विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
झार्होन - हा भोरोक्कोतींल एक पर्वत असून याच्या एका पठारावर मुलाई इद्रिस झार्होन नांवाचें एक शहर वसलें आहे. मुलाई इद्रिस (पहिला) हा मूरिश साम्राज्याचा संस्थापक होता. त्यास ७९१ या सालीं येथें पुरलें. या गांवच्या लोकांनां कर द्यावा लागत नाहीं व फौजेंत माणसें पाठवावीं लागत नाहींत. कांकीं हे सर्व शहर पवित्र क्षेत्र मानतात आणि मुसुलमानांशिवाय येथें कोणासहि जावयाची परवानगी नाहीं. जवळच फरोहाचा किल्ला व रोमन राजधानी आणि इंद्रिसची राजधानी यांचे प्राचीन अवशेष आहेत.