विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
झामसिंग - गाविलगडचा पहिला रजपूत किल्लेदार. हा रजपूत पुरूष मूळचा बंगाल्यांतील रहिवासी. याला रघूजी भोंसल्यानें तिकडून आणून तो शूर व इमानी दिसल्यानें वाढवीत, त्याच्या ताब्यांत मेळघाटांतील सर्व (७।८) किल्ले दिले; म्हणजे तिकडील सर्व किल्लेदारांवर त्यास अधिकारी नेमिलें. साबाजी व मुधोजी (नागपुरकर भोंसले) यांच्या भांडणांत निजामाचा सरदार धौशा हा मुधोजीच्या तर्फें एलिचपुरावर चालून आला असतां, झामसिंगाची त्याच्याशीं लढाई होऊन त्याचा पराभव झाला होता. त्याच्या पश्चात त्याचा पुतण्या प्रमोदसिंग हा गाविलगडचा किल्लेदार झाला. त्याच्या मागून झामसिंगाच्याच वंशांत हा अधिकार पुष्कळ दिवस होता; दर्यासिंग, वेणीसिंग हे प्रख्यात पुरुष होऊन गेले. वेलस्लीनें गाविलगड ज्या वेळेस घेतला (दिसेंबर १८०३) त्यावेळीं वेणीसिंग हा तेथें किल्लेदार होता. हा अखेरपर्यंत लढत होता; शेवटीं एका गोंडाच्या फितुरीनें इंग्रज किल्ल्यांवर चढले तेव्हां वेणीसिंगानें त्यांनां जोराचा प्रतिकार केला; अखेरीस त्यानें बायकांचा जोहार करून आपला देह धारातीर्थीं अर्पण केला. किल्ल्याच्या दिल्लीदरवाजांतच त्याचें प्रेत पडलें होतें (तारीख १५). हल्लीं याचा वंश बैतुल येथें नांदत आहे. [वेलस्ली- डिस्पॅचेस्; काळे- वर्हाडचा इतिहास.]