळून लाविलें. शेवटीं दुर्दैंवानें त्यांची शक्ति नाहींशीं होत चालली व त्याच वेळीं उरलेल्या एका ड्रागून स्वारानें पाठीमागून हल्ला करून त्याच्या डोकीवर वार केला; तो कारांगीर होऊन मस्तकाचा उजवा भाग विछिन्न होऊन एक डोळा बाहेर आला. इतक्यांत त्याच स्वारानें किराचीची हूंण राणीच्या छातींत मारिली. परंतु असल्याहि आसन्नमरण स्थितींत राणीनें त्या स्वाराला ठार मारिलें. मात्र आपला अंतकाळ जवळ आला असें पाहून त्यानीं रामचंद्रराव देशमुखास खूण केली. त्यानें व इतर बरोबरच्या एक दोन स्वारांनीं मोठ्या चपलतेनें त्यानां उचलून जवळच एका बागेंतील झोंपडींत नेलें व तेथें त्यांच्या तोंडांत गंगा घातली. त्यानीं दामोदररावास संभाळण्याची व आपला मृतदेह म्लेच्छांच्या हातीं लागू न देण्याची सरदारांनां आज्ञा दिली आणि अखेर प्राण सोडला. लागलींच शेजारच्या एका गंजीमध्यें गवताची चिता करून रामचंद्ररावानें राणीच्या शरीराला अग्नि दिला. याप्रमाणें ज्येष्ठ शुद्ध सप्तमी संवत १९१४ रोजीं झाशींच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचा रणांगणांत शेवट झाला.

हें वृत्त समजतांच रावसाहेब व तात्या टोपी यांनां फार दु:ख होऊन त्यांचा धीर खचला. बशिस्त व अदूरदर्शीपणानें पेशव्यांचा पराभव होऊन रोजनें त्याच दिवशीं ग्वाल्हेर घेतलें व जयाजीस राज्यावर बसविलें. पेशवे ग्वाहेरीहून निघून पंजाबकडे गेले. खुद्द ह्यु रोज, लो, मार्टिन, अर्नोल्ड, टॉरेन्स, म्याकर्थी वगैरे अनेक इंग्रज लोकांनीं व लेखकांनीं राणी लक्ष्मीबाई यांची सर्वतोपरी स्तुति गायिली आहे.

राणीच्या मृत्यूनंतर दामोदररावास सुरक्षित ठेवण्याचें काम रामचंद्रराव, रघुनाथसिंग, बाळु गोडबोले, काशी कुणबीण वगैरे अत्यंत विश्वासु लोकांनीं केलें. ठिकठिकाणीं अरण्यांत लपून छपून त्यांनीं अत्यंत अडचणींत दिवस काढले. अनेकदां त्यांच्यावर बिकट प्रसंग आले. पण अखेर त्यांतून ते पार पडले. तालबेट कोठर्‍याच्या ठाकूरानें त्यांनां त्यांची अन्नपाण्याची व्यवस्था लावून ठाकूरांतील एका पहाडांत ठेविलें होतें. त्याबद्दल त्यास दरमहा ५०० रु. व उंट घोडे, वगैरे द्यावे लागले. त्या जंगलांत हिंस्त्र पशू फार, त्यामुळें बर्‍याच रात्रीं झाडांवरील माळ्यांवर दामोदररावांस त्या लहान वयांत काढाव्या लागल्या. याप्रमाणें रावानीं त्या ठिकाणीं दोन वर्षें काढिलीं. एकदां तर राव अजारी पडले असतां मोठ्या खटपटीनें बरे झाले. राव ग्वालेरीहून बाहेर निघाले त्यावेळीं त्यांच्यापाशीं रोख व दागदागिने मिळून ७० हजारांचा विषय होता. रोख पैसा ठाकुरास देण्यांत संपला, तेव्हां दागिने तराजूनें तोलून मागेल त्या भावानें त्याला देण्यांत आले. याप्रमाणें दोन वर्षांत सर्व पुंजी संपली तेव्हां ठाकुरानें रावानां आपला आश्रय सोडण्यास सांगितलें. त्यावेळीं फक्त २०० रु. रावांजवळ होतें. कोठरा जंगल सोडून लपत छपत सिप्री येथें मंडळीं आली. तेथील (शिंद्याच्या) ठाणेदारानें मंडळीस पकडण्याचें ठरविलें; तेव्हां रघुनाथसिंगानें त्याची मूठ दाबून तो प्रसंग टाळला व तेथून बडोद येथें राव आले. परंतु तेथील ठाणेदारानें या सर्व मंडळीस कैद करून पाटण येथील इंग्रज एजंटाकडे पाठवून दिलें. त्या प्रवासांत (ठाणेदारानें घोडें हिसकून घेतल्यानें) लहानग्या रावास पायीं प्रवास करावा लागला.

कोठरा सोडल्यावर रावाचे दोन नौकर न्हनेखां व गणपत हे पाटणच्या ठाकुराच्या पदरीं नौकरीस राहिले. पाटणच्या जवळच आगर येथें इंग्रजांची छावणी असून तेथें प्लीक नांवाचा पो. एजंट होता. त्याची युक्तीनें गांठ घेऊन न्हनेखांनें रावांचें रक्षण करण्याबद्दल त्याचें मन वळवून आश्वासन मिळविलें. प्लीकला राणीबद्दल फार आदर वाटत होता. त्यामुळें त्यानें इंदूर येथील पो. ए. शेक्सपिअर यास रावानां माफी देण्याबद्दल पत्र लिहिलें व त्यानेंहि तें कबूल करून, न्हनेखांबरोबर आपले स्वार देऊन रावास सुरक्षित आणण्याचें काम सांगितलें. न्हनेखां रावाचा तपास करीत असतां वाटेंतच कैदेंत असलेल्या रावाची गांठ पडली व त्या इंग्रज स्वारांनीं बडोदच्या ठाकराच्या कैदेंतून रावाला सोडवून मंडळी पाटणास आली.

पाटणच्या ठाकुरानें रावाची व्यवस्था बरी ठेविली मात्र त्याच्या मनांत रावानीं येथेंच रहावें असें असल्यानें त्यानें त्यानां नजरकैदेंत ठेविलें होतें. ही हकीकत प्लीक याला समजतांच त्यानें खटपट करून रावाची सुटका करवून, त्यानां आपल्यापाशीं आणिलें. त्यावेळीं रावाजवळ हातांतील कड्यांशिवाय एक कपर्दिकहि नव्हती, प्लीकच्या धूळभेटीच्या वेळीं तींहि नजर करावीं लागून राव निष्कांचन झाला. प्लीकनें रावांस इंदुरास पाठविलें. ही मंडळीं इंदुरास आल्यावर (५ मे १८६०) शेक्सपीयरनें त्यांची व्यवस्था पुढीलप्रमाणें लावून दिली. फक्त शागीर्द माणसें (तीन चार) ठेवून बाकीच्यांस रजा देऊन नेटिव्ह असिस्टंट मुनशी धर्मनारायण याच्या देखरेखीखालीं रावास ठेविलें व गव्हर्नर जनरलकडून मोठ्या औदार्यानें त्यास दरमहा दीडशें रुपयांची नेमणूक करून दिली ! पंचवीस लक्षांच्या उत्पन्नाच्या मालकास दीडशें रुपयांवर राहावें लागलें. रावानीं इंग्रजी, फारशी, उर्दू व मराठी भाषांचा अभ्यास केला. डलहौसीनें संस्थान खालसा करतांना रावाचें दत्तविधान खाजगी हक्कापुरतें मान्य करून गंगाधररावाची सर्व खाजगी मालमत्ता, जडजवाहीर व इतर मिळकती यांच्यावर रावाची पूर्ण मालकी आहे असें ठरविलें होतें. शिवाय संस्थानची खाजगी शिल्लक सहा लक्ष रु. राव अज्ञान आहेत. तोंपावेतों इंग्रजी खजिन्यांत व्याजीं लावून ठेविली होती व सज्ञान झाल्यावर ती रक्कम रावास देण्याचा करार केला होता. याच्या खेरीज झांशीचे व काशी आणि पुणें येथील वाडे, बागा, पारोळें वगैरे ठिकाणचीं पूर्वापार वतनें व जहागिरी हीं सर्व रावाच्या मालकीची होतीं. यावेळीं त्या सर्वांस राव आंचवले. इंग्रजांनीं आपलें वचन मोडून या सर्व खाजगी मिळकती जप्त केल्या. जप्ती मोकळी करण्याबद्दल रावानीं पो. एजंट, गव्हर्नर जनरल वगैरेंकडे अनेक अर्ज केले, खटपटी केल्या, परंतु कांहीं उपयोग झाला नाहीं.

या सुमारास रावाचें लग्न त्याच्या चुलतीनें केलें; त्यासाठीं तिनें खर्चासाठीं पैक्याची मागणी रेसिडेंटाकडे केली; पण त्यानें ती धुडकावून लाविली; तेव्हां बाईनें आपले दागिने मोडून लग्न पार पाडिलें. रावांची ही पहिली पत्‍नी भाटवडेकर घराण्यांतील असून, ती स. १८७२ त वारली, तेव्हां रावांनीं द्वितीयसंबंध (शेवडे घराण्यांतील कन्येशीं) केला. या बाईपासून रावानां लक्ष्मणराव नांवाचे चिरंजीव झाले (१८७९). हेच हल्लीं विद्यमान आहेत. यांचा विद्याभ्यास इंदूर येथें झाला.

निदान आपली नेमणूक तरी वाढावी म्हणून दामोदररावानीं अनेकवार खटपट केली, तेव्हां गव्हर्नर जनरल नार्थब्रुक यानें मोठ्या उदारपणानें (इंदूरच्या रेसिडेंटाच्या अभिप्रायावरून) पन्नास रु. ची वाढ केली व रावाचें दहा हजारांचें कर्ज फेडलें. हे दोनशें रु. पुरेनात म्हणून पुन्हां रावानीं आपल्या मिळकतीबद्दल खटपट केलीं, शेवटीं विलायतेस इंडिया ऑफीसकडे दाद मागितली; तिचें उत्तर आलें कीं, रावास हल्लींच योग्य औदार्य बुद्धीनें वागविण्यांत येत असल्यानें या प्रकरणांत आम्हांस हात घालण्याचें कारण दिसत नाहीं (१८८२). अखेरीचा उपाय म्हणून रावानीं इंग्रज सरकारावर दिवाणी दावा लावण्याचेंच ठरविलें, परंतु सरकारनें पुराव्यास लागणारे कागदपत्र देण्याचें नाकारलें व रावाजवळ खटल्यापुरता पैकाहि नव्हतां. त्यांनीं १२१ संस्थानिकांस द्रव्याबद्दल विनंति केली असतां फक्त एकट्या रामपूरच्या नबाबानें एक हजार रु. पाठविले. बाकीच्यांनीं तर विनंतीकडे दुर्लक्षच केलें. इंदूरच्या कै. तुकोजीरावानीं मात्र दामोदररावाची थोडा फार परामर्श घेतला. याप्रमाणें जन्मापासून अखेरपर्यंत दुर्दैंवाच्या फेर्‍यांत सांपडून अखेर दामोदरराव हे नुकतेच वारले. हल्लीं त्यांचे चिरंजीव श्री. लक्ष्मणराव हे इंदुरास रेसिडेन्सीमध्यें राहत आहेत.

[संदर्भग्रंथ:- फॉरेस्ट- गव्हर्नमेंट सिलेक्शन्स; वेलस्लीज डिस्पॅचेस; एंपायर इन एशिया; स्लीमन्स रिपोर्टस्; माझा प्रवास (वरसईकर गोडशे भटजीकृत); ग्वालेरची बखर; पेपर्स ऑन दि अनेक्झेशन ऑफ झांशी; मालकम्स लेटर्स; बेल-इंडियन एंपायर; डलहौसीज अ‍ॅडमि. ऑफ बिटिश इंडिया: काये-हिस्टरी ऑफ दि शिपाई वॉर; म्यालेसन-हिस्टरी ऑफ दि इंडियन म्युटिनी; दि राणी (गिलीयनकृत); पार्लमेंटरी पेपर्स (१८५७-५७); लो-सेंट्रल इंडिया; लाईफ ऑफ सर ह्यू रोज; काये-लाईव्हज ऑफ इंडियन ऑफिसर्स; सिल्हेस्टर- कॅम्पेन इन माळवा; मार्टिन-इंडियन एंपायर; पारसनीस-झांशीच्या राणीचें चरित्र; मार्टिन-ब्रिटिश इंडिया; म्याकफर्सन-मेमोरियल्स; मॅकार्थी-हिस्टरी ऑफ अवर ओन टाइम्स; इ. इ.]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .